मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची आता व्हावी उजवण..!

आयुष्याची आता व्हावी उजवण..!

भर सकाळीच उन्हं जाणवायला लागली आहे.औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांना आज आमच्या हक्काची सुट्टी असते.तरीही काही महत्त्वाचं उत्पादन कंपनीत करायचं असेल,फार महत्त्वाचं असेल तर एखाद-दोघं जातात कंपनीत..!

बाकी रोजच्या सकाळी पाच वाजता सुरू होणारा आमचा दिवस आज मात्र आठ वाजता सुरू होतो.मी निपचित अंथरुणात पडून असतो.
तुटलेल्या खिडकीच्या तावदणातून हळूवार हवेचे झोके आत येत राहतात,त्यांना अंगावर घेत मी लोळत पडलेलो आहे..!

खोलीत झालेला पसारा,अस्थवस्थ पडलेली पुस्तके,पेपर,रात्रीचा मेसचा डबा खावून झाल्यानंतर तो तसाच उताणा पडला आहे.बाटलीतील पाणी संपल्यामुळे तो हिसळून ठेवायचं जीवावर आलं आहे.
खूप तहान लागली आहे पण उठायची इच्छा नाही..!

उश्याला नामदेव ढसाळ यांचा "मी भयंकराच्या दरवाज्यात उभा आहे" हा काव्यसंग्रह कित्येक दिवस वाचायला घेतला आहे पण पडून आहे.तो वाचून होत नाहीये.
कारण काय असेल तर मला कुठेतरी माझ्याच व्यथा त्यात मांडल्यासारखे वाटू लागले आहे,त्यामुळे त्यांची एक-एक कविता वर्मी घाव घालत आहे.दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट दरवाज्याच्यासमोर ठेवलेल्या टेबलाखाली ठेवलेला आहे.त्यातून उग्र वास येणारे सोक्स अर्धवट बाहेर आलेले आहे..!

नुकताच रूम पार्टनर उठला आहे.मला आवडत नाही म्हणून तो सिगारेटचं काल रात्री उरलेलं अर्ध थोटुक बाहेर गॅलरीत घेऊन त्याला शिलगवत हवेत धूर सोडवत ग्रेसांच्या कवितेची आई - बहीण एक करतोय.

पेपरवाला खालच्या गल्लीतून प्यापर-प्यापर ओरडत चालला आहे.बिहारी साला खूप मेहनत घेतो,सकाळी पेपर वाटतो अन् त्याची बायको तो पेपर वाटून येवोस्तोवर पाववड्याची कामगार चौकात दुकान लावते.
हा पेपर वाटून आला की अजय देवगनच्या सुरुवातीच्या काळातील गाणे म्हणत तिला इंप्रेस करतो..!

कामगार चौकातील जुनी तरुण पोरं जी आता एक-एक पोरांची बाप आहे,ते म्हणता याने त्याची हि बायको पळवून आणली.त्याला कुणी देत नव्हते म्हणून.
काहीही असो साले आज त्यांचे चांगले आहे,काही दिवसांपूर्वी म्हणे महानगरात त्यांनी त्यांच्या याच कामावर 1 BHK घेतला आहे..!

आम्ही इथे रात्रंदिवस आमची घासत कंपनीत मारून घेत आहोत,पण दोन टाईमची मेस लावायची आमची आवकात नाही.कंत्राटीपद्धतीने काम करतो पण कुठे ज्या कंपनीत आमचं एक टाईमचे नाश्ता,जेवणाची सोय होईल तिथेच.बाकी कामाचे आम्हाला काही वाटत नाही किती असू दे चालतं.!

महिन्याचा दहा-अकरा हजार पगार पुरणार बी कसा म्हणा,जिथं आमची पुस्तक वाचनाची भूक भागत नाही तिथं जेवणाची दुरच.
असो..!

खूप जीवावर आलं होतं उठायचं पण उठलो,सारा कामगार चौक आज गर्दीनं फुलून गेला आहे.झेंडावंदन झाला की नाय झाला इथे कुणाला काही घेणंदेणं नाहीये,आपली हक्काची सुट्टी म्हणून आपली मज्जा आहे.

पहाटेच चौकातल्या देशीच्या गुत्त्यावर पोरं जाऊन भिडली आहे,साल्यांनो आजच्या दिवस तरी सोडा.त्यांना सोडून कसं जमेल अंग लटलट करायला लागतं लगेच त्यांचं,इतकं आहारी गेली हाय ही लेकरं तिच्या..!

काय करतील बिच्चारी तिकडं गावाला आईबाप गरिबीचे दिवस काढता,इकडं हे.त्यांना पोरी कुणी देईना झालं हाय अन् त्यांची समजूत झाली हाय की आयुष्याची पूर्णच वाट लागली हाय आपल्या मग पिवून घेऊ जोवर आहे तोवर..!

चौकात बारच्या टपऱ्या उघडल्या आहे,नाश्त्याच्या दुकानी उघडल्या आहे.मेसवाला हिंग टाकून-टाकून भाजी करतो आणि मग पोट खराब होते,भूक लागत नाही त्याला जाब विचारायचा म्हणून एकांगाला पोरांची खलबतं चालू आहे..!

एक म्हणतो आज त्याला हाणूनच काढू,एक म्हणतो जावू द्या यार आपण कुठे त्याला पैसे वेळेवर देतो,बाकी मेस बघता बरा आहे उगीच आपले खायचे वांदे करून घेऊ नका.दोन-तीन पोरं बारच्या टपरीवर त्या पोराला जय शरणात भाऊला म्हणत भाऊ एक कडक बनवा चांगला घासून असे बोलत आहे.कुणी पच-पच करत कामगार चौकाच्या भिंती लाल करतोय..!

तो एक फुल पिवून बाभळीच्या जाळीत पडून आपल्या आयुष्याची अन् कंपनीतल्या सुपरवायझरची आई-बहीण एक करतो आहे.रूम पार्टनर अन् तो एकाच कंपनीत आहे,त्याला कामावर घेतलं नाही म्हणे काल पिवून गेला तर म्हणून सकाळीच त्याचे हे श्लोक कानी पडत आहे..!

मी उठलो झाडझुड केली,पुस्तकं नीट लावली,रूम पार्टनर तयार झाला,अंथरूण टाकलं अन् चहा प्यायला म्हणून टपरीवर गेलो.दोन चहा अन् दोघात एक पार्ले घेऊन खात बसलो.

आजचं नियोजन काय,दिवसभर काय करणार म्हणून त्यानं विचारलं.म्हंटलं आज हक्काचा दिवस आहे दिवसभर वाचत बसू संध्याकाळी जावून येऊ प्रोझोन मॉल फिरून येऊ.असंही आपल्याला कुठे खरेदी करायची आहे आणि तिथं फिरायला कुठं पैसे लागतात..!

त्याला विचारलं तर तो म्हंटला आज रात्री लग्नात कॅटरिंगचे काम करायला जाणार आहे,एक वेळची जेवणाची सोय अन् आजचा रोज निघून जाईल म्हंटला..!

मी काय बोलणार म्हंटले ठीक आहे,मग मी वाचत बसेल रात्री नाही जात प्रोझोनला.त्यानं मला मिठीच मारली सॉरी भाई समजून घे म्हंटला..!
मी काय बोलणार म्हंटले चालते यार तू काम कर काही हरकत नाही..!

त्यानं माझ्या चहाचे पैसे नको म्हंटले तरी दिले,मी पार्ले पुड्याचे दिले.निघालो तिथून संध्याकाळपर्यंत वाचन करायचं आहे,बारा वाजता मेसवर जेवायला जायचं आहे.आज कंपनीला सुट्टी आहे म्हणून आजचा माझा दिवस निवांत आहे..!

पेपर हातात घेतला अन् उद्या पेपर नाही येणार निवेदन वाचून पुन्हा बाजूला ठेवून दिला आणि तुटलेल्या खिडकीतून बाहेरच्या जगाला न्याहाळत बसलो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...