"तरवट"
गेले पंधरा दिवस Running मुळे जरा एकाकीच उजव्या पायाचे Sciatica (Buttocks) इजा झाल्यासारखे दुखायला लागले होते. Running झाल्यानंतर Warm-up, Stretching हे सगळं नियमित करूनही हा त्रास सुरू झाला होता. टॅब्लेटस् अन् डायट घेऊनही समाधानकारक असा फरक पडत नाहीये.
मग काल मित्राच्या सांगण्यावरून निसर्ग जवळ केला अन् भर दुपारी दोनच्या सुमारास या "तरवट" च्या शोधात भटकत राहिलो. काळाच्या ओघात निसर्ग आपल्यापासून कसा दुरावत आहे हे नेहमीच जाणवत होतं. पण; हे काल अजूनच प्रकर्षाने जाणवलं.
ही झाडं शक्यतो डोंगर उताराच्या, मुरमाड रानात अन् मानवी वस्ती असलेल्या परुंतू बऱ्यापैकी मोकळ्या जागेत खडकाळ रानात उगते. आमच्या तालुक्याच्या घराला चांगलं निसर्गसौंदर्य लाभलं आहे, त्यामुळं पंधरा-वीस वर्षापूर्वी ही झाडे अगदी घराच्या सभोवताली असलेल्या मोकळ्या रानात मोप प्रमाणात होती.
पण; गेल्या काही वर्षात निसर्गाचा झालेला ऱ्हास, जमिनीची झालेली धूप यामुळे ही झाडी आता घराच्या जवळ उपलब्ध नाही. मग काय दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकत होतो. अडीच- तीन की.मी रानात भटकंती करत ही झाडी मिळवली. घराच्या सभोवताली अजूनही मोठ्या प्रमाणात डोंगर, टेकड्या असल्यानं मस्त भटकंती होत असते. ती भटकंती सवयीची आहे, यामुळे अजूनही शहराला गेलो की मला शहरात फारसे करमत नाही अन् मग या मोकळ्या खडकाळ रानात असा एकाकी भटकत राहतो. लाल मातीचा पायांना स्पर्श करून घेत राहतो, रानातल्या फुफाट्याच्या वाटा जवळ करून घेत राहतो.
भर उन्हात भटकत असताना एकाकी असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पल्याड असलेल्या मोकळ्या रानात ही झाडी भेटली. माझा अंदाज बरोबर निघाला. मग काय हव्या तेव्हढ्या डहाळ्या तोडून घेतल्या.
उन्हामुळे जरा जास्तच गरमत होतं म्हणून वरती टेकडीच्या आश्रयाला गार हवेत बसूया असा विचार मनात आला आणि दुखरा पाय फरफटत घेऊन टेकडीवर गेलो. तहान लागली होती मग एका झिऱ्यातून निघत असलेलं पाणी डायरेक्ट त्यात तोंड घालून पोटभर पिऊन घेतलं. तेव्हा पोटात जो गारवा जाणवला त्याचं सुख काही औरच, मग टेकडीवर हवेशीर बसून राहिलो.
खदानीत काही बायका धुणे धूवत होत्या, काही गुराखी बकऱ्या, गुरे चारत होती त्यांना न्याहाळत बसलो. जीवाला जरा थंड वाटलं तेव्हा एका बाभळीच्या पडसावलीत घंटाभर तिथच निजून राहिलो.
सूर्य अस्ताला कलला तसं पुन्हा घराची वाट जवळ केली. घरी आलो ठरलेली कामे झाली अन् जेवणं झाल्यावर तरवटचा पाला तव्यावर गरम करून सुती कपड्यात पायाला बांधून झोपी गेलो. सकाळी बऱ्यापैकी आराम जाणवला, आता आठ दिवस रोज पाल्याचा उकडा लावल्यासारखं जायचं पाला घेऊन यायचं.
बरं आहे आयुष्य निवांत आहे, नशिबाने निसर्ग जवळ आहे. मग भटकत असतो असं अधूनमधून, कधीकधी वाटतं आपलं जगणं थोरोमय आहे. ज्या जगण्यात सुखून आहे, फार अपेक्षा नाही जगण्याकडे असं हे निवांत जगणं.
आता पुन्हा जाईल थोड्यावेळाने पाला आणायची वेळ झाली की, भटकत राहील जोवर घराची वाट जवळ करावी वाटत नाही तोवर.
Bharat Sonawane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा