मुख्य सामग्रीवर वगळा

धोंड्याईचा गाव... (भाग -३)

धोंड्याईचा गाव... (भाग -३)


धोंड्याईनं दिलेली पिठल्याची ताटली घेऊन मी घराच्या वाटेनं निघालो होतो,तिच्या डोळ्यातुन येणाऱ्या आसवांना सावरत तिनं घरात पडलेला भांड्यांचा गराडा बाहेर अंगणात आणला.रांजणातून जगाने पाणी घेऊन,चुलीतल्या राखेनं भांडे घासुन,ती हिसळत राहीली.
तिच्या डोक्यात काय विचार चालू होता कळायला सीमा नव्हत्या,मनाशीच मनचे काहीतरी पुटपुटत तिचे भांडी घासणे चालू होते...

भांडे घासण्याचा आवाज ऐकुन शेजारची धुरपता काकु धोंड्याईच्या अंगणात येऊन बसली,अंगणात मोकळं असल्या कारणाने लिंबाच्या झाडांच्या फांद्यांचा अंगणात वाऱ्याच्या सोसाट्याने आवाज येत होता,जो अंगाला बोचनारा अन् काटे आणणारा होता...

धुरपता काकु नवार पातळ सावरत अंगणात बसली अन् धोंड्याईशी गप्पा झोडू लागली,धोंड्याईचां लेवुक गावाला जावून आठ दिवस सरले होते अन् आता तिला लेकाची आठवण येऊ लागली,हे तिच्या बोलण्यातून जाणवू लागलं होतं.
सांच्याला माझ्याशी नातवाच्या विषयी बोलणं झाल्यापासून धोंड्याईच्या काळजात ध्धस्स झालं होतं...

कधी एकदा तिचा लेवक घरी येतो असं तिला वाटत होतं,तिचं धुरपता काकुच्या बोलण्याकडे कम अन् गावच्या पल्याड असलेल्या स्मशानवाटेकडं चित्त लागलं,कारण गावला यायची ही एकच वाट हुती...

तितक्यात धुरपता काकुने उद्याच्याला संतु सोनाराच्या वावरात सरकी जमा करायले जायचं म्हणुन धोंड्याईला तिच्या अंगाला हात लावून खुणावलं अन् धोंड्याई एकदमच डचकत डोळ्यांतील आसवांना मोकळी वाट करून देत बोलू लागली...

धुरपे अय माझ्या लेकी धूरपे..!
आठ दिस झाले माझा नामा काय येईना झाला हाईसा..!
शहराले काम धुंडाया गेला अन् आजुन पहुर काय सांगावा नाय का,तो बी काही यायना झालाय..!
धुरपा काकू बोलती झाली:
अगं ए मायव येईल व तुझा लेवूक येईल,उद्या सांच्या पहुतर येईल नग अशी येड्या खुळ्यागत भरल्या घरात रडू नगं व माय..!
धोंड्याई बोलती झाली:
धुरपे तुझं सबुत खरं हाय गं..! 
माझा पोटचा गोळा हाय ग त्यो,इतक्या दिस कधी शहराला राहिला नाय अन् तिथं आपल्या सारख्या आठरा विश्व दारिद्र्य असलेल्या लोकासनी कोण घटकाभरचा निवारा ध्यु रायला,की आसराला एखादं छप्पर...

तितक्यात धुरपा काकुची सुनबाई मीरा आवाज देते:
व आत्याबाई..!
चाला की आता घरला कव्हा पथुर बसुन राहता,पार अंधारून आलया की आता आवरा आवरा माय लेकीच्या गप्पा,चला ओ आत्याबाई..!
धुरपा काकु बोलती झाली:
आली आली गं मिरे मामांजिस्नी ताट वाढाया घे तुवर..! 
मायव चल येतु गं मी तुझा मोठा लेवूक आला हायसा ढोसून त्याच्या सेवेत हजर व्हावं लागल नायतर त्यो कल्ला करतुया..!
धोंड्याई:
बरं बरं लेकी उद्याच्याला जावूया संतू सोनाराच्या वावरात,मला आरोळी देई हा जाता वख्त...

धोंड्याईने डोळ्यातील आसवं लुगड्याच्या पदरानं पुसत घासलेली भांडी आत घेतली अन् दारी टाकलेल्या खाटीवर गोधडी अंथरुन उशी घ्यायला आत घडुंची जवळ गेली.
घोंगडी,उशी घेऊन देव्हाऱ्यातला दिवा मालवत,घरात पिवळा धम्मक चमकणारा लाईट इजुन,दाराला कडी कोंडा घालुन खाटीवर पाठ लांब करून दिली...

लेवकाच्या चिंतेन चिंतातुर झालेली अन् कामाच्या व्यापानं धोंड्याई पार कमरात वाकली होती,एक अंगाला झोपून ती बघत बसली होती स्मशान वाटेनं येणाऱ्या जाणाऱ्या इस्मास...

तितक्यात महादेवाच्या देऊळात झोपणारा धोंड्याईच्या वयातला दगडु म्हातारा देऊळाच्या वाटेनं चालला होता त्यानं म्हातारीला हटकले...
अय धोंड्याई कशी हायसा..?
तुझा लेवुक आला का नाय शहरावरून..?

धोंड्याई बोलती झाली:
नाय व उद्या सांज पहुतर येईन असं वाटून राहिलं,पर का महीस येतु का तिकडच राहतुया..!
दगडु म्हातारा बोलता झाला:
ईल ईल.. काळजी नगं करू...
नायतर माझा लेवूक पराच्या दिशी जातुया शहराच्या गावाला तो हुडकून आणीन गावला तर,चल म्हातारे येतूया मी तु पण झोप रात सरायला हायसा...!

अन् म्हातारं इजारीच्या उजेडात स्मशान वाटेनं महादेवाच्या देऊळाला
जाया निघालं..!
धोंड्याई अंगावर लेवून डोक्यात सतरा ईच्यार घेऊन या उष्यावरून त्या उष्याला होत होती पण तिच्या डोळा काही झोप उत्रणा झाली हुती,अन् दोन्ही डोळ्यांच्या धारा काही खंडणा झाल्या होत्या...

Written by
©® Bharat Sonawane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...