मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!


अलीकडे पहाटेची उन्हं अंगावर यायला लागली आहे काहीच करावेसे वाटत नाही,हातपाय गळून जातात.फक्त मनसोक्त झोपून रहावं,नाहीतर पुस्तकं वाचत निपचित पडून राहावं असं वाटतं.कधी तंद्री लागलीच तर हातात पेन घेऊन किंवा ब्लॉगवर काहीतरी टाईप करत बसावे वाटते,या दिवसातली सकाळ खूप कंटाळवाणी,उदास वाटणारी अन् काहीही करायला नकोसं वाटणारी असते..!

पण काही दिवसांना पर्याय नसतो,मग अंगातला आळस झटकून पुढच्या कामाला लागावेच लागते.इतकं सर्व असूनही माझ्या मनात जेव्हा औद्योगिक वसाहतीत भटकंती करायला जायचं आहे हा विचार मनात आला की मी लगेच तयार होवून औद्योगिक वसाहतीच्या भरदुपारी काहिलीच्या ऊन्हात,सूनसान वाटणाऱ्या वाटांना भटकंती करायला निघून जातो..!

मला या वाटांशी का इतका लगाव आहे किंवा का मला इतकी जवळीक त्यांच्याबद्दल वाटते हे मला आजवर कळले नाहीये.काहीही साध्य करायचं नसतांना फक्त भटकंती करायची म्हणून कित्येक दिवस मी या अवाढव्य शहराच्या सभोवताली असलेल्या औद्योगिक वसाहतीत पायीपायी भटकंती करत आडमार्गे भटकत राहिलो आहे..!

उन्हाळ्याच्या या दिवसात असच वाळलेल्या,भुरक्या पांढऱ्याफट्ट पडलेल्या रानात हिंडायला मला खूप आवडतं,अश्यावेळी डोक्यातून घरंगळत येणाऱ्या घामांचे ओघळ घामेजलेल्या हातांनी टिपायला खूप आवडते.दीड किलो असलेल्या सेफ्टी बुटात घातलेल्या सोक्सच्या आत घामाने होणाऱ्या चिखलाला अनुभवायला आवडते..!

इकडं भटकायला आलं की आपली दुःखे आपली न राहता ती इतरांची होतात अन् इतरांची दुःख आपली होतात.इथे त्रासलेल्या माणसांच्या नजरा आपल्याला खुणावू लागतात अन् आपल्यातला माणूस जागा होतो.इतरांची दुःखे आपली वाटायला लागतात अन् आपण विचाराने अधिकच परिपक्व होत जातो,त्यामुळे  महिना-पंधरा दिवस झाले की मी असं भटकून येतो पाच-सहा तास..!

औद्योगिक वसाहतीत बावीस-पंचवीस वर्षांची माझ्या वयातली भंगार वेचनारी मुलं मला दिसली की मी दिवसभर त्यांच्यामागे भटकत असतो.त्यांचं जीवन,त्यांच्या जगण्यातले अवघडलेपण अनुभवत असतो.दिवसभर भंगार,जुनाट,बंद पडलेल्या कंपन्यांच्या आवारात ही पोरं जवळपास भटकत असतात.पायात असलेली सिल्पर चप्पल,विस्कटलेले केसं,उन्हातान्हात भटकून-भटकून पार काळीठीक्कूर पडलेली असतात.त्यांच्याकडे बघून अस्वस्थ व्हायला होतं,ऐन उमेदीच्या वयात आपण काय करतो आहे असा प्रश्न त्यांना बघून मला पडतो..!

उन्हातान्हात भटकत रहायचं जुन्या बंद पडलेल्या कंपन्या बघत,त्यांना बघितलं,त्यांच्या मोडकळीस आलेल्या ईमारती बघितल्या की आपसूकच त्यांचा भविष्यकाळ अन् त्या काळाच्या पुसट झालेल्या खुणा त्या भिंतीवरील ओघळांवरून दिसून येतात..!
कुठे क्षणभराचा गारवा अनुभवयाला येतो पण या गारव्यात पुढे कंपनी बंद पडून बरबाद झालेली ती पिढी तिचा वाईट काळ आठवतो अन् जशी औद्योगिक वसाहतीत यंत्रांची घडघड ऐकायला येते तशी हृदयाची स्पंदने मग स्पष्टच या गारव्यात ऐकायला येतात अन् पुन्हा एक ओघळ घरंगळत मानेवरून बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात मातीमोल मातीचा होतो जशी ती पिढी अवघे आयुष्य सोसत मातीमोल मातीची होत गेलेली असते..!

बराचवेळ भटकून झालं की एखाद्या चालू असलेल्या विदेशी कंपनीच्या गेटवर येऊन तिच्या गेटजवळ बांधलेल्या कठड्यावर येऊन बसतो,जिथं दर दोन-तीन घंटे झाले की पाण्याचा फवारा आणून नळीने सडा मारला जातो.मग तिथं जरावेळ बसून गारवा अनुभवत रहायचं पण इथेही आमच्या नशिबी बसणं लिहलेले नसते,सेक्युरिटी गार्ड बाबा धावतच येतो हकलवून लावतो मग उसने हसू घेऊन तिथून काढता पाय घेतला की निघायचं डांबरी सूंनसांन रस्त्याला..!
 
एखादी नाश्ता करायची खानावळ दिसली की मळकटलेल्या चड्डीच्या खिशातून दहाची चिल्लर काढायची अन् वडापाव घेऊन खात बसायचं बाकड्यावर.तिथं बसणंही आमच्या नशिबी कुठं,लोकं हकलवून लावतात साले..!

दुनियादारी शिकवते ही औद्योगिक वसाहत त्यामुळे असं भटकून घेतो कधी कधी..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...