मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १

 वडार वेदना..!
दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - १ 

सूर्य अस्ताला गेला, पिवळी उन्हं तांबडं फुटल्यागत दिसू लागली होती. अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर झोपडीच्या चहूबाजूंनी पसरलेला दगडाला टाके द्यायला लागणारं साहित्य छनी, हातोड्याला अन् इतर वस्तू नागू जमवू लागला होता.

टाके द्यायची छनी, हातोडी त्यानं पाण्यात हीसळली अन् एक टोपल्यात टाकली. गणाबाईनं अंगणा मोहरच्या पडसावलीतल्या अंगणाला सगळं शेणानं सारून माखून घेतलं होतं. झोपडीच्या पुढे झोपडीला शोभेल अशी टिपक्याटीपक्याची रांगोळी तिने काढली होती. 

सांज जशी कलायला लागली तसं नागूनं सारा बाडबिस्तरा सावरत दगडात दिवसभर घडवलेली वऱ्हाटे, पाटे, उक्खळ, खलबत्ते, देउळमध्ये ठेवला जाणारा दगडी दिवा सगळं एक मोहरं लावले. अन् ; तो शेजारच्या झोपड्यात असलेल्या संतू घिसाड्याशी गप्पा मारायला गेला.

संतू घिसाडी पेताड असल्या कारणानं दिवसभर बायकोने डोक्यावर गाव गाव हिंडून वऱ्हाटे, पाटे विकून जमवलेला पैसा संतू त्याच्या बायकोला मागत होता. दोघात दुपारपासून कल्ला चालू होता, नागूला बघताच संतूची बाई नजर हिरमुसल्यासारखी करून झोपडीच्या असलेल्या पडद्याआड गेली अन् हमसून हमसून रडायला लागली. पण नशिबाला आलं त्याला कोण काय करणार.

नागूला बघून संतू स्वतःला सावरत चेहऱ्यावरील भाव बदलत चेहऱ्यावर बळजबरीचं हसण्याचा आव आणत संतू नागूकडे नजर चुकवत बघू लागला अन् जिभेला सावरत एक एक शब्द पुटपुट करू लागला.

अरे नागू कवशिक आलासा रं..!
नागू बोलता झाला,
हे काय येऊच रहायलो, तुझ्या बायकोचा अन् तुझा भांडण करण्याचा कल्ला ऐकून आलोसा म्हंटल संतूची बायको काहून केकलायली ..!

तितक्यात संतू बोलला : हम्म..!
नायतर काय रं, भाडीची वऱ्हाटे, पाटे विकून आलीय अन् पैका मागितला तर द्यायना झालीया मग दिलं मुस्कटात.
नागू त्यांच्याकडे बघत नजरेनं त्याला वरखाली न्याहाळू लागला बोलू लागला.
भाडीच्या ती नव्हं तू हायसा...
ती बिचारी अनवाणी पायांनी भर पहाटच्याला झोपडी सोडून डोईवर वऱ्हाटे, पाटे घेऊन गाव पालथं घालतिया. लोकांनी दिलेल्या भाकर तुकड्यावर दिवसभर गुजराण करतीया अन् तू काय आयतं बसून तिच्या जीवावर वरून तिला पैकं मागून रुबाब झाडतूया दळभद्रा कुठलासा...

संतू खरेपणाचा आव आणत बोलू लागला :
बारंग्या बारबाप्या तुला रं लई माझ्या बायकोची लागलीया बरं तू म्हणतू त्ये पण बरोबर हायसा पण मग मी दिवसभर उन्हातान्हाचं दिवसभर खदानीत मपली माय घालत दगड फोडतो ती खेचरावरून चढवून झोपडी लग आणतो.
त्याला टाके पाडून सोयीचं करतू आकार देतू त्याचं काय रं मर्दा , बोल की..!
अन् तू पण हेच करतुया की पण तुला प्यायला लागत नाय अन् मला पहाटच्या पहाट प्यायला लागतीया..!

नागू चेहऱ्यावर भोळा भाव आणत बोलू लागतो तुझं समदं खरं हायसा लेका पण; कसं अस्तया तिला वाटतंया पैकाला पैका लावावा भरपदरी पैसा जमल्यावर दोन डाग अंगावर घालण्यात म्हणून दिवसभर फिरत अस्ती ती अनवाणी.

संतू दात कोरत बोलू लागला:
हावरे नागू तुझं भी सबुत खरं हायसा पण पैका अन् सोन्याचांदीचे डाग काय मड्यावर न्यायची हायसा का..?

नागू बोलू लागला: नाय रं लेका मड्यावर कोण नेतूया जो तू मी नेतूया पण वाईट वखताला अडीअडचणीला डाग मोडतोड व्हत्यात बाकी म्या काय बोलावं तू लागून झालेला तरणा बांड हायसा संसार करायची रीत येईल तुझ्यापण अंग वळणीला.
संतू अण्णा नागूच्या गप्पा होऊस्तोवर दिवस अंधारून आला होता संतू - नागू आता झोपडी महोरं टाकलेल्या खाटेवर बसून गावा पहुतर असलेल्या खदानीबद्दल बोलू लागली होती खदानीचा दगड काम करण्यालायक हाय का नाय याची दोघांत विचारपूस सुरू झाली होती.

संतूच्या बायना चुल्हीवर भाजलेला कांदा,शेंगदाणे घेऊन ती डोक्यावर पदर सावरत बाहेर पाट्यावर वाटण वाटू लागली अन् तिनं वाटता वाटता रानुबाईंची विचारपूस नागूला केली.

क्रमशः
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...