मुख्य सामग्रीवर वगळा

पितळखोरा लेणी भ्रमंती..!

पितळखोरा लेणी भ्रमंती..!


बौद्ध पौर्णिमाला पितळखोरा लेणी भ्रमंतीस निघालो की आपसुकच मन एका वेगळ्या विश्वात घेऊन जात असते,काय हवं आहे..?,कश्यासाठी आलोय..? 
या प्रश्नांना मग उत्तरं नसतात पण सर्व बघुन जेव्हा परतीच्या वाटेला लागतो तेव्हा मात्र एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं की,येथुन पुन्हा आपल्या परतीच्या मार्गाला जाण्यासाठी सोबतीला काय घेऊन जायचं आहे..?

गेली काही दिवस म्हणा किंवा आता वर्षच म्हंटले तरी चालेल पितळखोरा लेणीला भेट दिलेली नाहीये अन् त्यामुळे मनाची होणारी चिडचिड सहज लक्षात येत आहे.
तर चला आज माझ्या प्रिय पितळखोरा लेणी भ्रमंतीबद्दल लिहण्याचा हा छोटासा प्रयत्न...

भ्रमंती करणे हा माझा विकपॉईंट आहे,म्हणजे असं मनसोक्त भटकायला मला सोबतीला मित्र असायलाच हवे असे नाही,एकटेही मी मनाला वाटले तेव्हा भटकायला बाहेर पडतो,कधीतरी मित्र असतात ते सर्व माझ्या सारखेच भटके अतरंगी आहेत.मग काय बऱ्यापैकी आमचं जुळून येतं,पण जसंजसं मोठं होत गेलो तसे कामाच्या व्यापात जो तो आपापल्या कामात व्यस्त झाला अन् मग हे एकट्याने फिरण्याचं वेडंखुळ डोक्यात भरले....

तर भटकंती सुरू झालेली असते काळ्या,भुरक्या खडकांच्या रानात पावलं चालत राहतात,दूरदूर उन्हाची झळई तुटतांना नजरेस पडत असते.जवळपास बकऱ्या वळणाऱ्या गुरखांचा शिळ फुंकण्याचा आवाज कानी पडत असतो ,दूरवर नांगरणीची कामं बैलांच्या साह्याने चालू असतात,बैलांवर पहाडी आवाजात ओरडणार्या शेतकऱ्यांचा आवाज दूर माझ्यापर्यंत हवेत विरत-विरत आलेला असतो...

पावले भटकत असतात मिळेल त्या दिशेनं,एका त्या लेणीच्या पायथ्याशी जाणाऱ्या मार्गाला,लेणी जवळजवळ गाठली की मग पुरातत्व खात्याच्या कमानी उभारल्या आहेत तिथं काही घटकाभर विश्रांती घेत आजूबाजूला असलेल्या झोपड्यांना न्याहाळत बसायचे...भर उन्हातान्हात गरम तापलेल्या लाल मातीत खेळणाऱ्या अर्ध्याअंगी उघड्या असलेल्या लेकरांना बघत आपल्या भूतकाळात रमून जायचं,अन् आपण मोठे झालो याची प्रचिती मग येऊ लागते पण सोबतीला अजूनही या मुलांसारखे मातीत रमणारे,खेळणारे,बागडणारे लहानगे आहोत याचीही जाणीव होत असते...
कितीवेळ त्यांच्याशी गप्पा मारून,खेळून झालं,की झोपडीत असलेल्या बापडीकडून तांब्याभर पाणी मागुन घटाघट नरड्याच्या खाली आणुन सोडलं की गार-गार वाटतं,मग झळाया तोडणाऱ्या उन्हात गारवा अनुभवयाला येतो.
सोबत शिशित पाणी घेऊन मग निघतो मार्गाला...
पुरातत्व खात्याच्या कमानिशी आलं की गार्ड बाबाला रामराम घालायचा,नाव नोंद करायचं,सुख दुःखाच्या चार गोष्टी सांगायच्या शिशितले घोटभर पाणी त्याला प्यायला द्यायचं अन् निघायचं मार्गाला.

रस्त्यात लेहंगा घातलेली करवंद विकणारी आजीबाई दिसते मस्त चेहऱ्यावर,हातावर गोंधलेली ती आजीबाई जगातली सर्वात सुंदर स्त्री त्यावेळी भासत असते.दोन रुपयाला एक कप असं दोन कप करवंद घेऊन पिंपळाच्या पानाचे डवणे करून घेतली की दहाची नोट तिच्या हातात देऊन,येतुया याडी म्हणुन निघावे तिनं वापीस पैश्यासाठी बोलावं नाकारत तिथून निघावे....

उंच उंच दिसणारी सागाची झाडे अन् यात असलेली लेणीकडे जाणारी कोरलेली दगडी पायऱ्याची वाट चालत रहावे,चालता-चालता सावलीच्या आश्रयाला बसून घ्यावं.काहीवेळ बसले की,डोक्यात सागाच्या पानाची टोपी करून घालायची अन् कातळात कोरलेल्या लेनीला दूरवरून बघत राहावं,इतक्या जवळ येऊनही आता तिला भेटायला जावसे वाटत नाही.

तिचं काही शतके जुनं ते रूप पायऱ्यांवर बसूनच न्याहाळत राहावं असं वाटायला लागतं,मग मनाची तयारी करून निघायचं लोखंडी पुलावरून बघत राहायचं मग उंचावरून कोसळणारा मुसळधार धबधब्याला पोहायला येत नसल्याने मनाची होणारी कोलाहल पण झालेल्या दुर्घटना आठवत पुढं निघावे...

आता मन थाऱ्यावर नसते,लेणीच्या पायथ्याला गेलं की मग इतकी सुंदर लेणी त्याकाळी अशी अधुरी कोरणे सोडुन का गेली असतील ती लोकं हा प्रश्न पडतो...
सोबतीला मन परिवर्तन होवुन एकाकी खुप हळवं झालेलं असते मग कातळात कोरलेल्या प्रत्येक कलाकृतीला स्पर्शुन,नजरेत भरून घेत असतो अन् मग उगाच पुरातत्व खात्याचा कुणी जाणकार असल्यासारखे स्वतःला प्रश्न करू लागतो अन् स्वतःच त्याची उत्तरेही देऊ लागतो...

बौद्ध पौर्णिमेला लावलेल्या मेणबत्या थिजून गेलेल्या असतात,त्यांच्या सानिध्यात ही लेणी अनुभवताना एक वेगळेपण अनुभवयाला येतं,एखाद-दुसरी मेणबत्ती विजू की मिणमिनू करत असते,तिच्या उजेडात शांतमय असलेली ध्यानस्थ रुपातली बौद्धाची मूर्ती कितीवेळ बघत राहावी.आपणही काहीवेळ डोळे बंद करून हे सर्व अनुभवत बसून राहायचं,मनाला मिळणारी शांतता,एकांत यासाठीच हा इथे येण्याचा कायमचा हट्टहास असतो...

एक एक करून बरच काही नजरेत सामावले जातं,स्पर्शाची भाषा करत भिंतीवरील चित्रांशी गप्पा मारल्या जातात कितीवेळ शांत बसून स्वतःच्या मनाशी गप्पा मारत बसलो की मग लेणी समोरच्या नदीरुपी नाल्यातून खाली यावं,पाण्यातून सावरत दगडांवर तोल सावरत उड्या मारत मारत समोरच्या कोरीव लेणीकडे निघावे... आठवण म्हणुन काही फोटो कॅमेऱ्यात कैद करावे,काही माहिती लिखित स्वरूपात डायरीत कैद करावी अन् ती बंद करून मग ती बॅगमध्ये ठेऊन द्यायची अन् सर्व जगाला विसरून,रोजच्या घडामोडीला विसरून फक्त अन् फक्त कातळात कोरलेल्या या लेणीला बघत राहावं...

एक तास जातो,दोन तास जातात अन् घराची ओढ लागते अन् पावले घराच्या मार्गाने निघू लागतात...
मनाला भेटलेली काही तासांची शांतता घेऊन पुढील काही दिवस जगाशी स्पर्धा करायला आपण मोकळे झालेलो असतो,कोरलेल्या पायऱ्यांनी वरती चालत आले की मग चहूकडे नजर फिरते,करवंद विकणारी ती आजीबाईसुद्धा तिच्या घराला जाण्या तिच्या मार्गाला लागलेली असते....

अस्ताला जाणारा सूर्य लेणीच्या साक्षीने बघावा आणि मग घराच्या वाटा जवळ करायला लागावं,पुन्हा काही दिवस एकांताला दूर करत या स्पर्धेच्या जगात स्वतःचा बळी देण्यासाठी....

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...