वास्तव्य समुद्र किनारचे..!
भर सकाळची वेळ कोवळी उन्हं अंगावर येतात,घराच्या सभोवताली असलेल्या पाडांच्या झाडावर गळतीस आलेल्या,वाळलेल्या झावळ्यांचा आवाज झोपल्या ठिकाणी येतो.वाऱ्याचा सुरसुर करणारा आवाज अन त्याच्या लगोलग असलेला समुद्रकिनारी घर असल्यानं पहाटे-पहाटे समुद्राच्या गाजेचा येणारा आवाज झोपेत हे सर्वच संगीत ऐकत मी निपचित पडलेलो असतो..!
समुद्र किनाऱ्याशी समीप असलेल्या,झोपडीवजा घरं असलेल्या घरातील किंवा ऐसपेस बंगले असलेल्या घरांची पहाट काही हळुवारच होत असते.त्यांच्या आयुष्यात एक हळुवारपण आलेलं असतं,समुद्राला घेऊन एक आपलेपण असतं,रोजचं भटकणं असो किंवा आयुष्याला घेऊन आयुष्याचे स्वगत करताना आपसूकच समुद्र अन त्याच्या सानिध्यात घातलेली सकाळ असो किंवा सायंकाळ हवीहवीशी वाटणारी असते..!
मला नेहमीच समुद्र किनारी असलेल्या सभोवतालच्या परिसरात काळोख अधिकच गडद असल्याची अनामिक जाणीव होत असते,जी सभोवताली असलेल्या महादेवाच्या देऊळात अजूनच प्रकर्षाने जाणवते.एक प्रकारचं दमट वातावरण,देऊळाच्या सभोवताली वाहणारा गोड्या पाण्याचा झरा असं काही मनात समुद्र किनारा आला की त्याच्या लागून माझ्या मनात येणारं हे चित्र आहे..!
समुद्र किनारी वास्तव्याला गेलं की,एक हळुवारपण आयुष्यात येतं.सायंकाळी आपसुकच पावले किनाऱ्यावर कित्येकवेळ घुटमळत राहतात,समुद्राला जाणून घ्यायला,तेथील नावाड्यांचा सायंकाळचा प्रवास,जाळ्यांची विन सुटत असतांना बघितले की मला अस्वस्थ व्हायला होतं.होडीला तिला तिच्या रंगसंगतीने सजविलेले असते ते बघायला आवडते,तिला बघत असतांना समुद्राची गाज माझ्या अंगावर येते ती नकोशी वाटते पण अथांग समुद्र हवाहवासा वाटतो,डोळ्यांना जिथवर दिसेल तिथवर तो नजरेत भरून घ्यायला आवडतो,त्याच्या सानिध्यात अस्ताला जाणारा मावळता सूर्य बघायला आवडतो..!
पुन्हा झोपडीवजा असलेल्या घरातून घासलेटाच्या इंधनावर चालणाऱ्या अन् मिनमिन करणाऱ्या चिमणीच्या उजेडात मोडकळीस आलेल्या खिडकीतून तो अंधारलेला समुद्र अन् त्याची गाझ ऐकायला भारी वाटतं.त्याच्यासोबत ताटलीत साखरभात घेऊन खिडकीत बसून खायला आवडतं..!
खिडकीत बसून समुद्राचा विचार करत असलो की काळोख अधिकच गडद होत जातो अन् मला मग समुद्राच्या सभोवताली घडलेल्या असंख्य कथा,वाचलेली पुस्तके अन् त्यातील प्रसंग आठवायला लागतात.मला एक प्रश्न नेहमीच पडत असतो,येथील माणसं आपल्या स्वतःच्या आयुष्यात इतकी कशी रममाण असतात,कामाखेरीच फार वेळ ही माणसं आपलं स्वतःचं आयुष्य अन् माडाच्या झावळ्यांच्या सहवासात घालवत असतात.माड त्यांना खूप काही देतो पण माड त्यांचं आयुष्य होवू शकत नाहीयेना,तरीही या माणसांची पहाट ही त्याच्या सानिध्यातच होते..!
बाकी कौलारू घरं,माडाची उंच उंच झाडं,घराच्या सभोवताली दाटून आलेला काळोख,समुद्राची गाज,होड्यांचा समुद्रातून परतीच्या वाटेवर येतांना येणारा आवाज,रापणीच्या वेळी जाळे टाकतांनी होणारी फजिती,अंगावर येणारा वारा,जाळ्यात तडफडणारी मासे,विविध रंगसंगतीचे झोपडीवजा घरे,होड्या,होड्यांचा चालू होताना इंजिनाचा होणारा आवाज अन् समुद्राला न्याहाळत रममाण झालेलो मी..!
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा