पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!
सकाळच्या उदासवाण्या वेळेत पहाटेच उठून आवरून सावरून बसलं की जसजसा उन्हाचा पारा चढत जातो तसतसे शरीरात मरगळ येत जाते,दिवस नकोसा वाटतो,झोप हवीहवीशी वाटते मग पुन्हा कितीक वेळ निपचित त्राण गेल्यासारखे कॉटवर पडून असतो..!
उन्हं अंगावर यायला लागले की पुन्हा जाग येते,संथपणे वाहणारा कोरडा शुष्क वारा नकोसा वाटतो.मी खूप जीवावर करून एखादं अधुरं वाचनाचं पुस्तक हातात घेतलं,तसं आता हातच्याला असलेली सर्वच पुस्तके वाचून संपवली आहे नवीन घेतले किंवा भेटले तर ते वाचूनच मी पूर्ण थांबतो म्हणून वाचन करावं किंवा वाटावं असं सध्यातरी घरात काही नाही,मग जे मिळेल ते वाचत बसतो..!
जशी राक्षसाला खाण्याची भूक असते तशी मला अलीकडे अर्थपूर्ण वाचनाची भूक लागली आहे,जी दिवसेंदिवस वाढत आहे.सध्या आयुष्यात बराच निवांतपणा आहे त्यामुळं असावं कदाचित.पुढे चालून व्यस्थतेच्या काळात सुद्धा ही भूक अशीच वाढत राहील असे वाटते आहे,शरीराला मनाला ती सवय लावून घ्यायची आहे..!
माझी ईच्छा इतकीच आहे आपण इतकी पुस्तके वाचावी,घरात संग्रही करावी की घरात आपल्या वाचनाने समाजातील माहित नाही पण आपल्या घरातील पुढच्या पिढ्या तरी आपली ही सवय आपल्याला बघून त्यांच्या अंगवळणी पाडून घेतील..!
त्यावेळी आपल्याला जी पुस्तकासाठी,पुस्तक मिळविण्यासाठी जे सोसायला लागलं,ते त्यांच्या वाट्याला नको यायला म्हणून सोबतीने त्यांच्यासाठी खूप मोठा संग्रह घरात पुस्तकांचा असावा ही माझी इच्छा आहे.कारण समाज व्यवस्थेकडून पुढची पिढी संस्कारशील घडणं मलातरी अशक्य वाटते कारणे मी सांगायला नको आहे,त्यामुळं पुस्तकवाचन हेच एक माध्यम सध्यातरी मला जवळचे वाटते..!
मी पुस्तक वाचत असतो,खिडकीतून अनेक आवाज ऐकू येत असतात कुणी भंगारवाला,भाजीपाला विकणारी बाई,केसांवर भांडे देऊ करणारे मुलं,महामार्गावर असलेल्या वर्दळीचा आवाज,गॅलरीत चिमण्यांचा दाने टिपत असताना येणारा आवाज असं सर्व काही ऐकू येत असतं अन् मी आपलं वाचन करत असतांना एकावेळी दोन विश्व अनुभवत असतो एक प्रत्यक्षातले अन् एक पुस्तकातले..!
काल शिवनामायला भेट देऊन आलो,संथ वाहणारी शिवनामाय बऱ्याचवेळ डोळ्यात भरवून घेतली मनात विचार येऊन गेला तिच्या किनाऱ्यावर बसायला एखादा बँच भेटला असता तर कित्येक पुस्तकांचा शेवट तिच्या सानिध्यात करता आला असता.तिथं नसतो कुठला आवाज किंवा कुणी हाक देणारं फक्त तिचं संथपणे वाहनं,या कडाक्याच्या दिवसात अनुभवायला येणारा गारवा,चहूकडे असलेली झाडांची हिरवळ अन् निसर्ग सौंदर्य खरच नदीचं सौंदर्य तिच्या आसपासचा परिसर वेड लावतो..!
जर आयुष्यात सर्व ठरल्याप्रमाणे झालं तर आयुष्याचा शेवटचा काही काळ नदीच्या तीरावर एकट्यासाठी एक छान टुमदार घर बांधून तिथं खूप काही वाचन करून दोन-तीन पुस्तकं लिहण्याची इच्छा आहे.जे माझ्यानंतर माझी ओळख बनावी,सध्यातरी आयुष्यात जरतरला महत्त्व नाहीये पण हे होईल हे नक्की..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा