दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ७
गावची लोकं पण चांगली होती ,त्यांच्यात आपसात संतू अन् नागू मिसळून राहत म्हणून गावकऱ्यांना पण त्यांचा स्वभाव पटला होता. थोडाफार गावात होणारा विक्रा अन् मग तालुक्याचं शहर जवळ असल्यानं तालुक्याला माल विकायला जायचं सोयीचं होतं म्हणून त्यांची सोयच लागली होती. अन् दोनाची आता तीन संसार या दगड फोडण्याच्या कामावर गावच्या कृपेनं, गावच्या खदानीच्या कृपेनं पोट भरू लागली होती.
पहाटेचा दहाचा पार कलला तसं संतू अन् गोंडाजी आपली शिंगरं घेऊन खदानीच्या अंगाला आले. उन्हं लाहीलाही करत होते. खदानदाराने मागेच दोन दिवसाला खदानीत एक मोठा बार उडवला होता, दगडांची बरीच ठिकरं ठिकरं खदानीत चहूकडे पसरलेली होती.
खदानीच्या अंगाला मागील सालाचे अन् कालच्या पावासाचे असे पाणी तुंबलेले होते. काळ्याश्यार पाण्यात सर्वदूर हिरवे हिरवे शेवाळ नजरी पडत होते अन् काही शंभर मीटर अंतरावर असलेल्या खदानीच्या कपारीतून रीसनाऱ्या झऱ्यातून पाणी रिसत असल्याचं गोंडाजीच्या नजरीला पडलं.तो त्याच्या शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीतून कॅन घेऊन त्या रीसनाऱ्या झऱ्याच्या पायथ्याशी गेला अन् एका काटकीला कॅनीत लाऊन पाणी भरू लागला.
दहा पंधरा मिनिटांत त्याची पाचएक लिटर भराची कॅन भरली. त्यानं ती हातात धरली अन् खदानीच्या एकांगाला असलेल्या सावलीत येऊन बसला, तितक्यात संतू दोघांची शिंगरं त्यांना सावलीत चरायला म्हणून बांधून आला आणि दोघांच्या झुलीतून भाकरीचे पेंडकं घेऊन आला.
जरावेळ बसल्यावर दोघांनी पहाटेची न्याहारी करायला म्हणून फडक्यातून आपल्या भाकरी सोडल्या. संतूने कुर्डइचा भुगा,भाकर अन् गोंडाजीने भाकर अन् जाड बेसन आणि तोंडाला लावायला म्हणून लोणच्याची फोडी आणल्या होत्या. दोघांनी एकमेकांची कोड्यास घेतली अन् दोघे न्याहारी करत आज कामाला म्हणजे दगड फोडायला कुठून सुरुवात करायची हा विचार करू लागली.
वेळीच झालेला कामातील नियोजनाचा बदल म्हणून खदानीत आज दोघंच होती अन् सुमनबाई,रानुबाई अन् संतूची बाई शहराला पाटे विकायला म्हणून गेली होती. तसे खदानीत फार असा दगुड उरला नव्हता अन् बरसदीच्या दिवसात काही पैका हाताला म्हणून त्यांनी वेळीच नियोजन बदलून शहराला जाण्याचा ठरवलं होतं.
तिकडे नागू दोघांच्या झोपडीला राखण आणि उरलेल्या पाट्याला टाके देण्याचं काम तो करणार होता. शरीराने जाडजूड अन् ढेरी पुढे आल्यानं त्याला दगुड फोडायचं काम जमत नव्हतं म्हणून तो आपलं बसल्याबसल्या वऱ्हाटे, पाटे, दिवे करण्याचं काम करायचा. त्याच्या हातात ही चांगली कला होती म्हणून सभोवतालच्या चार गावातली लोकं वऱ्हाटे, पाटे, दिवे असं काही घ्यायचं म्हंटले की नागूच्या झोपडीला जवळ करायची.
नागूपण दोन-चार आणे कमी जास्त करून,आलेल्या गिऱ्हाईकचा मान ठेऊन मागेल ती जिन्नस त्याला द्यायचा.राम- श्याम करायचा जेणेकरून पुढे ते गिऱ्हाईक अजून दोन गिऱ्हाईक त्याच्या झोपडीला घेऊन येईल.
संतू अन् गोंडाजी यांनी न्याहारी झाली अन् दोघं खदानीच्या उंचउंच भिंतीला सावलीचा आडोसा धरून पाय लांबून काही अर्धा घंटा निवांत बसून बोलत राहीले. बोलण्यात विषय तरी काय दोघेही तरुण त्यामुळं दोघांना अजून हवी तेव्हढी संसाराची घडी बसवता आली नव्हती पण उद्याच्या भविष्यासाठी काय करायला हवं अन् आज इथे सगळं मोप ठीक आहे पण उद्या या खदानीला तालुक्याच्या तहसिलदार साहेबांनी सील ठोकले तर आपण कुठे जायचं ? दुसऱ्या शहरात पुन्हा हे सगळं बस्तान बसवायला होणारा त्रास, असं एकूण सगळं त्यांच्या गप्पात चालू होतं.
दोघांची शिंगर आता चरूनचरुन पार फुगून गेली होती. गोंडाजी अन् संतू आपल्या गप्पा आवरत्या घेत उठले अन् दोघांनी आपल्या शिंगरांना पाणी दाखवून आणले. पुन्हा बांधून दोघेही खदानीत ठरल्या जागी दगुड फोडायला म्हणून खांद्यावर घन घेऊन निघाले.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा