बोलके शहर..!
शहरातली दुपार अंगावर येते,भर दुपारच्या काहीलीच्या उन्हात मी चालत राहतो,एअरपोर्टजवळ असलेल्या गल्ली बोळातून,सोसायटीच्या अनोळखी रस्त्यांवरून जेव्हा एअरपोर्टच्या समोर असलेल्या महामार्गावर जेव्हा येतो तेव्हा आयुष्याला घेऊन मी अधिकच विचार करायला लागतो..!
रस्त्यानं चालत असताना एकीकडे दहा-पंधरा आलिशान गाड्यांचा ताफा जवळून जातो,त्यांचे वाजणारे सायरन कुण्या बड्या नेत्याची त्या पंधरा गाड्यांच्यामध्ये कुठली एक असावी.
मी महामार्गावर चालत असतो,एअरपोर्ट समोर रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकर जवळ गाड्या स्लो होतात अन् माझ्याही पावलांची चालण्याची गती मंदावते,सर्व गाड्या एका पोटोपाट एअरपोर्टच्या गेटवरील वॉचमन त्यांना हजेरी देतो अन् एका पाठोपाठ सगळ्या गाड्या आत जातात,कर्कश्य वाजणारे सायरन शांत होतात..!
पुन्हा सर्व पूर्ववत होते अन् वाहणारा रस्ता पुन्हा वाहू लागतो,आयुष्याला घेऊन मी करत असलेले विचार पुन्हा सुरू होतात.रस्त्यांच्या पल्ल्याड रस्त्याला खेटून असलेल्या झोपड्या त्यांच्यात फुलेला गरिबांचा संसार गेली वर्षानुवर्ष मी बघत आहे.कित्येकदा तिथं पोहचले की पावले थबकतात पण शहरात राहायला आलो तसं मी यांत्रिक उपकरण असल्यासारखा घड्याळाच्या काट्यावर चालू लागलो आहे.त्यामुळे कित्येकदा ठरवूनही वेळेअभावी इथे थांबणे होत नाही,त्यांचा तो संसार डोळ्यात भरून त्यांच्या व्यथा मला माझ्या करता येत नाही..!
मग असच कधीतरी शनिवारी,रविवारी सुट्टीच्या दिवशी त्या रस्त्यालगत चौथऱ्यावर जावून बसतो,न्याहाळत त्यांचं आयुष्य.कुणी भर उन्हात झोपडीमध्ये विसावलेल असतं तर कुणी भाकर खात असतं तर लहानगे मातीशी खेळत असतात तर कुणी झाडांच्या कलमा विकत असते तर कुणी शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले छोटे-छोटे पुतळे विकत असतो,कुणी अलीकडे गरिबांचा घरातले फ्रिज म्हणजेच मडके(माट) विकत असतो कुणी लहान मुलांना हवे असलेले बाहुले विकत असतो तर कुणी काय तर कुणी काय..!
एक दिवस त्या पुतळे विकणाऱ्यांना सहज विचारलं भाई ये जो पुतले तूम बेचते हो वह इंसान को पहचांनते हो,कौन है यह..!
त्यानं त्यांचं नाव सांगितले हात लावून त्या पुतळ्यांना,सगळीच बरोबर होती पुढे त्याला म्हंटले उन्होंने क्या किया कुछ बता सकते हो..!
त्यानं पुढे उत्तर दिले मै तो कुछ सिखा नही हू तुम्हारे जैसा..!
इतना मालूंम है,यह बहोत बडे पुरुष है उन्होने बहोत कुछ अपने देश,समाज केलिये किया है,जिससे हम सब उनपर गर्व करते हैं..!
पुढे जे वाक्य तो बोलला ते गर्व करण्यासारखे होते की,
और आज भी लोग ईन महान लोगोंके पुतले खरीदके हमारे रोजीरोटी का इंतजाम करते हैं तो वह आज भी जीवित है..!
अजुन पुढे तो खूप बोलला पण इतकचं उत्तर मलाही हवं होतं अन् मग मी गप्पांचा ओघ सावरत पुढे निघालो..!
शहरं बोलत असतात पण त्यांना बोलके करणारे आपण असायला हवं.त्यांच्या बोलण्याची भाषा आपल्याला उमगली की आपसूकच असे माणसं आपल्याला पावलोपावली भेटत असतात.मग प्रत्येक त्या आपल्या डोळ्यांच्यासमोर चालणाऱ्या माणसाला आपण न्याहाळत,त्यांच्या अंतरंगात आपण डोकावून बघत असतो..!
मी चालत असतो इतक्यात पुन्हा Ambulanceचा आवाज कानी पडतो पुन्हा वर्तमान काही काळासाठी थांबते,कुणाचा जन्म झालेला असतो किंवा कुणी सोडून गेलेला असतो.
कंपनीत जाणारी हडकुळी पोरं दिसली की त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तणाव आपल्याशी बोलू लागतो,असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण त्यांना पडलेल्या प्रश्नांना देऊ शकत असतो पण इथे संवाद खुंटलेले असतात.कुणी बाई लोटगाडीवर नारळपाणी विकत असते कुणाच्या जन्म-मरणाचा ती इथेच सौदा करत असते.कारण तिचंही एक आखेलेलं आयुष्य असतं,कुणी वडापावच्या गाडीवर बसून वडापाव खात असते आजचा दिवस ढकलला यांचा आनंद पण उद्याच्या दिवसाची चिंता त्याच्या चेहऱ्यावर असते..!
दारू पिऊन खंगलेले शरीर घेऊन रोडाच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर एका अंगाला तो इसम पडलेला असतो,माशांचा त्याच्या सभोवताली घोंगवणारा आवाज त्याचे भविष्य त्याला दाखवत असतो..!
इतक्या वेळात दोन-तीन रिक्षावाले तरी मला विचारून जात असतात साहेब सिडको बसस्टँड,सेंट्रल बसस्टँड मी नकारार्थी मान हलवत,त्याला आपल्या नाही म्हणण्याचे किती वाईट वाटत असेल याचा विचार करत असतो..!
पुढे समोरच असलेल्या कंपनीतून सुटणारी फर्स्ट शिपची मुलं घरी जायचं या आनंदाने घराकडे निघतात जशी त्यांची पहिली-दुसरीची शाळा सुटली असावी इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो,आजची हजेरी लागलेली असते..!
एक दुसऱ्या शिपमधील मुलगा त्यांच्या सोबतच आज कामांवर नाही घेतले म्हणून पावले मोजत पुन्हा-पुन्हा कंपनीच्या गेटकडे मागे वळून बघत बघत पुढे चालत असतो.आजचा रात्रीच्या जेवणाचा हिशोब लावत असतो,पाकीटात किती पैसे उरले ते बघत असतो,चालत असतो चालत असतो..!
मी घंटाभरच्या या दृष्याला बघत बघत एका टपरीवजा झोपडीच्या दुकानात घोट-घोट चहा नरद्याच्या खाली उतरवत असतो,समोर असलेला McDonald च्या आवारात असलेला तो जोकर मला चहा प्यायला इकडे ये म्हणून खुणावत असतो..!
मी माझी नजर स्वतःपासून चुकवत गरम चहा नरडीच्या खाली नेऊन सोडवत असतो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा