गाव रहाटीचं जगणं..!
भर दुपारची वेळ उन्हं अंगावर येतात अश्यावेळी गावाची ओढ लागते अन् गावाकडच्या आठवणी जाग्या होतात..!
त्यामुळं अश्या सुट्टीच्या दिवशी गावाला येऊन जातो अन् दिवसभर गाव भटकून मनात खूप आतपर्यंत गावाला सामावून घेतो.जेव्हा पुन्हा शहराला जाईल तेव्हा या गावाकडल्या आठवणींवर मग काही दिवस या गाव रहाटीच्या जगण्याचं सुख विचारांनी की होईना अनुभवता येतं..!
तर भर दुपारची वेळ,गावातले गडी लोकं या दुपारच्या वेळेला रानात गेलेली असतात.परंतु अश्यावेळी गावात जे कुणी असतं तेच आपल्याला हे गावपण जगण्याचं अन् ते अनुभवण्याचं सुख काय असतं ते सांगत असतात,त्यामुळे मी ही बहुतेकदा दुपारच्या या वेळेलाच गावात जात असतो..!
पिंपळाच्या झाडाला चहूकडे बांधलेल्या पारावर अनुभवाची शिदोरी घेऊन बसलेली असतात गावातील वयस्कर मायबाप.त्यांना बघून असं वाटतं की,दुपारचा गावाला पहारा म्हणून ही बसलेली असावी.प्रत्येकाची एक आठवण अन् त्यांच्या आयुष्यात सध्या आलेला निवांतपणा मग पारावर बसून ही प्रत्येकाच्या आयुष्याची कथा सगळ्यांच्या समवेत वाचली जाते,ऐकली जाते.त्या आठवणींना उजाळा देतांना आपल्या जोडीदाराच्या सोनेरी आठवणी ते सोनेरी दिवस..!
कुणी ऐकत असतो,कुणी दुजोरा देत असतो,कुणी आपल्या फेट्याचा शेला डोक्यावरून काढून त्याची उशी करून निपचित पडलेला असतो आसमंताकडे बघत,त्या आसमंताला डोळ्यात भरून घेत.कुणी देउळाच्या पायरीवर झोपलेला असतो,कुणी हितगुज घालत असतो,कुणी पंढरीच्या वारीची आठवण काढीत असतो तर कुणी विठू माउलीच्या नावाचे नामस्मरण करत डोळे लावून भिंतीला पाठ लावून बसलेला असतो..!
मग आपणही पारावर बसून रहावं,डोळ्यात भरून घ्यावं हे क्षणिक सुख,शिवनामायच्या पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला नजरेत भरून घेत रहावं,तिचं संथपणे वाहणं मला माझ्या आयुष्यात आलेल्या संथपणाची आठवण करून देत असतं..!
मग तिच्या प्रवाहाला न्याहाळत कित्येकदा आयुष्याच्या गणिताला जुळवून बघितल्या जातं,आयुष्याला घेऊन पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधली जातात..!
दुपारच्याभरी तिच्या पाण्यात मासे पकडणारा मच्छिमार असो किंवा देउळात देवाचं नामस्मरण करणारे ते आजोबा हे मग मला एकच जीव असल्याचा भास होतो.नदीच्या तीरावर असलेल्या गुलमोहरच्या झाडावर असलेला पक्षांचा किलबिलाट,पान गळतीचा मोसम असल्यानं झाडांवरील पानांची होणारी पानगळ बघितली जितकं सहज एखादं पान झाडावरून गळून पडत आहे तितक्याच सहज या देउळात असलेल्या माझ्या आजोबांच्या मधील एखाद्या आजोबांच्या आयुष्याचा शेवट होतांना मी बघितला आहे जो खूप वेदनादायी आहे.त्यामुळं जितकी ही दुपार मला हवीहवीशी वाटते तितकीच ती जिव्हारी लागणारीही वाटते..!
मग कधीतरी अंगावर येणारी दुपार,गावात घरोघर ओट्यावर झोपलेल्या म्हाताऱ्या,घरामोहरच्या पटांगणात आता वाळवणाचे दिवस असल्यानं वाळू घातलेली वाळवणं..!
भकास वाहणारा वारा,संथपणे वाहणारं शिवनामायचे पाणी,देउळ कडी-कुलपात बंद असूनही देउळात झोपलेली माझी माऊली,पारावर गप्पा झोडून दमलेले मायबाप शांत पहुडले आहे.त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान,बेवारशी पडलेल्या त्यांच्या वाहणा अन् भटकनारे भटके कुत्रे अन् आयुष्याला घेऊन पडलेले कित्येक प्रश्न..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा