पळस फुलला..!
पानगळीचे दिवस सुरू झाले अन् डोंगरे-टेकड्या भटकंतीसाठी खुणावू लागल्या होय,हिरवळीच्या दिवसांत शक्यतो मी डोंगरदर्यात फार भटकंती करत नाही.या उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात सर्वदूर झाडांची पाने गळून पडलेली असतात,सर्वदूर डोंगरात त्यांचा सडा असतो..!
सोबत जोड असते ती कोरड्या शुष्क वाऱ्याची,जलदगतीने कानाला ऐकू येणारा वाऱ्याचा सूर-सूर आवाज,मांडीपर्यंत वाळून ढवळे,भुर्के पडलेले तन,सर्व डोंगर शांत,भयाण या दिवसांत भासत असतो.सर्वदूर वाळून गेलेली झाडं अन् त्यांचा तो तपकीरी रंग डोळ्यात साठवून घेत आपण डोंगरातील खाच-खळगे हुडकत फिरत असतो..!
या दिवसात सहज नजरी पडणारी गोष्ट म्हणजे दिमकाची बांबी,का माहीत नाही पण या दिवसात जंगलात गेलं की माझ्यातला बिअर ग्रिल्स जागा होतो अन् दिवसभर एका पाण्याच्या बाटलीच्या सहारे मी या डोंगररानात भटकंती करत असतो..!
गावरानाला,शेताला या दिवसांत गवत संपले असल्यामुळे गावचे गुराखी लोकं,गुरखी कसले पंधरा-सतरा वर्षांची ही पोरं आपले ढोरं,बकऱ्या या डोंगराच्या माथ्यावर घेऊन येतात अन् त्यांना चरायला म्हणून मोकळं सोडून देतात.ते बसतात आपलं न्याहाळत या डोंगररानाला कोणी भिंगोट्याची भिंगरी करून त्याला काटा लावून त्याच्याशी खेळत बसते,कुणी वाळक्या झाडाला उंचावर आपला रेडू अटकवून सागाच्या झाडाच्या सावलीला लोळत पडते,कुणी सांजेला घरी सरपण घेऊन जायचं म्हणून काटक्या धुंडळत फिरत असते..!
दूपारच्याभरी या दिवसात बोडक्या झालेल्या टेकड्या-डोंगरांवर पळसाचे झाड त्याच्या फुलांनी फुलून गेलेले असते.त्याच्या सान्निध्यात जावून त्याचा गारवा अनुभवण्याचं सुख काही वेगळंच,झाडाच्या जवळपासच्या रानात सारा त्याचाच पसारा अन् त्याचाच सुगंध या दिवसात असतो,लाल पळस सहज नजरी पडतो पण पांढरा,पिवळा पळस सहज नजरी पडत नाही तो ही अनेकदा बघितला आहे..!
धूरड्याच्या सणाला या फुलांना तोडून टाकीभर पाण्यात रात्रभर भिजू घातले की सकाळी त्या पाण्याचा रंग बघायचा.पित्राच्या दिवसात आज्याला,बापाला जेवू घालायचं म्हणून कित्येकदा पिंपळाच्या,पळसाच्या पानाची पत्रावळ केली,द्रोण केले.हे सर्व संस्कारच असावे हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपसूकच गेले,शाळेची उजळणी मला जेव्हा पाठ नव्हती तेव्हा बापानं पत्रावळ करायला शिकवलं होतं..!
तालुक्याच्या गावाला राहायला असल्यानं,गावातले लग्नसोहळे फार अनुभवायला नाही आले पण उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा गावाला जायचो तेव्हा मात्र लग्नात मला जेवणापेक्षा त्या टाक घालून खूप सुंदररित्या केलेल्या पत्रावळीचे खूप आकर्षण होते.इतकी सुंदर पत्रावळ आजवर जमली नाही पण हे पत्रावळ शिकण्याचं ज्ञान अजूनही गावाकडे गेलं की घेतच असतो..!
शाळेचं नावच साने गुरुजी असल्यानं "श्यामची आई" पुस्तकातील पत्रावळीची गोष्ट पहिल्या वर्गात होतो तेव्हाच शिक्षकांनी मनावर बिंबवली अन् ती आजतागायत स्मरणात आहे..!
अशीच माझी एक आठवण अजूनही ताजी आहे,पळस म्हंटले की ती आठवण आजही तशीच डोळ्यासमोर येते.मी दुसरी-तिसरीच्या वर्गात असेल तेव्हा मला गालफुगी झालेली मग देवीचा कसला तोडा गळ्यात टाकायचा अन् गालाला देवीची उदी लावायची म्हणून आमच्या तालुक्याच्या गावापासून साधारण पंधरा- वीस किमी असलेल्या कळंकी या गावी आई,मी,ताई,शेजारच्या आज्जी ज्यांचे यजमान या कळंकी गावाला काही वर्ष झेडपीला मास्तर होते असे आम्ही सर्व गेलो.त्यावेळी फार अश्या गाड्या नव्हत्या,कमांडर जीभ होती फक्त.ती दिवसभरात एक-दोन चक्कर मारायची जातांना आम्ही जीभीत बसून गेलो..!
गेल्यावर उपचार झाले गालाला उदी लावली अन् सुतळीच्या एका तोड्याला सात गाठणी मारून तो तोडा माझ्या गळ्यात घालून दिला.मग गावातल्या ओळखीच्या लोकांना भेटून आम्ही गावातून गाडी येईल अन् निघू म्हणून थांबलो एक तास,दोन तास झाले पण गाडी काही येईना झाली मग निघालो पाई म्हंटले फाट्यावर तरी गाडी भेटेल..!
एक अंगुर विकणारा बाबा रस्त्याने भेटला मग अंगुर घेतले अन् खात खात तो डोंगर,टेकड्या असलेल्या रानातून असलेल्या डांबरी रस्त्याने आम्ही पायी चालू लागलो,भर उन्हाळ्याचे,पान गळतीचे दिवस सगळ्या रानातले झाडं सुकून गेलेले,रानातून वाहणारा कोरडा शुष्क वारा,रस्त्यानं पळसाचे असंख्य झाडं त्या डोंगररानात दिसले मग रस्ता सोडून तिकडे भटकत आम्ही गेलो आई,आज्जी रागावते पण आम्ही कसले ऐकतो मग पिशवीत ती फुलं जमा करून घेतले..!
अन् मग रस्त्यानं चालू लागलो फाट्यावर येईस्तोवर सायंकाळ झाली होती,काय करायचं या चिंतेने आम्ही त्या फाट्यावर उभे दूरदूर डोंगररांगा,गाव पण दूर शेवटी वडिलांच्या ओळखीची गावातली एक गाडी आली अन् मग त्यांनी आम्हाला आमच्या तालुक्याच्या गावी आणून सोडले आजही कळंकी गेलं की त्या रस्त्यानं जात असतांना या सर्व आठवणी ताज्या होतात..!
आमच्या शेताच्या गावाला शेताच्या रानात पांदीनेसुद्धा असंख्य पळसाची झाडं आहेत,त्यामुळे पळस आयुष्यात खूप जवळचा वाटला..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा