"एक उलट... एक सुलट"
खरंतर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यावरील, रंगमंचावरील आयुष्य हे आपण नेहमीच बघत असतो. पण; मला या कलाकारांच्या बाबतीत एक अनामिक कुतूहल नेहमीच आहे. ते हे की, या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं पडद्यामागील खरंखुरं आयुष्य कसं असेल..?
पडद्यावर कधीतरी खोटं हसू घेऊन जगणारे किंवा खरं हसू घेऊन जगणारी ही कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात कशी असतील..? त्यांचा स्वभाव कसा असेल..? हे सर्व जाणून घेण्याचं मला अनामिक कुतूहल आहे.
यासाठी मग मी कित्येकदा त्यांच्या आयुष्यावर लिखित पुस्तकं वाचत राहिलो. पडद्यावर भेटणाऱ्या या कलाकारांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कलाकारांशी जुळवून बघत राहिलो. सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा अवेळी एक्झिट घेतली तेव्हा मात्र माझं हे कुतूहल अजूनच चाळवल्या गेलं अन् मग अश्या पुस्तकांची संख्या वाचनात अजूनच वाढत राहिली.
काही दिवसांपूर्वी असंच आवडत्या अभिनेत्री, लेखिका "अमृता सुभाष" यांचं हे त्यांच्या सहीसोबत असलेलं पुस्तक हातात पडलं. आज या उसवत्या सांजवेळी तीन तासांत ते वाचून संपवलं. पुस्तक संपलं तसं बुकशेल्फमध्ये ठेवलं, काही दिवसांनी ते पुन्हा परत करायचं आहे. खूप वाटलं हे पुस्तक संग्रही हवं, विकतही घेता येईल, पण "अमृता सुभाष" यांची सही असलेलं ते पुस्तक आहे. प्रत्येकाला त्याचं पुस्तक जीव की प्राण असतं त्यामुळं कितीही नकोसं वाटलं तरी ते पुस्तक परत करायलाच हवं. असो पुस्तक बुकशेल्फमध्ये ठेवलं, हातात कॉफीचा मग घेऊन सोनेरी पडद्याच्या विंडोग्रील आडून पाऊस बघत बसलो आहे.
पुस्तक वाचायला घेतलं एका बैठकीत वाचून संपवलं. पुस्तक खूप सुंदर अन् सहज अलवार असं आहे. कुठेही लेखनात फार अलंकारिक शब्दरचना या पुस्तकात आढळत नाही. त्यामुळं पुस्तक वाचतांना हे सर्व खूप सहज, सोप्पं वाटतं.
अमृता यांच्या आयुष्यातील आठवणींचा काळ, फिरस्ते, देश-विदेशात त्यांनी केलेली सफर त्यांच्या आयुष्यात असलेली माणसं, त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग ते कॉलेज लाईफ ते त्यांचा सिनेविश्वातील प्रवास, सोबतच त्यांचं अफाट वाचन या त्यांच्या आयुष्यातील सर्व घडामोडींची ओळख आपल्याला हे पुस्तक करून देतं
अन् या पुस्तकातून मग आपल्याला वडीलांसाठी हळवी अमृता भेटत असते. वडीलांसाठी हळवी होणारी अमृता काळजाचा ठाव घेणारी अन् खुप जवळची मला वाटली. कारण वडीलांचा खूप कमी वाट्याला आलेला लाड,सहवास आणि वडीलांचं आजारपण आज यशस्वीतेच्या शिखरावर असूनही वडील सोबत नसल्यानं आयुष्यात आलेलं अधुरेपण, अपूर्णत्व. हे सगळं जवळून अनुभवलं असल्यानं गलबलून यायला होत.
मग पुस्तकांत त्यांनी वडीलांच्या समवेत घालवलेले क्षण,या सगळ्या कैद केलेल्या त्यांच्या आठवणी आपलाच आयुष्यातील मागे सुटून गेलेला काळ आठवून द्यायला भाग पाडतात.
ह्या पुस्तकात असणाऱ्या संपूर्ण लेखांमधून माझा अतिशय आवडता लेख म्हणजे टोकियो स्टोरी - मुंबई स्टोरी हा शेवटचा लेख. टोकियो स्टोरी नावाच्या चित्रपटाचं अमृताच्या नजरेतून उलगडत गेलेलं भावविश्व आहे, ते वाचून हा चित्रपट बघायला हवा असं वाटून गेलं
खरंतर बराच वेळ पुस्तक वाचून झाला. पण; मन अजूनही त्यांच्या लेखणीने घातलेल्या "एक उलट एक सुलट" वीणेत अडकून पडलंय. त्यासाठी व तुमच्या या लिखाणासाठी अन् या पुस्तकातून तुम्ही ज्या कळल्या त्यासाठी,
"इश लीब दी" 💙
"इर्ली बीड..! असू दे, राहू दे..!
अक्षरांशी ओळख
अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा
आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर...
ती गाते सुरेख,
अभिनय तर तिच्या आवडीचा,
पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला...
तिच्या मनातल्या विचारवादळाची
अन् आयुष्यातल्या अनुभवसरिंची
अक्षरांनीच घडवली वीण...
एक उलट.. .एक सुलट
Written by,
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा