दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ९
भर दुपार ढळून गेली, गोंडाजी अन् संतू आपलं काम उरकते घेऊन दुपारच्या जेवणाला खदानीच्या भिंती आड सावलीचा आसरा धरून बसणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपल्या शिंगरांना खदानीच्या एका अंगाला असलेल्या गवताच्या रानात चरायला म्हणून खूंटी ठोकून चरायला सोडून दिले. अन् दोघे खदानीतून रीसणाऱ्या पाण्याची कॅन घेऊन जेवायला म्हणून सावलीत बसले.
आजच्याना खदानीतील कामाचा शेवट दिवस होणार होता अन् पुढे काही दिवस आता फक्त घरी राहून वह्राटे, पाटे, उखळं, देवळातले दिवे यांचा दगडांना आकार देऊन शहराला तात्पुरती झोपडी बांधून ते विक्रा करणार होते. दोघांचे जेवणं चालू होते, आता उद्यापासून त्यांच्या कामात होणारा बदल याबद्दलही ते गप्पा मारत होते. तसं यावर्षी दगुड फोडायचा हंगाम चांगलाच गावला होता त्यांना. खदान मायना भी चांगलीच मदत त्यांना केली होती अन् बराच पैका या दगडांना आकार देऊन त्यांचा होणार होता.
आजचा दिवस शेवटचा असल्यानं कामाचा बराच उरक गोंडाजी अन् संतू यांना होता. दोघांनी बिगिबिगी भाकरी खाल्या अन् पुन्हा घन आणि छनी हातोडा घेऊन ते कामाला लागले होते. उन्हाळ्याच्या दिवसातील शेवटचे दिवस उन्हं मी मी करत होती. भर उन्हात खदानीच्या भिंतीशी साळुंकी खेळत होती अन् उंच उंच आकाशात ची.. ची... करत घिरट्या घेत होती.
चातक पक्षाप्रमाणे तीला आठ-दहा दिवस पुढं असलेल्या पाऊसाचा अंदाज बांधता येत असावा म्हणून ती ओरडत असावी असं वाटून जात होतं.
हातोड्याच्या प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या अन् त्याचा व्होलघ्याच्या आवजासारखा आवाज सर्व खदानीत दुमदुमत होता. संतू अन् गोंडाजी खेरिच दोन-चार जोड्या अजून दगुड फोडत होती, त्यांचा शेवटचा दगुड कधी फुटतो कळायला वाव नव्हता. मग एकाकीच कारखान्याला तोडीला जाणाऱ्या टोळीचा जसा पट्टा पडावा तसा पट्टा पडेल.व एकाकी खदानीतले दगड फोडायचे काम बरसदीच्या दिवसांत बंद पडल असं चक्र सुरू होतं.
एकीकडे शहराच्या गावाला डोईवर वह्राटे, पाटे विकणारी रानुबाई, सुमनबाई अन् संतूची घरची चार वाजे पोहतर आपला सारा माल विकून डोइंवर खाली चुंबळ घेऊन पावसा पाण्याचा बसस्टँड जवळ करत होती. बसस्टँड जवळ केलं अन् विकरा झालेल्या पैक्यातून लेकरांना पाच-पाच रुपयांची गोडी शेव अन् जिलेबी घेऊन त्या बसस्टँडात येऊन बसल्या. तिघींचा बराच प्रवास अन् पायपीट न होता आज सगळाच माल विकल्या गेला होता.
तिघी बसस्टँडात असलेल्या ओट्यावर बसून गावच्या येणाऱ्या बसला बघत,घराची वाट कधी जवळ करतूया या विचारांनी बसस्टँडात घडत असलेल्या घडामोडी बघत बसल्या होत्या. आता उद्यापासून आपल्याला पहाटे मालकाची न्याहारी केली की हीच कामे असतील म्हणून त्या जरा हरखलेले चेहरे, बारीक तोंड करूनच बसून होत्या.
कारण डोईवर इतकं वजन घेऊन दिवसभर विक्रा करायचं काम सोपं नव्हतं, सांच्याला झोपडी जवळ केली की डोकं ठणका मारायचं. अंग भरून यायचं अन् गेल्या गेल्या निपचित पडून रहावे वाटायचं पण वाटलं अन् झालं तो संसार कसला. सांच्याला भाकरी, कोड्यास करणं भांडी,कुंडी करणं पार काम करता करता त्यांचा जीव रंजीस यायचा. पण; त्याला पर्याय पण काय होता आता बरसदीच्या दिवसांत तर ही आबाळ अजूनच वाढलेली अन् अजूनच त्रास ठरलेला होता.
आला दिवस कसातरी काढू म्हणून तिघी विचार करत बसची वाट बघू लागल्या होत्या.काही दहा-पाच मिनिटांच्या अंतराने बस आली अन् तिघी पटकन बसमध्ये बसून आपलं गाव जवळ करू लागल्या. दिवसभर भटकून भटकून आता अस्लाजणाऱ्या सूर्याला घेऊन त्याही अस्ताकडे जावं तसं प्रवास करत होत्या. बस एक एक गाव मागे सोडत खदाणीच्या अन् घाटाच्या पायथ्याला लागली तसं अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या संगतीने मावळत्या दिसाच्या साक्षीला तिघींनी घाटाच्या पूताक असलेल्या सोरटी सोमनाथाच्या देऊळकडे बघत बसमध्येच आपले हात जोडले अन् तिघी मनोमन काहीतरी पुटपुटत प्रार्थना करू लागल्या..!
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा