दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग- ५
तिकडं शिंगरे ओली होतील अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेल्या पाऊसामुळे झोपडीला काही होणार नाहीना, याची चिंता त्यांना लागून होती. घरी एकट्या बायकामाणसं असल्यानं वावधन बघून त्यांना अजूनच विचार करून कसेतरी होऊ लागले होते.
घडी भरच्याने पाऊस ओसरला होता. बराच पाऊस झाल्याने गावातले नदी,नाले वाहू लागले होते. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने असलेल्या नाल्या तुडुंब भरून वाहत होते. सावत्या माळ्याच्या देऊळामागून गेलेला नाला तुडुंब भरून वाहत होता. अंधारून आलं होतं अन् किर्र अंधारात वाट काढीत संतू, नागू घराच्या दिशेने लागले होते.
पाण्याचा वाहणारा झोका अन् काळोखात खडकाच्या ठोकरा खात जेव्हा संतू अन् नागू आपापल्या झोपडीजवळ पोहचले, तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. दोघे आप आपल्या झोपड्या अन् सभोवतालची झाली अवस्था निरखून बघत होते, नागूने पोहचताच आपल्या शिंगराला बघितले तो झोपडीच्या एका अंगाला पत्र्याच्या तात्पुरत्या निवाऱ्यात बांधून ठेवला होता.
खूप वेळ झालेल्या पावसाने, वावधानाने त्याला हीव वाजून यावं असं झालं होतं. उभ्या उभ्या आपलं थरथरते अंग घेऊन झोपी गेला होता. नागूने त्याला बघून हळूच फाटक लाऊन झोपडी जवळ केली, तो झोपडीत आल्यावर बघतो तर काय रानूबाई अजूनही जागी होती.
सुमनबाई अन् गोंडाजी दिवसभर कामाने थकून गेल्यानं, काही वाहटूळ वाट बघून दोघेही परसदारच्या खोलीत जाऊन पहुडले होते. नागू आलेलं रानुबाईने बघितलं अन् अंगाला पीळ देत ती खाटेवरून उठून माजघरात गेली. तिनं भाकरीचं टोपलं अन् कोड्यासचा डब्बा आणून जेवायला म्हणून बसली, सोबत नागू ओले झालेलं धोतर बदलून ,डोक्याचे पाणी पुसत आला अन् संगतीने जेवायला बसला.
दोघांमध्ये पावसाच्या अन् दिवसभर केलेल्या कामाच्या उद्याच्या कामाच्या गप्पा झाल्या अन् जेवण करून दोघेही झोपी गेले.
पहाट झाली तसे सुमनबाई कोंबड्याच्या बांगेसरशी उठून, तांबड व्हायच्या आत तिने चुल्हीला पांढऱ्या मातीचा पोचारा घेऊन अंगणाला सारवून घेतलं. अंघोळ करून ती झोपडी समोर असलेल्या अंगणात रांगोळी काढत बसली. तिचा दादला गोंडाजी काही वेळानं उठून त्यानं शिंगराला सोडलं अन् तो त्याला उन्हात उन्हं खायला म्हणून घेऊन आला.
गोंडाजी अंघोळ पाणी करून जवळच असलेल्या देऊळमध्ये जाऊन आला. पाटे करायला म्हणून आज दगड आणायला जावं की टाके देत बसावं, हा विचार करत तो आणलेल्या दगडांची गिणती करत बसला. बराच माल तयार करून झाला होता अन् आता उन्हाळासुद्धा सरायला होता म्हणून अजून दोन चार दिवस खाणीतून दगुड घेऊन यावं म्हणून नागूशी बोलता झाला.
नागू नुकतच उठला होता अन् लिंभाऱ्याच्या काडीने दात घासत बसला होता. रानुबाई केव्हाच उठून आपलं न्हाऊन धुऊन सुमनबाईला स्वयंपाक करायला मदत म्हणून भाकरी बडवीत बसली होती .
गोंडाजी नागूला बघत ओसरीवर बसला अन् बोलता झाला.
म्या काय म्हणतो अण्णा अजून दोन-चार दिस दगुड घेऊन येतू म्हणतूया एकदा बरसदीचे दिस सुरू झाली की पुन्हा नाल्याखोल्याला पाणी येईल अन् आपली आबाळ व्हायची.
त्याच बोलणं ऐकून नागू बोलता झाला.
हा रं लेका मी पण ह्योच विचार करत होतो अजून दोन-चार दिस दगड घेऊन आलं का समधे बरं होईल म्हणजे पडत्या पावसात आपली आबाळ होणार नाय.
पुन्हा गोंडाजी बोलू लागला,
हा अण्णा एकदाची बरसद सुरू झाली का मग काय वजीस आपलं दगडाला टाकी द्यायचं काम करत बसू. अन् अधूनमधून पाऊस खंडला की, शहराला एखादं झोपडे लाऊन विकत बसू माल.
नागू बोलू लागला,
हा हे ब्येस असेल, जावा मग आज तुम्ही खदानीला मी अंघोळ पाणी करून बस्तू घाव घालीत दगडाला.
हे ऐकताच गोंडाजी ओसरीवरून उठला अन् त्यानं उन्हं खात असलेल्या शिंगरावर आपली हत्यार ठेवायची पोतडी टाकली. त्यात घन, हातोडा,पाण्याची कॅन अन् काही इतर आवजारे घेऊन तो शिंगराला घमील्यात पाणी देऊन ते पाणी पाजू लागला.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा