The Alchemist..!
दोन दिवसांपूर्वी "पाउलो कोएलो" लिखित "द अलकेमिस्ट" (किमयागार) हे "१३५" पानांचे डॉ.शुचिता नांदापूरकर यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचून संपवले.
खूप छोटे असे अन् ठरवून वाचायला बसले तर एका बैठकीत वाचून पूर्ण होणारे असे हे पुस्तक आहे..!
हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर बुक म्हणून अनेकदा ठरलेलं आहे.आश्चर्य म्हणजे जेव्हा मुळ पोर्तुगिज भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा काही एका महिन्यात या पुस्तकाच्या फक्त दोन प्रती विकल्या गेल्या असतांना हे पुस्तक पुढे काही दशके आंतरराष्ट्रीय पातळीवर बेस्ट सेलर बुक ठरले ज्याची एक अनोखी कथा आहे..!
आजवर जगभरात ८० पेक्षा जास्त भाषेत हे पुस्तक अनुवादित झालेले आहे अन् जगभरातून वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे..!
"अॅन्डालुसिया" इथल्या "सॅन्टिआगो" नावाच्या एका मेंढपाळाची ही एक छोटीशी रंजक कथा आहे,जी आपल्याला जीवन जगतांना यशस्वीतेचे काही तत्वे सांगू बघते.खजिना भेटेल म्हणून स्वतःच्या मेंढ्या विकून स्पेनमधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंतचा त्याचा हा प्रवास आपल्या मनाचा तळ ढवळून काढतो..!
पुढे काय होईल याची आपल्याला उत्कंठा लागून राहते,खजिना भेटेल का..?, काय भेटेल खजिन्यात असे अनेक प्रश्न आपल्याला कथानक पुढे सरकत असतांना पडत असतात...!
पिरॅमिड्सजवळ लपवलेल्या खजिन्याच्या शोधात निघालेल्या सॅन्टिआगोला प्रवासात एक जिप्सी स्त्री,स्वतःला राजा म्हणवून घेणारा वयोवृद्ध आणि एक किमयागार भेटतो.प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो.तथापि,खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहीत नसतं..!
वाटेत येणार्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हेसुद्धा कोणाला सांगता येत नाही.भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टिआगोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो.मानवतेच्या गाभ्याला स्पर्श करणारी अशी ही उत्कट आणि प्रेरक कथा आहे..!
या कथेमध्ये स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मिळालेली प्रेरणा,एका अनोळखी दिशेने सुरू असलेला प्रवास,सर्व काही गमावले तरी जग जिंकायची असलेली उर्मी,आपली जीवनसाथी मिळून ही तिच्या प्रेमापोटी स्वप्नांचा पाठलाग न थांबवण्याचा दिलेला सल्ला असे कितीतरी प्रसंग वाचकांना कथेशी जोडून ठेवतात..!
एकूण असा हा सर्व प्रवास आहे जो आपल्याला आयुष्याला घेऊन अनेक तत्व शिकवतो..!
थोडक्यात पुस्तकाबद्दल मला काय वाटते,
पुस्तक खूप एकांगी अन् पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टींचा पुस्तकात झालेला उल्लेख यामुळे पुस्तकात कुठेतरी एका पॉईंटला पुस्तक कंटाळवाणे वाटायला लागते..!
नक्कीच प्रवासवर्णन आणि लेखकाला आपल्याला जे काही सांगायचे आहे या नजरेतून जर पुस्तक वाचत असाल तर पुस्तक आपल्याला पुस्तकाशी खिळवून ठेवते.परंतु काही ठिकाणी असा प्रत्यय येतो की कुठेतरी लिखाणात बळजबरी काही पात्र येतात अन् नकळत गायब होवून जातात.नेमकं यातून लेखकाला काय साधायचं आहे हे ही कळत नाही..!
थोडक्यात पुस्तक छान आहे पण जरासे गुंतागुंतीचे आहे,आपण कोणत्या विचारांना घेऊन ते वाचू यावर पुस्तक कसे वाटते हे अवलंबून आहे.विद्यार्थीदशेत हे पुस्तक वाचले तर नक्कीच आपल्याला प्रेरणादायी वाटेल असे हे छोटेसे पुस्तक आहे..!
मराठी अनुवाद कुठेतरी गरबडल्या सारखा वाटतो जो अजून खूप छान पद्धतीने सरस होवू शकतो,ज्यामुळे मराठी वाचक या पुस्तकाला अजूनच आवडीने वाचतील..!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा