मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

सूर्य दुपारच्या पाराकडे कलता झाला होता. उन्हं मी म्हणू लागले होते आणि या उन्हाच्या तिरीपेत संतू अन् गोंडाजीचं दांडगे शरीर दगडावर घाव घालीत होतं. प्रत्येक घावासरशी दगडाच्या ठिकऱ्या उडु लागल्या होत्या, पाथरवट जसा छनीच्या सहाय्याने दगडाला आकार देतो तसा ओबडधोबड दगुड फुटून आकार घेऊ लागला होता.

कालपर्वाच खदानीत बार उडवला असल्यानं आज वऱ्हाटे, पाटे करायला म्हणून मोप दगुड उपलब्ध होता. वेळीच त्याला आकार देऊन शिंगरावर लादून फक्त त्याला झोपडीपर्यंत न्यायचं होतं, हे जितकं सोप्पं वाटत होतं तितकंही सोप्पं काम नव्हतं.
घटकाभर संतू अन् गोंडाजी काही आकार मिळालेला दगड घेऊन सावलीला आले. कॅनीत असलेलं पाणी गिल्लासात घेऊन दोघेही पित होते अन् घोटासरशी नरड्याच्या खाली उतरणारे पाणी सहज नकळत डोळ्यांना दिसून जात होते. पाणी पिऊन काही पाच दहा मिनिटांची विश्रांती म्हणून दोघे सावलीला खदानीच्या भिंतीला पाठ लाऊन आराम करत बसले.

इकडे रानूबाई, सुमनबाई अन् संतूची बाई तालुक्याच्या गावाला आपली वऱ्हाटे,पाटे डोईवर घेऊन गल्लोगल्ली विकत फिरत होत्या. इळाचे दोन सट जरी विकले तर दिवसभराची मजुरी हाताला लागल इतका पैका त्यांना भेटत होता. पण; हल्ली शहरात असो की खेड्यात परिस्थिती सगळीकडेच सारखी झाली होती.
प्रत्येक घरात वऱ्हाटे, पाटे, दिवे, उखळ काळाच्या ओघात लुप्त झालेल्या होत्या. हल्ली त्यांची जागा मिक्सरसारख्या इलेक्ट्रिक साधनांनी घेतलेली होती.

पहाटेच आठला निघालेल्या या तिघी बायका दुपारभरली तेव्हा एका शहराच्या कोपऱ्याला असलेल्या पडक्या घराच्या आसऱ्याला थांबल्या. कुठून बाटलीभर पाणी घेऊन दुपारच्या जेवणाला म्हणून बसून जेवण करू लागल्या होत्या. दोघींचा दुपारपर्यंत एक सट विकून झाला होता. तेवढ्यासाठी त्यांना अख्खं अर्ध शहर पायाखाली घालावे लागले होते. आता इतक्या थकल्या नंतर भाकरी खायची इच्छा नसूनही पोटाला भूक लागली म्हणून बळच त्या भाकरी गिळत होत्या. 

सोबतीने गप्पांचा फडही रंगला होता. आयुष्यात इतकी कष्ट असूनही जेव्हा अश्या घटकाभर गप्पांचा फड रंगायचा तेव्हा तितकाच त्यांच्या जीवाला विसावा मिळायचा. मग माहेरच्या आठवणी, बालपणाच्या आठवणी यांनी डोळ्यातून आसवांना मोकळी वाट करून दिली जायची. अश्या वेळी मग तिघीमध्ये अजून जवळीक निर्माण व्हायची अन् एकमेकींचे दुःख रिते करत त्या गप्पा मारत दुपारची भाकर खात बसल्या होत्या.

इकडे आज तिघांच्या झोपड्या असलेल्या त्यांच्या या वस्तीला फक्त नागूचा अन् त्यानं पाळलेल्या दोन कुत्र्यांचा आसरा होता. कंबरा इतके उंच भुरे दोन झिपरे कुत्रे अन् त्यांच्या दातांना बघितलं तर कुणी त्यांच्या झोपडीच्या जवळपास भटकणार नाही, अशी ती कुत्रे होते. कोणी खोडीला गेलं म्हणजे कुत्र्यांनी लचका तोडला समजा अशी एकूण अवस्था होती.

इकडे नागू पहाटेच पोरांना कामाला वाटी लावून देत न्याहारी करून बसल्याजागी छनी अन् हतोड्याची घाव दगडांवर घालीत दगडांना टाके देत त्यांना आकार देत होता. जसं मूर्ती तयार व्हावी तसे वऱ्हाटे, पाटे, दिवे, उखळे तयार होऊ लागले होते. हे काम जरी बैठकीचं होतं पण खरा कस या कामात लागत होता. एखादा चुकीचा टोला दगडाला लागला तर सगळा दगुड फुटून जाईल अन् सगळी मेहनत पाण्यात जाईल ही जोखीम असायची. पण; इतक्या वर्षांच्या कामानंतर आता हे कामाचं कसब नागूला उमगले होते अन् खूप सफाईने तो हे सर्व काम करत होता. तो पोरांच्या अश्या कामाशी काम वागण्याने खुश होता, पोरं अन् त्यांच्या बायका पण कामाशी काम करत असल्यानं नागुचा संसार अन् नागुच्या मित्राचा संसार फुलत असल्याचं त्याला जाणवत होतं. जरी गरिबीची झळ त्याच्या संसाराला कायम होती पण दोन्ही झोपड्यात नागूच्या शब्दाला मान 
क्रमशः 
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...