मुख्य सामग्रीवर वगळा

MIT कॉर्नर अन् संगम..!

MIT कॉर्नर अन् संगम..!

जुजबी आठवणींचे दिवस होते, सूर्य उदयाला आला की मी तालुक्याच्या माझ्या गावावरून एका मोडकळीस आलेल्या फटफटीवर औरंगाबाद शहर जवळ करायचो. कारण काही नाही चांगली चालती नोकरी सोडून कॉलेज करण्याचं भूत डोक्यात शिरले होते.

शिक्षणावर पुढे चांगली नोकरी लागेल या आशेपायी मी कॉलेजच्या खेट्या घालायचो, जसं एखादी पोट पाडून आता पोर होत नाहीये म्हणून एखादी बाई दवाखान्याच्या नाहीतर मग एखाद्या देवस्थानाच्या खेट्या घालत असते.

पहाटेच शहराची वाट जवळ करायला लागलो की, थंडीच्या दिवसात अंगात हुडहुडी भरून यायची. ढवळे तलमचे असलेलं स्वेटर रस्त्यावरील धुळीने जिल्ह्याच्या शहरापर्यंत येवोस्तोवर मातकट झालेलं असायचं. केसं पार भुरके अन् त्यात धूळ गेल्यानं पिंजारल्यासारखे होऊन जायचे.

औरंगाबादला पोहचलं की, एखादा आडोसा बघून मग ते स्वेटर काढून घेणं व्हायचं. शर्ट पँटच्या आत खोचून व्हायचा, धुळीने खराब झालेले काळे बुट पुसून व्हायचं, खिळखिळी झालेली गाडी पुसून भेगा पडलेल्या हेल्मेटला सावरून घेत पुन्हा प्रवास सुरू व्हायचा.

औरंगाबाद शहरातून रेल्वे स्टेशन मार्गे १० की.मी गेलं की बीड बायपास ओलांडून ३ की.मी माझं कॉलेज होतं. दोन-अडीच वर्ष हा कॉलेज नावाचा माझ्या आयुष्यात असलेला दुष्काळ अनुभवला. यातून हाती काय लागलं..? हा प्रश्न अजूनही सुटला नाहीये पण; अजून भटकंती सुरू आहे.

या दोन-अडीच वर्षात एक व्यक्ती कायम भेटत राहिली, ओळखीची वाटत राहिली. ती म्हणजे बीड बायपासला एम.आय.टी कॉर्नरला भेटत राहणारी "संगम" नावाची तृतीयपंथी मैत्रीण. औरंगाबाद शहरात मला मिळालेली ही पहिली मैत्रीण म्हणजे संगम. ती भेटली पुढे दोन वर्ष औरंगाबाद आलो की, तिची भेट या कॉर्नरला आवर्जून व्हायची. 

कधीतरी मी निवांत असलो, ती पण निवांत असली की एम.आय.टी कॉर्नरला असलेल्या चहाच्या टपरीवर ती मला चहा पाजायची. तेव्हा एम.आय.टी अन् जवळपास महाविद्यालयात जाणारे सर्व मुलंमुली आमच्याकडे बघायची, येणारी जाणारी माणसं आमच्याकडे बघायची.

पण तिच्या सोबत गप्पा करणं, तिच्या आयुष्याचा पट तिनं मला उलगडून सांगणं हे सगळं खूप भारी वाटायचं मला. अन्; तिलाही माझा एकूण हा खुळखुळ्या झालेल्या फटफटीवर चालू असलेला माझा जीवनप्रवास भारी वाटायचा.

तर ते दिवस असे होते की, मी नव्यानं कॉलेज जायला लागलो होतो. बीड बायपास म्हणजे औरंगाबादकरांचा चर्चेचा विषय मी जोवर कॉलेज केलं तोवर हा रस्ता काही पूर्ण झाला नाही. तिथे असणारं धुळीचे साम्राज्य आता रस्ता नावाला झाला असला तरी अजूनही तसेच आहे. 

तर एकदा असंच मी माझी फटफटी घेऊन कॉर्नरला क्रॉस करण्यासाठी थांबलो होतो, समोर ट्रॅफीक पोलीस होते. माझी गाडी अन् माझी भेदरलेली अवस्था बघितली, माझा गावाकडचा लूक बघितला तर मला फाईन पक्का होता. म्हणून मी गाड्यांच्या मागे गाडी लपवत गाडी काढत होतो.

ट्रॅफीक लागली अन् तिथं संगम आली, ती लोकांकडे टाळ्या वाजवत पैसे मागत होती. तिने माझी बेचैनी हेरली. हळूहळू ट्रॅफीक ओसरली मी पोलिसांना चुकवून रस्ता क्रॉस केला अन् संगमने मला आवाज दिला.

आता रस्त्यावर ट्रॅफीक नव्हती, तो निवांत वाहत होता. ती माझ्या बाजूने दुतर्फा असलेल्या कठड्याच्या बाजूला उभी होती. तिने आवाज दिला मी तिच्याकडे गेलो. ती हसतच बोलली बहोत डरते हो पोलीससे, चुपकेसे बाईक निकाल लिये..!
मी एक न दोन हो..! म्हणून गेलो, तसं ती हसायला लागली. मग काय करतो, इकडे कुठे अश्या गप्पा झाल्या. तिने जवळच्या चहा टपरीवर मला नेले, दोघांनी सोबत चहा घेतला अन् जुजबी बोलून मी निघून गेलो. 

पुढे औरंगाबाद ईतर दुसऱ्या कामाने जरी आलो तरी संगमला भेटायचं म्हणून शहराच्या एका अंगाला असलेल्या या बीड बायपासला येणं व्हायचं. ती पण तिचा वेळ द्यायची, फार काही नाही मस्त गप्पा व्हायच्या. दोन-अडीच वर्ष मी कॉलेज आलो की या कॉर्नरला तिला भेटायचो अन् मग कॉलेजची वाट जवळ करायचो.

छान मैत्री झाली होती, पुढे शहरातल्या एकदोन मित्रांशी पण तिची भेट करून दिली. मग मी शहराला आलो की आमचं सगळ्यांचं या सिग्नलवर भेटणं व्हायचं.

माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांची मोठी वाचता येईल इतकं शिकलेली, शिकण्याची इच्छा असूनही तिच्या आयुष्यात आलेली वळणं तिला रस्त्यावर घेऊन आली होती. आता तिचं हे असं जगणं नजरेसमोर होतं. ती म्हणायची,
कूछ भी हो पढाई मत छोडना..!
अन् मी पण शिकत राह्यलो.

पुढे लॉकडाऊन लागलं, कॉलेजचा संपर्क, इतर कामे मोबाईलवर होऊ लागले. तसं संगमशी होणारी भेटही दुरावत गेली. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर जेव्हा दोन वर्षांनी शहरात आलो, तेव्हा पहिले या सिग्नलला आलेलो पण संगम तेव्हा भेटली नाही.

नंतर शहरात इतक्या भटकंती नंतर ती अजूनही मला शहरात दिसली नाही. लॉकडाऊन पूर्वी औरंगाबाद शहरात सिग्नलवर फार किन्नर बंधूभगिनी नव्हते. हलाखी नव्हतेच असं म्हंटले तरी चालेल. तेव्हा ही संगम एकटीच दिसायची.

अजूनही शहरात प्रत्येक सिग्नलवर सिग्नल लागला की माझी नजर तिला शोधत राहते. पण; ती नजरी पडत नाही. असंच एकदा पुण्यात एका सिग्नलवर संगम सारखीच दिसणारी एक मैत्रीण भेटली. तिला बोललो पण ती "संगम" नव्हती. खिश्यातून वीसची नोट तिच्या हातात टेकवली अन् तिला माझी कथा दोन वाक्यात सांगितली.

ती जे काही बोलली ते आयुष्यभर आयुष्य जगण्यास कारणी ठरतील अशी वाक्य होती. म्हणून ना संगमसारख्या या अश्या मैत्रिणी आयुष्यात असाव्या असं वाटून जातं.

एकदा असंच चहाचा घोट घेत घेत ती बोलली होती की, ऐसीही भटकती भटकती प्रवरा संगम की ब्रीजपर मैं आ पहुची..!  और वहा मुझे मेरी गुरू मिली, जिस्ने मुझे आशियाना दिया..! और तबसे मेरा नाम संगम है..!

बेफिकीर आयुष्य जगणारी संगम खरच बेफिकीर होती.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...