बुकशेल्फमधल्या गोष्टी..!
भर दुपारची वेळ दरवाज्याला असलेला पडदा हलतो,उन्हाच्या झळा,किरणे घराच्या आत येतात.पुन्हा पडदा वाऱ्याच्या संगतीने हलतो पुन्हा घरात काही काळ ओझरता काळोख येतो,गारवा येतो.भर दुपार ही अशीच ऊन सावलीचा खेळ करत निघून जायला येते..!
आईची कामे आवरले की आई पंख्याच्या गारव्याखाली जुनाट झालेल्या कपड्यांचे गाठोडे काढते अन् फाटलेली,अंगाला आपरी झालेली कापडं जोडून आई गोधडी शिवायला घेते.मी आईला सुई ओवून देतो,साडीचं माप काढुन देतो,शिवताना शिवलेले एका ओळीत यावे म्हणून फोडलेल्या बोळक्याचा खडू करून त्या साडीवर रेषा पाडून देतो अन् आई जुन्या ओव्या म्हणत शिवत राहते गोधडी..!
दिवसभर मी सुई ओवून देतो,आई शिवत राहते.मी बसलेलो असतो विंडोग्रीलच्या शेजारी असलेल्या कॉटवर हातात पुस्तक घेऊन,पुस्तकातील एक एक पान वाचून होत राहतं,आईची दर तिसऱ्या पानाला गोधडी शिवायची एक ओळ पूर्ण होत राहते.माझ्या मनात असंख्य विचार चालू असतात,आईच्या ओव्या माझ्या विचारागानिक बदलत असतात..!
आई गोधडी शिवत असते,मी पुस्तक वाचत असतो,आई ओव्या गात असते,मी कवितांना घेऊन विचार करत असतो.जगण्यात आलेल्या हळुवारपणाला घेऊन मी पुन्हा विचार करत असतो.
विंडोग्रीलच्या पल्ल्याड असलेल्या जगात कुंडीत लावलेल्या रातराणीच्या वेलीजवळ चिमण्यांचा घरटे बांधण्याचा खेळ चालू असतो,ती चिमणी कुठून कचरा,काड्या,कापूस जमा करून तिचं घरटं विनवत असते,आई गोधडी शिवत असते,आई आईचं घरटं विनत असते,आई आईचा संसार फुलवत असते..!
मी पुस्तक वाचत असतो,बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्या ईसमास न्याहाळत असतो.अनोळखी माणसांचे चेहरे वाचत असतो,त्यांच्यात ओळखीचा माणूस शोधत असतो,ओळखीचे माणसे दिसत असतात पण त्यांच्या आपल्याला बघून अनोळखी झालेल्या नजरा अन् त्यात मला पडलेल्या प्रश्नांना मी उत्तर शोधत असतो..!
चारची वेळ होते मी ट्रेमध्ये चहाचा कप,ग्लासात पाणी घेऊन आई समोर उभा असतो,आईच्या चेहऱ्यावर माझे गोधडी शिवत असतांना सापडलेले बालपणीचे कपडे बघून माझं बाळ किती मोठं झालं हा भाव असतो.आई गोधडी शिवत असते बाहेर चिमणी तिच्या पिल्लांसाठी घरटं बांधत असते..!
पाचच्या ठोक्याला आई सांजेच्या झाडझुडीला लागते मी पुस्तकाचं एक पान अलगद दुमडवून पुस्तकाला बुकशेल्फमध्ये ठेऊन फ्रेश होवून सायंकाळच्या भटकंतीसाठी निघतो.
दूरदूर लाल मातीच्या वाटा,अनोळखी माणसांचा सहवास असतो,मी पावलागणिक स्वतःचा,आयुष्याचा विचार करत चालत असतो.समोरून ओळखीत असलेले मित्रही येऊन जात आहे,मी चेहऱ्यावर स्मित हास्य आणत त्यांनाही येतो म्हणून चालत राहतो,वयस्कर आजी,आजोबांचा एकमेकांना या वयात आधार होवून चालत राहतात.माझ्याच वयाची एखाददुसरी तरुण मुलगी जी रोजच दिसते,नजरेला नजर भिडवून तीही अलवार स्मित हास्य करून जवळून निघून जात असते.
मी माझ्या विचारात गर्क असतो,रोजचीच ही अनोळखी माणसे यावेळी इथे भेटणारी पण त्यांचा त्या स्मित हास्याने ओळखीची वाटू लागतात,मी त्यांचा विचार करू लागतो,पुढे वळणावर काही क्षणांचा विसावा घेऊन मी पुन्हा चालू लागतो..!
पुढे याच वळणांच्या रस्त्याने पस्तिशितील दोन नुकतेच दोन-अडीच वर्षांपूर्वी बाप झालेले तरुण बाप भेटतात,एकाला एक अडीच वर्षांची मुलगा आहे तर एकाला दोन वर्षांची मुलगी.दोघेही नुकतेच चालायला लागले असल्यानं,बापाच्या करंगळीत आपला इवलुसा हात घालून या वळणांच्या रस्त्याने चालत असतात,दोघे बाप एकमेकांना बोलत असतात..!
दोन्ही मुलांच्या बोबड्या प्रश्नांचे उत्तर देत असतात,रस्त्यानं गाडी आली की आपल्या गप्पा आवरत्या घेऊन त्यांच्या मुलांना सावरून पुन्हा जवळ घेत असतात,मी ही त्यांच्या माघारी त्या इवलुश्या बुटांच्यामधल्या पायांना चालतांना बघत चालत असतो..!
सूर्य अस्ताला जातो मी पुन्हा घराच्या ओढीने परतीच्या वाटेला लागतो,हातचे असेल तर सोसायटीमधले स्ट्रीट लाईटचे स्विच चालू करूत येतो.ते आजोबा,आजी,ती तरुण मित्र,ती मैत्रीण,ते दोन बाप,ती दोन लहानगे सर्व मागे पडते अन मी घर जवळ करतो,घरी चिमणीची चिवचिव ऐकू येत नाही,रस्त्यानं अनोळखी माणसे दिसतात पण ती ओळखीची वाटून गल्लत होते..!
घरात येतो आईनं अधुरी शिवलेली गोधडी वळकटी करून उदयाला ठेवलेली असते,आई देव्हाऱ्यात,तुळशी वृंदावनात दिवा लावत असते.मी फ्रेश होवून पुन्हा विंडीग्रीलमधून बाहेरचं जग न्याहाळत विचार करत असतो,विचार करत असतो.आता आईनं कॉफीचा मग हातात आणून दिलेला असतो अन् मी पुन्हा दिवसभराचा विचार करत असतो..!
तितक्यात बुकशेल्फमधल्या पान दुमडून ठेवलेल्या पुस्तकाची आठवण येते,आयुष्यात आजच्या दिवसाचे एक पान दुमडून पुन्हा आयुष्याच्या बुकशेल्फमध्ये ठेवल्या जातं..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा