"जननायक तंट्या भिल्ल" - "बाबा भांड".
"जननायक तंट्या भिल्ल" "बाबा भांड" लिखित हे १२७ पानांचे पुस्तक काल तीन तासात वाचून संपवले.खूप दिवसांची हे पुस्तक वाचण्याची इच्छा होती.
"लाल्या मांग" यांच्या स्मृतीस्थळाला काही दिवसांपूर्वी भेट दिली अन् त्यापूर्वी त्यांचे चरित्र मी वाचून होतोच,सोबतच अनेकवेळा ऐकूनही होतो की "लाल्या मांग" अन् "तंट्या भिल्ल" यांचे चरित्र अन् यांचे जीवन कुठेतरी एका सारख्याच कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं..!
याचसाठी मलाही "तंट्या भिल्ल" यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती अन् काल या पुस्तकातून ती पूर्णत्वास आली.दोघांचा शेवट हृदयाला स्पर्शून अन् चटके लावून जाणारा असा आहे.
थोडक्यात पुस्तकाबद्दल अन् त्यांच्या आयुष्याबद्दल लिहण्याचा प्रयत्न करतो आहे.
तंट्या भिल्ल हा अठराशेच्या शतकातील आदिवासी नायक तो स्वभावाने खूप साधा- भोळा अन् मेहनती होता.त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकविली अन् पुढे कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्यास खोट्या गुन्ह्यात अडकवले,ज्यात तंट्यास एक वर्षाची शिक्षा झाली..!
शिक्षा भोगून आलेला तंट्या मोलमजुरी करू लागला परंतु पुन्हा गावकऱ्यांनी पाटलाच्या मुलीच्या प्रेम संबंधाचा आरोप करून त्याला हुसकावून लावले अन् दुसऱ्यावेळी पुन्हा खोटा आरोप ठेवून जेलमध्ये डांबलं..!
माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱ्या तंट्याला जमीन हडपणारे पाटील,मालगुजर,त्यांना साथ देणारे सावकार अन् पोलीस प्रशासन यंत्रणेने त्याचे जगणे असह्य केले होते.पुढे अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला..!
आपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी त्याने लढा सुरू केला.अन् तो तात्याचा तंट्या झाला.त्याच्यावर होणारा अन्याय बघून काही मित्रांच्या संगतीने मग तो मालगुजरांच्या घरावर धाडी टाकू लागला,त्यांचे घरं लुटू लागला त्यातून गरिबांना मदत करू लागला.गरिबांना शेती कसण्यासाठी पैका देऊ लागला,शेती नसलेल्या गरिबांना धान्य देऊ लागला,दुष्काळात गरीब जनतेला मदत करू लागला,गरिबांच्या लेकीचे लग्न करून देण्यासाठी त्यांना मदत करू लागला..!
त्याच्यावर कुणी अन्याय केला की तो त्याच्या जोडीदारासोबत जावून रातोरात त्यांचे घरे जाळून टाकत असायचा,उभे आयुष्य त्याला त्रास देणाऱ्या पाटील,मालगुजरांच्या घरी जावून त्यांच्याकडून पैसे लुटू लागला अन् त्या पैशांतून तो गरिबांची मदत करू लागला.त्यामुळे गावात त्याच्याबद्दल एक आदर निर्माण झाला होता,पोलीस आले की त्याच्याबद्दल त्यांना कुणीही खरी माहिती सांगत नसायचे..!
खान्देश आणि नर्मदा खोऱ्यात असलेल्या दोनशे किलोमीटर डोंगर रांगेत तो दर्या,खोऱ्यात लपून राहू लागला.आपल्या आयुष्यातील ११ वर्ष तो सतत डोंगरवाटांनी पळत होता यामुळे या भागातील कोपरा अन् कोपरा वाट अन् वाट त्याला माहिती झालेली होती.वेशांतर करून पळून जाण्यास तो फार पटाईत होता..!
या सर्व त्याच्या कारवायांना कंटाळून तंट्याला पकडून देणाऱ्याला ब्रिटिश सरकार १०,५०० रुपयांचे आणि २५०० एकर शेती देण्याचे बक्षीस जाहीर करते.पोलिसांमध्ये "तंट्या दलाची" स्वतंत्र फौज निर्माण करते..!
जेव्हा वयाची चाळीशी पूर्ण झाली तेव्हा त्याला वार्धक्य आल्यासारखे होते आपले उभे आयुष्य तो पळत होता,आता त्याचे शरीर त्याला साथ देत नव्हते,त्याचे मन विचलित झाले होते,त्याला आता वाटू लागले होते की होळकरांच्या आश्रयाला जावून आता आपण चाकरी करावी मेहनत करावी,उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबासोबत जगावं यासाठी तो विचार करू लागतो..!
रक्षाबंधनच्या दिवशी तो त्याच्या मानलेल्या बहिणीकडे जातो अन् त्याच्या दाजीला हे सर्व सांगतो त्याचे दाजी पैशांच्या लालसेपोटी त्याला फसवतात अन् ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात देतात..!
पुढे त्याच्यावर खटला भरवला जातो,खोट्या आरोपावर त्याला फाशीची शिक्षा सूनवली जाते अन् ३ डिसेंबर १८८९ रोजी त्याला जबलपूर येथील सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात येते..!
आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा तंट्या पहिला नायक होतो,तंट्याने दोन्ही भागातील खान्देश आणि नर्मदा खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागवली होती..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा