माझी सायंकाळ..!
सायंकाळची वेळ पावलं या छोट्या छोट्या टेकड्यांकडे कुच करतात,मनात असंख्य प्रश्न असतात,रस्त्यानं अनेक अनोळखी चेहरे दिसत असतात.कधीतरी मनात विचार येऊन जातो की या अनोळखी व्यक्तींशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या,बोलतं व्हावं त्यांच्याशी.परंतु पुढच्या क्षणाला हे ही कळून चुकते की,जितका सहज आपण विचार करतो तितकं सहज हे जग नाही,या जगाची अन् जगण्याची येथील माणसांची रित खूप वेगळी आहे..!
मग कित्येकदा आपल्याच मनाच्या प्रश्नांना आपणच उत्तर द्यावी,वेड्या मनाला समजूत घालावी अन् आजची सायंकाळ,आजच आपलं संपू्ण जाणं उद्यावर येऊन ठेपल्या जातं इतकंच.छान असतं हे आपल्या विश्वात आपण रममाण राहून आपली प्रश्न सोडवणे.अस्ताला जाणारा सूर्य जसजसा अस्ताला जात असतो तसेतसे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो अन् काळोखात आपल्या आयुष्यात उद्याची कोवळी किरणं आजच्या सांजेला येऊ बघतात..!
इतकंच..!
मनाची असलेली अवस्था लिखाणात कैद करणं फार अवघड म्हणून अलीकडे त्या अवस्थेला घेऊन लिहने टाळतो.
छान आहे अस्ताला जाणारा सूर्य,सांजेच्या वेळी आसमंतात घिरट्या घालणारे पक्षी,दूरवर आपल्या विचारात मग्न राहून सायंकाळी फिरायला येणारे वाटसरू,स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं अस्तित्व शोधणारी माझ्यासारखी एकावेळी दोन आयुष्य जगणारी मित्र,वाऱ्याच्या झुळकेने हवेच्या तालावर नाचत असणारं तृण,निळसर छटा असलेली आकाशी सुंदर फुलं,लाल मातीची अन् काळया खडकांची टेकडी अन् टेकडीच्या उतारावर दूरपर्यंत दिसणाऱ्या पायवाटा ओळखीच्या असूनही अनोळखी भासणाऱ्या..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा