अनोळखी शहर..!
माणसं जोडायला हवी,तुझ्या लिखाणाला दुःखाची किनार असल्याचं नेहमीच तुझ्या लिखाणाला वाचत असताना दिसून येतं.शहरात नव्याने जॉब शोधायला आलेल्या एका खेड्यातील सुशिक्षित मुलाची जी अवस्था व्हावी तशी तुझी अवस्था झाली आहे.
असा प्रत्यय तुझ्या लेखणीतून दरवेळा नव्यानं येतो..!
ज्याप्रमाणे माणसं जगायला हवी आहे,तसं तुझं हे व्यक्त होणं चालू रहायला हवं.कालचीच गोष्ट बघ मी शहराच्या एका नामांकित चौकात उभा होतो,माझं माणसांना न्याहाळणे चालू होते.उड्डाणपुलाखाली असलेल्या झाडाच्या आडोश्याला मी सावलीला उभा होतो..!
अनोळखी शहरात मी अनोळखी माणसांत आपल्या लोकांना शोधत असतो.कुणी मला बघून अलवार स्मित दिलं की मला तो ओळखीचा वाटू लागतो.मग आपल्या मनातल्या सर्वच गोष्टी त्याला सांगाव्या असं वाटू लागतं.परंतु दुसऱ्या क्षणाला ती व्यक्ती माझ्यापासून कितीक दूर निघून गेलेली असते अन् एरवी माझी कल्पनेत का होईना तिच्याशी भेट झालेली असते,संवाद खुलू लागलेला असतो..!
अश्या तऱ्हेनं माणसं बघायला लागलं की अनोळखी प्रत्येक तो माणूस आपल्याला ओळखीचा वाटू लागतो..!
मला आठवतं कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी बऱ्याच रजिस्टरची लिखाणाला सुरुवात ही उलट दिशेनं केली होती.कारण कॉलेजमध्ये फारसे लिहायला लागत नाही,म्हणून मागील दहा-पाच पाने फाडून टाकले की आपल्याला नव्यानं रजिस्टर घ्यायची गरज नाही असा विचार त्यामागे होता.
मी माझी वही,रजिस्टर जीवापाड जपणारा होतो..!
पुढे कित्येक दिवस हेच रजिस्टरं बुकबाईंड करून मी वापरले.फायनल प्रॉजेक्टवेळी दिला जाणारा प्रॉजेक्ट त्याची गोल्डन-सिल्व्हर बाईंडींग बघून विद्यार्थीदशेतला हा माझा शेवटचा प्रॉजेक्ट असेल म्हणून किती हायसं वाटलेलं..!
असो..!
असं विचार करत असतांना माझ्यासमोरून तीन वेळा सिटीबस निघून गेली अन् एकवेळा मला कुठं जायचं हेच मी विसरून गेलो.टापटीप व्यवस्थित असलेलं माझं राहणीमान बघून मला कित्येक लोकं भुलतात.लोकांना काय माहित एकावेळी दोन आयुष्य जगणारी ही माणसं वरवर जरी नॉर्मल असली तरी त्यांच्या मनात असंख्य विचार एकावेळी चालू असतात..!
काल परवा भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक मी त्याच चौकात फावल्यावेळेत वाचत बसलो होतो.येणारी जाणारी माणसं मला बघत होती,त्यांच्या त्या नजरा बघून दुसऱ्या क्षणाला माझा मार्ग मी बदलवला अन् सभोवताल न्याहाळू लागलो..!
भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मार्गावर चालायला हे शहर किंवा हे माणसे कधी शिकतील हा विचार मनात येऊन गेला.मी आता सिग्नल लागला म्हणून थांबलो होतो.मी पायी होतो मग मी का थांबलो म्हणून लोकं मला बघत होती,काही क्षणांनी सिग्नल बंद झाला,गाड्या सुटल्या अन् मला बालकवी यांची आठवण येऊन गेली...!
बऱ्याच दिवसांच्या सहवासानंतर आता शहर ओळखीचं वाटू लागलं आहे.अनेक शहरातल्या लोकांनी गावाकडे असतांना शहराला आला की भेटू म्हणून सांगितलं होतं पण या भेटीसाठी मला करावी लागणारी बेरीज,वजाबाकी यांची गणितं अजुन जुळले नाही म्हणून मी अजुन तरी भेटी टाळतो आहे..!
काल परवा सायंकाळच्या उन्हात असाच शहराला आला की भेट असं खूप दिवसांपूर्वी सांगून ठेवलेला मित्र दिसला.मी सिग्नल बघत होतो,त्यानं मला बघितलं अन् ओळख दिली मी ओळख न देऊन काय करणार होतो.
बोलणं झालं,गप्पा झाल्या अनेक विषयांना घेऊन मला काय वाटतं हे त्यानं जाणून घेतलं.शेवटी एक वेळेला वाटून गेलं की तो माझा इंटर्विव घेतो आहे की काय इतके सर्व प्रश्न त्याने मला केले..!
नंतर वेळ झाली या वेळेत सहा वेळेस सिग्नल लाल होवून हिरवा झाला होता,तो निघून गेला अन् मी पुन्हा आता माझी आजची गणितं जुळवत बसलो होतो..!
जगण्याला घेऊन खूप विचार करायला लागलं की अश्या गोष्टी आपल्यासोबत घडत जातात अन् आपण शून्यात विचार करायला लागतो.
रस्ते,सिग्नल,माणसं,अनोळखी माणसं,वाहने,मित्र,मैत्रिणी,कैफात रममाण असलेला मी,झाडाची सावली,रजिस्टर,पुस्तकं,१८९ पान नंबर शेवटून तिसरी ओळ अन् बरच काही..!
Written by
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा