मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MIT कॉर्नर अन् संगम..!

MIT कॉर्नर अन् संगम..! जुजबी आठवणींचे दिवस होते, सूर्य उदयाला आला की मी तालुक्याच्या माझ्या गावावरून एका मोडकळीस आलेल्या फटफटीवर औरंगाबाद शहर जवळ करायचो. कारण काही नाही चांगली चालती नोकरी सोडून कॉलेज करण्याचं भूत डोक्यात शिरले होते. शिक्षणावर पुढे चांगली नोकरी लागेल या आशेपायी मी कॉलेजच्या खेट्या घालायचो, जसं एखादी पोट पाडून आता पोर होत नाहीये म्हणून एखादी बाई दवाखान्याच्या नाहीतर मग एखाद्या देवस्थानाच्या खेट्या घालत असते. पहाटेच शहराची वाट जवळ करायला लागलो की, थंडीच्या दिवसात अंगात हुडहुडी भरून यायची. ढवळे तलमचे असलेलं स्वेटर रस्त्यावरील धुळीने जिल्ह्याच्या शहरापर्यंत येवोस्तोवर मातकट झालेलं असायचं. केसं पार भुरके अन् त्यात धूळ गेल्यानं पिंजारल्यासारखे होऊन जायचे. औरंगाबादला पोहचलं की, एखादा आडोसा बघून मग ते स्वेटर काढून घेणं व्हायचं. शर्ट पँटच्या आत खोचून व्हायचा, धुळीने खराब झालेले काळे बुट पुसून व्हायचं, खिळखिळी झालेली गाडी पुसून भेगा पडलेल्या हेल्मेटला सावरून घेत पुन्हा प्रवास सुरू व्हायचा. औरंगाबाद शहरातून रेल्वे स्टेशन मार्गे १० की.मी गेलं की बीड बायपास ओलांडून ३ की....

भोग कंत्राटी कामगारांचे..!

भोग कंत्राटी कामगारांचे..! काल सहज पडत्या पाऊसाच्या धारा वाहून डबके साचलेल्या अन् गंध्या नाल्याचं, गटरातलं संडासाचे पाणी वाहणाऱ्या गल्ल्या फिरून झाल्या. अन् मग मी सहज प्रश्न करत फिरलो लोकांना की, मी लिहत असतो म्हणजे नेमकं काय करतो रे..! तेव्हा लोकं बोलू लागले, आमच्या काळ्याकुट्ट पडलेल्या छात्या अन् पीळ पडलेल्या आतड्यांच्या पोटाचा प्रश्न तुझ्या लेखणीतून सुटला असावा. जेव्हा खळगीभर पोटासाठी आणि मिळणाऱ्या अन्नासाठी आमची माय, आमची इज्जत आम्ही भर आंदोलनात आम्हाला आमचा हक्क मिळावा म्हणून उघडी पाडली होती. तेव्हा दंगे झाले, आमच्या लोकांचे डोके फुटले. हापश्याखाली जेव्हा डोके धुवायला घेतले, तेव्हा पाणी नाही रक्त वहायला लागलं होतं. मग सगळं शांततेत व्हावं म्हणून माझ्या वस्तीतून मला पुढं करण्यात आलं. मी चिटुरभर कागदावर काहीतरी चार-दोन अक्षरं आई बापाची भाड खाल्यागत लिहिली, खरडली. त्याला निवेदन असं नाव दिलं. दोन-चार दिवसात आमच्या अटी मंजूर झाल्या मोठ्या साहेबानं काही अर्ज फाट्यावर निवेदनं मंजूर झालं म्हणून माझ्या सह्या घेतल्या अन् आमचीच खोलून मारावी तसं आमच्या गावाला राशनचं दुकान उघडं झालं...

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..!

अलगुज बोलायचं राहून गेलेलं..! माणसं जोडायला हवी या एका वाक्यापाशी येऊन हल्ली मनाचा संवाद काही सेकंदासाठी का होईना थांबत असतो. कारण आयुष्यात खरं माणसं जोडायला हवीच का ? ती खरच इतकी महत्त्वाची असतात का ? ही दोन प्रश्न हल्ली आयुष्याची गणितं सोडवत असताना रोजच पडत असतात. मग कुणी अनामिक खूप दिवसांच्या अंतराने भेटून जातं, दोन क्षणाच सुख आपल्या पदरी टाकून जातं. अश्यावेळी वाटून जातं की, आपण माणसं जोडायला हवी. मग कधीतरी जोडलेल्या माणसांचा होणारा त्रास व त्यांची उपस्थिती आपल्या आयुष्यात असण्याने होणारा त्रास. हे सगळं कसं आलबेल आहे असं वाटतं.  आयुष्याची गणितं जुळवत-जुळवत मन मग हिंदोळे देत का होईना या प्रश्नांना सोबत घेऊन रोज माझ्याशी जगण्यासाठी हव्या असणाऱ्या गोष्टींना घेऊन गुजगोष्टी करत असतं. असंच काही त्याच्या कालच्या झालेल्या गुजगोष्टीतून हाती लागलं अन् वाटलं की लिहायला हवं. कारण लिहल्याने काय होतं, माणसं जोडली जातात. त्यांची प्रॉब्लेम्स नकळत मग आपली होतात, मग उत्तरे शोधली जातात. कित्येक कधीही उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची. पण; माणसांचा सहवास असाच असतो जो आशेला लावतो. मग ते प्रेम...

"एक उलट... एक सुलट"

"एक उलट... एक सुलट" काल उसवत्या सांजवेळेला "अमृता सुभाष" यांचं "एक उलट... एक सुलट" हे ललित लेखन अन खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातल्या विचारवादळाची, समरसून जगलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची, आयुष्यातल्या अनामिक क्षणांची, अनुभवसरिंची ही अक्षरांनींच घडवलेली, त्यांनी घातलेली वीण वाचून संपवली.   खरंतर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यावरील, रंगमंचावरील आयुष्य हे आपण नेहमीच बघत असतो. पण; मला या कलाकारांच्या बाबतीत एक अनामिक कुतूहल नेहमीच आहे. ते हे की, या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यामागील खरंखुरं आयुष्य कसं असेल..? पडद्यावर कधीतरी खोटं हसू घेऊन जगणारे किंवा खरं हसू घेऊन जगणारी ही कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी असतील..? त्यांचा स्वभाव कसा असेल..? हे सर्व जाणून घेण्याचं मला अनामिक कुतूहल आहे. यासाठी मग मी कित्येकदा त्यांच्या आयुष्यावर लिखित पुस्तकं वाचत राहिलो. पडद्यावर भेटणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कलाकारांशी जुळवून बघत राहिलो. सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा अवेळी एक्झिट घेतली तेव्हा मात्र माझं हे कुतूहल अजूनच चा...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...

तरवट

"तरवट"  गेले पंधरा दिवस Running मुळे जरा एकाकीच उजव्या पायाचे Sciatica (Buttocks) इजा झाल्यासारखे दुखायला लागले होते. Running झाल्यानंतर Warm-up, Stretching हे सगळं नियमित करूनही हा त्रास सुरू झाला होता. टॅब्लेटस् अन् डायट घेऊनही समाधानकारक असा फरक पडत नाहीये. मग काल मित्राच्या सांगण्यावरून निसर्ग जवळ केला अन् भर दुपारी दोनच्या सुमारास या "तरवट" च्या शोधात भटकत राहिलो. काळाच्या ओघात निसर्ग आपल्यापासून कसा दुरावत आहे हे नेहमीच जाणवत होतं. पण; हे काल अजूनच प्रकर्षाने जाणवलं. ही झाडं शक्यतो डोंगर उताराच्या, मुरमाड रानात अन् मानवी वस्ती असलेल्या परुंतू बऱ्यापैकी मोकळ्या जागेत खडकाळ रानात उगते. आमच्या तालुक्याच्या घराला चांगलं निसर्गसौंदर्य लाभलं आहे, त्यामुळं पंधरा-वीस वर्षापूर्वी ही झाडे अगदी घराच्या सभोवताली असलेल्या मोकळ्या रानात मोप प्रमाणात होती.  पण; गेल्या काही वर्षात निसर्गाचा झालेला ऱ्हास, जमिनीची झालेली धूप यामुळे ही झाडी आता घराच्या जवळ उपलब्ध नाही. मग काय दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकत होतो. अडीच- तीन की.मी रानात भटकंती करत ही झाडी मिळवली. घराच्य...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १२ पहाट झाली अन् कोंबड्याच्या बांगेसरशी नागू उठला. अंघोळपाणी करून गावातल्या खोकल्या आईच्या देउळमध्ये अगरबत्ती लाऊन, नारळ फोडून पाय पडून आला. आज शहर जवळ करायचं होतं. खोकल्या आईच्या पाया पडून नागू येओस्तोवर गोंडाजी उठला होता. अंघोळ-पाणी करून त्यानं वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सर्व मालाची गिनती केली, तो सगळा माल एकासरशी लाऊन तो पारावर बसून गाड्या येण्याची वाट बघत बसला होता. तितक्यात रखमाजी अन् त्याचा धाकला लेऊक दोन्ही टेम्पो घेऊन झोपड्या महोरे येऊन उभे राहिले. टेम्पो वेळीच आले बघून गोंडाजी अन् नागूच्या जीवात जीव आला. गोंडाजी अन् रखमाजीचा धाकला लेऊक वऱ्हाटे, पाटे, अन् इतर सगळा माल टेम्पोत भरू लागले होते. नागू रखमाजीला घेऊन पारावर बसला व सुमनबाईला चहाचं फर्मान सोडून गप्पा मारत बसले. गप्पा तरी काय या गधड्या धंद्यात लाज राहिली नाही, यंत्र आलीया आता कोणती बाई वऱ्हाटे, पाटे,करत बसेल. इतका वखत कुणाला हाय म्हणून तो त्याच्या धंद्यात होत असलेली आबळ रखमाजीला सांगत होता. रखमाजी त्याच्या गाड्याच्या धंद्यात महागाई अन् वाढलेली स्पर्धा, घरोघर झालेल्या गाड्या यामुळे त्य...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ११

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ११ चहूकडे अंधारून आलं होतं, काळोख दाटून आला होता. या काळोखाच्या किर्र अंधाराखेरीच तुडुंब भरून वाहणाऱ्या शिवणामायच्या पाण्याचा खळखळाट फक्त या अंधारात ऐकू येत होता. संपूर्ण गाव भूकंपात जमीनदोस्त व्हावं तसं सारं गाव अंधारात निपचित झोपड्यांच्या आड होऊन गारठयाचा जो मिळेल तो आसरा घेऊन पहुडला होता. सांजेचे आठ वाजले तसं सारं गाव चिडीचूप पहुडले होते. इकडे संतू, नागू अन् गोंडाजी यांची जेवणं आवरली अन् ती तिघे लिंबाच्या पारावर सोजणी अंथरून लिंबाच्या खोडाला मान टेकवून उद्याच्या पहाटे शहराला जायचं नियोजन करु लागली होती. सांजेला गोंडाजी अन् संतू उद्या पहाटे दोन टेम्पो आपल्याला शहर जवळ करायला लागतील एक आपलं अवजारे, संसार बादली, तयार झालेली वराटे, पाटे, मंदिरात असणारे दिवे, खलबत्ते, मुसळी असं सगळा तयार माल एका गाडीत अन् राहण्यापूर्ता संसार अन् दोघांची तीन खेचर एका गाडीत घेऊन जायचं म्हणून गावातल्या रख्माजीला पहाटेचा सांगावा सांगून, काही इसार देऊन आले होते. त्याने पहाटे सहालाच झोपड्या मोहरे गाडी आणून लावण्याचं कबूल केलं होतं. आता तिघेही महत्त्वाचं काम झाल्यानं निव...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १०

दागडफोड्या संतू अन् नागूचं जगणं - १० अस्ताला जाणारा सूर्य ढगांच्या आडून डोंगरांच्या रांगेपल्याड कलला. तसं संतू अन् गोंडाजी यांनी आपली वऱ्हाटे, पाटे बनवायला लागणारी जी दिवसभर घाम गाळून फोडलेली दगडं होती ती त्यांच्या खेचराच्या पाठीवर लादली. उन्हाळा सरला अन् बरसदीचा पहिला पाऊस येऊन गेला असल्यानं आता खदानीत येऊन दगुड फोडायचं त्यांचं काम आजपासून पुढे चार महिने बंद झालं होतं.  दगुड खेचरावर लादली, मोठा घन, छनी, एक हातोडी, अन् पाण्याची कॅन त्यांनी लादलेल्या दगडाच्या बाजूला झुलीला एका पिशवीत टाकली. दोघांनी खदानमायचे गुडघ्यावर बसून हात जोडून पाया पडले. आणि दोघेही कोसभर दूर असलेल्या आपल्या झोपडीच्या दिशेनं खेचरं घेऊन निघाले. इकडे रानुबाई, सुमनबाई अन् संतूची बाई दिवसभर वऱ्हाटे, पाटे विकून दमल्या होत्या. काहीवेळापूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलेल्या त्या त्यांची झोपडी असलेल्या गावाच्या फाट्यावर उतरल्या. फाट्यावर असणाऱ्या भिवसन आबाच्या किराणा दुकानातून त्यांनी हळद, तिखट, मिठाच्या पुड्या अन् अर्धा अर्धा किलो तांदूळ घेऊन त्यांनी झोपड्या जवळ केल्या. आज खिचडीचा बेत ठरला असावा, हे त्यांच्या या घेतलेल्...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९ भर दुपार ढळून गेली, गोंडाजी अन् संतू आपलं काम उरकते घेऊन दुपारच्या जेवणाला खदानीच्या भिंती आड सावलीचा आसरा धरून बसणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपल्या शिंगरांना खदानीच्या एका अंगाला असलेल्या गवताच्या रानात चरायला म्हणून खूंटी ठोकून चरायला सोडून दिले. अन् दोघे खदानीतून रीसणाऱ्या पाण्याची कॅन घेऊन जेवायला म्हणून सावलीत बसले. आजच्याना खदानीतील कामाचा शेवट दिवस होणार होता अन् पुढे काही दिवस आता फक्त घरी राहून वह्राटे, पाटे, उखळं, देवळातले दिवे यांचा दगडांना आकार देऊन शहराला तात्पुरती झोपडी बांधून ते विक्रा करणार होते. दोघांचे जेवणं चालू होते, आता उद्यापासून त्यांच्या कामात होणारा बदल याबद्दलही ते गप्पा मारत होते. तसं यावर्षी दगुड फोडायचा हंगाम चांगलाच गावला होता त्यांना. खदान मायना भी चांगलीच मदत त्यांना केली होती अन् बराच पैका या दगडांना आकार देऊन त्यांचा होणार होता. आजचा दिवस शेवटचा असल्यानं कामाचा बराच उरक गोंडाजी अन् संतू यांना होता. दोघांनी बिगिबिगी भाकरी खाल्या अन् पुन्हा घन आणि छनी हातोडा घेऊन ते कामाला लागले होते. उन्हाळ्याच्या दिवसातील शेव...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८ सूर्य दुपारच्या पाराकडे कलता झाला होता. उन्हं मी म्हणू लागले होते आणि या उन्हाच्या तिरीपेत संतू अन् गोंडाजीचं दांडगे शरीर दगडावर घाव घालीत होतं. प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या उडु लागल्या होत्या, पाथरवट जसा छनीच्या सहाय्याने दगडाला आकार देतो तसा ओबडधोबड दगुड फुटून आकार घेऊ लागला होता. कालपर्वाच खदानीत बार उडवला असल्यानं आज वऱ्हाटे, पाटे करायला म्हणून मोप दगुड उपलब्ध होता. वेळीच त्याला आकार देऊन शिंगरावर लादून फक्त त्याला झोपडीपर्यंत न्यायचं होतं, हे जितकं सोप्पं वाटत होतं तितकंही सोप्पं काम नव्हतं. घटकाभर संतू अन् गोंडाजी काही आकार मिळालेला दगड घेऊन सावलीला आले. कॅनीत असलेलं पाणी गिल्लासात घेऊन दोघेही पित होते अन् घोटासरशी नरड्याच्या खाली उतरणारे पाणी सहज नकळत डोळ्यांना दिसून जात होते. पाणी पिऊन काही पाच दहा मिनिटांची विश्रांती म्हणून दोघे सावलीला खदानीच्या भिंतीला पाठ लाऊन आराम करत बसले. इकडे रानूबाई, सुमनबाई अन् संतूची बाई तालुक्याच्या गावाला आपली वऱ्हाटे,पाटे डोईवर घेऊन गल्लोगल्ली विकत फिरत होत्या. इळाचे दोन सट जरी विकले तर दिवसभराची मज...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७ गावची लोकं पण चांगली होती ,त्यांच्यात आपसात संतू अन् नागू मिसळून राहत म्हणून गावकऱ्यांना पण त्यांचा स्वभाव पटला होता. थोडाफार गावात होणारा विक्रा अन् मग तालुक्याचं शहर जवळ असल्यानं तालुक्याला माल विकायला जायचं सोयीचं होतं म्हणून त्यांची सोयच लागली होती. अन् दोनाची आता तीन संसार या दगड फोडण्याच्या कामावर गावच्या कृपेनं, गावच्या खदानीच्या कृपेनं पोट भरू लागली होती. पहाटेचा दहाचा पार कलला तसं संतू अन् गोंडाजी आपली शिंगरं घेऊन खदानीच्या अंगाला आले. उन्हं लाहीलाही करत होते. खदानदाराने मागेच दोन दिवसाला खदानीत एक मोठा बार उडवला होता, दगडांची बरीच ठिकरं ठिकरं खदानीत चहूकडे पसरलेली होती. खदानीच्या अंगाला मागील सालाचे अन् कालच्या पावासाचे असे पाणी तुंबलेले होते. काळ्याश्यार पाण्यात सर्वदूर हिरवे हिरवे शेवाळ नजरी पडत होते अन् काही शंभर मीटर अंतरावर असलेल्या खदानीच्या कपारीतून रीसनाऱ्या झऱ्यातून पाणी रिसत असल्याचं गोंडाजीच्या नजरीला पडलं.तो त्याच्या शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीतून कॅन घेऊन त्या रीसनाऱ्या झऱ्याच्या पायथ्याशी गेला अन् एका काटकीला कॅनीत ...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ६ मधूनच त्यानं सुमन बाईला भाकरी बांधायला अन् बिगीने आवरायला सांगितले अन् आपल्याला पावसाचा अंदाज बघून लवकर निघायला हवं असं म्हणून तो तिच्या भवती गरबड करू लागला होता. बरसदीचे दिवस जवळ येत होते अन् आता कामाचा उरक वाढवायला हवा म्हणून गोंडाजीसुद्धा गरबड करू लागला होता.  तितक्यात संतूचा आवाज आला अय लेका मला बी येऊ दे रे, बरसदीच्या आदी म्या बी दगुड घेऊन येतो म्हंजी मग बरसाद सुरू झाली की आपलं टिकी टिकी टाके द्यायचं काम चालू राहील नाय का..! नागू त्याला बघून हसू लागला अन् बोलता झाला..! हाव रे लेका तुझ खरं हाय बघ, वजीस आवर अजून वाहतूळ आहे त्यांना आवराया, सुमनबाई न्याहारी बांधायली चौघ संगीतनं अन् सांच्याला संगतीनेच घर जवळ करा. संतू हे बोलणं ऐकत त्यांच्या शिंगराला पाणी पाजत होता,पाणी पाजून झालं तसं त्यानं त्याच्यावर पोत्याची झूल टाकली अन् तो त्यात त्याचं दगुड फोडायच साहित्य टाकू लागला. त्याला काह ध्यान आलं एकाकी समजलं नाही त्यानं त्याची बंडी चपापली पण त्याला काही गवसत नसल्याचा उधार भाव तो चेहऱ्यावर आणून झोपडी आता गेला अन् आवजाराच्या जागी असलेल्या वळकटीत ठ...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५ तिकडं शिंगरे ओली होतील अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेल्या पाऊसामुळे झोपडीला काही होणार नाहीना, याची चिंता त्यांना लागून होती. घरी एकट्या बायकामाणसं असल्यानं वावधन बघून त्यांना अजूनच विचार करून कसेतरी होऊ लागले होते.  घडी भरच्याने पाऊस ओसरला होता. बराच पाऊस झाल्याने गावातले नदी,नाले वाहू लागले होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने असलेल्या नाल्या तुडुंब भरून वाहत होते. सावत्या माळ्याच्या देऊळामागून गेलेला नाला तुडुंब भरून वाहत होता. अंधारून आलं होतं अन् किर्र अंधारात वाट काढीत संतू, नागू घराच्या दिशेने लागले होते. पाण्याचा वाहणारा झोका अन् काळोखात खडकाच्या ठोकरा खात जेव्हा संतू अन् नागू आपापल्या झोपडीजवळ पोहचले, तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. दोघे आप आपल्या झोपड्या अन् सभोवतालची झाली अवस्था निरखून बघत होते, नागूने पोहचताच आपल्या शिंगराला बघितले तो झोपडीच्या एका अंगाला पत्र्याच्या तात्पुरत्या निवाऱ्यात बांधून ठेवला होता. खूप वेळ झालेल्या पावसाने, वावधानाने त्याला हीव वाजून यावं असं झालं होतं. उभ्या उभ्या आपलं थरथरते अंग घेऊन झोपी गेला होता. ...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ४

