मुख्य सामग्रीवर वगळा

एमआयडीसी डायरी..!

एमआयडीसी डायरी..!


भर दुपारच्या उन्हात दीडच्या सुमारास हॉस्टेलरुमच्या खोलीत सेकंड शिफ्टसाठी कंपनीत जायची तयारी होत असते.अंगात त्राण नसतो,घामाचे ओघळ चेहऱ्यावर येत असतात त्यांना सावरत फ्रेश होवून कंपनीचा युनिफॉर्म घातला जातो.तो घातल्यावर आरश्यात बघितले की काळजाची धडधड वाढते,मग पुन्हा खूप जीवावर करत तो दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट घालून त्याच्या लेसशी बराचवेळ खेळून झालं की पुन्हा एकदा आरश्यात बघून स्वतःला नीटनेटके आवरले आहे का हे बघून हॉस्टेल मधून निघतो.एरवी दोन वाजलेले असता,कंपनीत एक टाईम नाश्ता,जेवणाची सोय असल्यानं तेव्हढे टेन्शन कमी होते..!

एमआयडीसी परिसरातच हॉस्टेल असल्यानं पायीच कंपनीत जातो,या वीस मिनिटाच्या प्रवासात आयुष्याला घेऊन किती प्रश्न मी स्वतःला करतो याची गिणती नाही.डांबरी रस्त्याची वाट असल्यानं,रस्त्यावरील डांबर डोक्यातून येणाऱ्या घामाप्रमाणे त्याचे ओघळ सोडवत चमकत असतं,त्याचं हे चमकणेही जीवाला नकोसे वाटते,जीव घाबरा होतो.

रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी बेसुमार वाढलेलं कांग्रेजाचे जंगल त्याचा येणारा वास.तीस-चाळीस सेकंदाला माझ्यासारख्या एखाद्या मुलाची जुनी झालेली पण Condition मध्ये असलेली गाडी माझ्या जवळून हळुवार जाते.यांचं आयुष्य किंवा आयुष्यातील एक दशक तरी या कंपन्यामध्ये गेलेलं असतं म्हणून कुठलाही उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या गाडी चालवण्यात दिसत नाही.कुणी पल्सर,करिझमा,सी.बी.झेड,नवीन डिलक्स घेऊन जातांना दिसतो यातले सर्वच नवखे असतात जोराने गाडी दामटवत जातात..!

माझ्यासारखे पैसा वाचवायचा हेतू डोळ्यासमोर ठेवून येणारे मुलं अशीच रस्ते न्याहाळीत आयुष्याचा अन् दीड किलो असलेल्या सेफ्टी बुटाचा भार सोसत पायी चालत असतात.त्यात प्रत्येकाचं वेगळं विश्व असतं,जो तो ज्याच्या त्याच्या विश्वात रममाण असतो.तो चालत असतो रस्त्याच्या एका अंगाला,पुन्हा यात एमआयडीसीमध्ये मंदीच्या सावटाखाली येऊन बंद पडलेल्या कंपन्यांची वेगळी कथा असते.त्यांचे सांगाडे बघितले,त्यांच्या भिंती वर्षानुवर्ष पडीक राहून भिंतीवर उतरलेले जाळे कधी बघितले तर एखादा संवेदनशील मनाच्या माणसाला वेड लागेल इतकं भयाण,नकोसे वाटणारं हे त्या बंद पडलेल्या कंपन्यांचे विश्व अन् तो परिसर असतो..!

मी ही त्या बंद पडलेल्या कंपन्यांना रोज न्याहाळत माझ्या कंपनीची वाट जवळ करत असतो,कधीतरी मंदीच्या विळख्यात माझी कंपनी सापडून तिची घरघर कायमची बंद झाली तर कमीतकमी सहाशे कामगारांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल या विचाराने वेड लागते..!

असे काहीबाही विचार करत मी चालत असतो,एरवी विन केलेला ड्रेस कधीच विनीच्या बाहेर येऊन डोकाऊ लागत असते.ढील्ला झालेला बेल्ट अन् खाली सरकनारी प्यांट चालू चालुमध्ये सावरत पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणली जाते.असं दिवसभर कामाच्या वेळात हे असं कित्येकदा होत असते,कारण या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या निर्व्यसनी पोरांना कंबर असते की नाही माहीत नाही इतके ते बारीक झालेले असतात,व्यसनी पोरांचे अजून अलग विश्व आहे त्यांना कुठलेही सोयरसुतक नसते ते कधीतरी सांगेन..!

दुसऱ्या कंपन्यांना न्याहाळत मी चालत असतो बऱ्यापैकी उंची असल्यानं कंपनीच्या आत काय चालू आहे सगळं डोळ्यांना दिसत असते.कुण्या एका कंपनीत सेकंड शिफ्टसाठी कंत्राटी पद्धतीने कामावर आलेल्या पोरांना नख,डोळे,केस चेक करतांना supervisor कडून झापने चालू आहे.तर कुठे शिक्षा म्हणून सर्व मुलांच्या रिंगणामध्ये घेऊन त्याच्यासाठी टाळ्या वाजवून त्याला लाज वाटावी अन् उद्या तो व्यवस्थित येईल म्हणून लज्जास्पद वागणूक दिली जात आहे..!
हे बरोबरच आहे एमआयडीसीमधील कंपन्यांत काम करायचे असेल तर आधी तुम्हाला डीसीप्लेन असायला हवं,वेळेचं महत्त्व असायला हवं नाहीतर तुम्हाला घरी जाण्यासाठी कंपनीच्या वाटा कायम उघड्या असतात..!

साडेतीन वाजता सुरू होणाऱ्या सेकंड शिफ्टच्या कामासाठी तुम्हाला अडीच वाजताच कंपनीच्या गेटवर राहावे लागते तेही सर्व नियमात बसून,नाहीतर पुन्हा हॉस्टेलवर जायचं अन् रात्री साडेदहा वाजता गेटवर येऊन उभे रहायचे..!

Security Cabin मध्ये तपासणी करून झाली की तुमची सेकंड शिफ्ट सुरू होते एकतर कंपनीच्या आत आल्यावरच तुमचे हातपाय गळून जातात,तळपायाला घाम येतो अन् तो सोक्समध्ये चालताना आपल्याला जाणवतो सुद्धा मग फर्स्ट क्लास नाश्ता करायचा येताना केलेले सर्व विचार कंपनीच्या गेट बाहेर सोडून मस्त कामाला सुरुवात करायची..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...