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ४ अस्ताला गेलेल्या सूर्याला निरोप देऊन रानूबाई आणि सुमनबाई सायंकाळच्या रांधायच्या कामाला लागल्या अन् नागू सायंकाळचे थोडंफार फिरायला म्हणून गाव भटकंतीला निघाला. संतूच्या झोपडी मोहरे गेला तसं त्याने संतूला आवाज दिला..! अय संतू चलतूया का लका गाव मोहरच्या देऊळातल्या खंडूबा पाय पडून याऊया..! अन् शनिदेवाला तेल आणि खंडोबाच्या देऊळात भंडारा वाहून येऊया..! संतू नुकताच खदानितून नुकताच दगड फोडून आला होता अन् हातपाय धुवून पडवीत पडून बाहेर बघत होता. त्यानं नागूचा आवाज ऐकला अन् तो धोतराचा सोगा सावरीत उठला, देव्हाऱ्यात असलेल्या देवाच्या तेलाच्या शिशितून त्यानं एका पंत्तीत थोडं तेल घेतलं अन् दोन अगरबत्या हाताला घेऊन तो पण नागूच्या संगतीने गावाच्या वाटेनं लागला. नागू अन् संतूच्या दिवसभराच्या खंडलेल्या गप्पा सुरू झाल्या. नागू बोलता झाला, मग लेका कितीक खडूक फोडलासा आज अन् बेस हाय का खडक की भुगा हुतूया. संतू बोलता झाला, खडुक फोडलासा रं अण्णा सात आठ पाट होतीला अन् दोन चार वऱ्हाटं, खडूक बेस हाय कुठं कपरीला झालं हाय थोडू हलकू भुगा होई राहीला पण ब्येस हायसा काम पुर...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३ संसारासाठी झुरत असणारी रानूबाई नागुला दिसू लागली होती तसे त्याला त्याचे अन् रानूबाईचे नव्याचे नवतीचे नऊ दिवस आठवू लागले होते. नागू आणि रानूबाई यांचं लग्न झालं अन् घरात आपसात होत असलेल्या कलहामुळे दोघे सासूसासऱ्यांनी वायली काढली. एकदमच वायली निघाल्यामुळे काय करावं ? हा प्रश्न होता. वडिलोपार्जित काम जमत होतं पण इतका अनुभव नागूच्या पाठीशी नव्हता पण आता हे सगळं काम आपल्याला करणं भाग होतं, तेव्हा त्याला रानूबाईची खंबीर साथ लाभली. संसाराला लागणारं साहित्य घेऊन ते दोघे भटकत भटकत भिल्हाटी गावच्या खदानीला आले. तिथं संतूशी ओळख झाली अन् काम भेटलं, सुरूवातीला रानूबाईसुद्धा नागूला माणसांच्या बरोबरीने खदानीमध्ये दगड फोडायला मदत करू लागली. पर्याय नव्हता, हाताला काम नव्हतं आलेलं काम करणं भाग होतं. नवतीचे नऊ दिवस संसार फुलू लागला होता, संसाराची घडी बसत होती.भर उन्हात काम करायचं, काळा पाषाण फोडायचा. उन्हं मिन मिन करायची उन्हाच्या झळा दूरवर तुटत असतांना नागू अन् रानूबाई आपल्या डोळ्यांशी हातची वर्तुळे करून बघायची. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख मिळवत एकमेकांना ...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २ संतूच्या बाईच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नागू तिच्याकडे बघत बोलू लागला: राणू ठीक हायसा..! दगड फोडायचं काम झालं हायसा आता ती दोन दिवसा महुरं येईल तुझ्या संगतीनं डोईवर वऱ्हाटे, पाटे इकाया. बोलणं ऐकून संतूची बायको बोलती झाली: ठीक हायसा अण्णा मला बी अक्काच्या संगतीने ई- जा करायला बराबरी होईल. चहा घेतलासा का अण्णा असं संतूच्या बायकोनं विचारलं..! नागू नकारार्थी मान हलवत म्हंटला नगूया आता गोंडाजी यायला असल सडकी तो आला की जेवण-खावान होतीया मग..! नागू धोतर सावरत संतूला म्हणतो: येतूया संतू लका, झगडा नग करुस भाडीच्या काम भी कर जरासा..! संतूनं मुकाट्यानं मान हलवली अन् हु हु करू लागला अन् नागू तिथून झोपडीच्या वाटेनं निघाला. नागू काही वेळात पाय आपटीत झोपडी लोंग आला अन् त्याच्या झोपडीसमोर असलेल्या बाजीवर बसून वाटेला नजर लाऊन बसला होता. इतक्यात त्याला दूरवरून खेचरांना हाकरत येणारा गोंडाजी दिसला अन् पाठीशी त्याची बायको सुमन दिसली दिसताच त्यानं रानूबाईला हाक मारली. राणे अय राणे..! धाकली जोडी येऊन राहिलीया चुल्हांगणावर पाणी तापाया ठेव. दमली अस्तीला इळभर दगड फ...

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १

  वडार वेदना..! दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १  सूर्य अस्ताला गेला, पिवळी उन्हं तांबडं फुटल्यागत दिसू लागली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर झोपडीच्या चहूबाजूंनी पसरलेला दगडाला टाके द्यायला लागणारं साहित्य छनी, हातोड्याला अन् इतर वस्तू नागू जमवू लागला होता. टाके द्यायची छनी, हातोडी त्यानं पाण्यात हीसळली अन् एक टोपल्यात टाकली. गणाबाईनं अंगणा मोहरच्या पडसावलीतल्या अंगणाला सगळं शेणानं सारून माखून घेतलं होतं. झोपडीच्या पुढे झोपडीला शोभेल अशी टिपक्याटीपक्याची रांगोळी तिने काढली होती.  सांज जशी कलायला लागली तसं नागूनं सारा बाडबिस्तरा सावरत दगडात दिवसभर घडवलेली वऱ्हाटे, पाटे, उक्खळ, खलबत्ते, देउळमध्ये ठेवला जाणारा दगडी दिवा सगळं एक मोहरं लावले. अन् ; तो शेजारच्या झोपड्यात असलेल्या संतू घिसाड्याशी गप्पा मारायला गेला. संतू घिसाडी पेताड असल्या कारणानं दिवसभर बायकोने डोक्यावर गाव गाव हिंडून वऱ्हाटे, पाटे विकून जमवलेला पैसा संतू त्याच्या बायकोला मागत होता. दोघात दुपारपासून कल्ला चालू होता, नागूला बघताच संतूची बाई नजर हिरमुसल्यासारखी करून झोपडीच्या असलेल्या पडद्याआड गेल...