मुख्य सामग्रीवर वगळा

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ३

संसारासाठी झुरत असणारी रानूबाई नागुला दिसू लागली होती तसे त्याला त्याचे अन् रानूबाईचे नव्याचे नवतीचे नऊ दिवस आठवू लागले होते. नागू आणि रानूबाई यांचं लग्न झालं अन् घरात आपसात होत असलेल्या कलहामुळे दोघे सासूसासऱ्यांनी वायली काढली.

एकदमच वायली निघाल्यामुळे काय करावं ? हा प्रश्न होता. वडिलोपार्जित काम जमत होतं पण इतका अनुभव नागूच्या पाठीशी नव्हता पण आता हे सगळं काम आपल्याला करणं भाग होतं, तेव्हा त्याला रानूबाईची खंबीर साथ लाभली. संसाराला लागणारं साहित्य घेऊन ते दोघे भटकत भटकत भिल्हाटी गावच्या खदानीला आले.

तिथं संतूशी ओळख झाली अन् काम भेटलं, सुरूवातीला रानूबाईसुद्धा नागूला माणसांच्या बरोबरीने खदानीमध्ये दगड फोडायला मदत करू लागली. पर्याय नव्हता, हाताला काम नव्हतं आलेलं काम करणं भाग होतं.

नवतीचे नऊ दिवस संसार फुलू लागला होता, संसाराची घडी बसत होती.भर उन्हात काम करायचं, काळा पाषाण फोडायचा. उन्हं मिन मिन करायची उन्हाच्या झळा दूरवर तुटत असतांना नागू अन् रानूबाई आपल्या डोळ्यांशी हातची वर्तुळे करून बघायची. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख मिळवत एकमेकांना एकमेकांचा आधार होत ती दोघे काम करायची.

भर दुपारी भरली की घटकाभरचा विसावा म्हणून खदानीच्या आडकपारीला डोंगरातून पाझरणाऱ्या पाझराजवळ गारवा अनुभवत घाम टिपून निवांत अंग टाकून दोघे पडून रहायची. मग काही काळ विसावा घेतला की धुडक्यात असलेली भाकर अन् जाड पिठलं, ठेचा खाऊन पुन्हा शिंगराच्या पोटाची उशी करून ती दोघं निपचित पडून रहायची.

नवे नवतीचे दिवस असल्यानं मग अश्या या गार वेळेत ती दोघं डोळ्यांनीच प्रेमाचे खेळ खेळायचे अन् बराच वेळ निवांत पडून रहायचे. तीनचा पार कलला की अजून घडीभर सांजेच्या उतरत्या उन्हात नागू दगड फोडायचा अन् रानूबाई तो शिंगराला बांधून काही दगडांना टाके मारत बसायची.अश्यावेळी कधी संतू अन् त्याची जोडीदारीन सोबत असायची तर कधी हे एकटेच असायचे दोघं.

दोघांचा हा फुलणारा संसार बघून नागूचा लहान भाऊ गोंडूजी त्यांच्याकडे रहायला आला. तो ही खूप मेहनत करू लागला,तिघे रात्रंदिवस काबाडकष्ट करू लागले. पुढे गोंडाजीचं जवळच्या एका गावातील भावकीत असलेल्या पाहुण्याच्या पोरीशी लग्न लाऊन दिलं अन् सुमनबाई लहानगी भाउजय म्हणून त्यांच्या घरात नांदायला आली. ती पण तितकीच कष्टाळू निघाली आत चौघे कष्ट करत होते सुखाचा संसार अजून फुलत होता.

दिवसभर फोडलेला दगड शिंगरावर टाकून घरी आणायचा त्याला शिंगरावरून उतरून व्यवस्थित लावायचं मग त्यांच्या आकारानुसार वऱ्हाटे, पाटे, मंदिरात असलेले दिवे,जाते असं काही बाही करून ती विकायला म्हणून जवळच असलेल्या तालुक्याच्या गावाला घेऊन जायचं मग विकलेल्या पैक्यात घराला लागणारा दाळदाना करायचा असं एकूण त्यांचं घर चालत होतं. 

दूरवर अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत शून्यात अन् या आठवणीत रममाण झालेला नागू रानुबाई जवळ आल्या तेव्हा तिच्या कोल्हापुरी वाहनांचा आवाज आला तसा भानावर आला. उंचपुरी, लांब नाकाचा शेंडा असलेली अन् घारुळे डोळे असणारी, गोरीपान अन् सडपातळ शरीराची रानुबाई ढवळ्या पिवळसर लुगड्यात अजूनच सुंदर दिसायची.

आज तिचं हे रूप बघून नागू तिच्या रूपाला भुलला होता. दिवसभर इतकं वणवण करूनही लक्ष्मी आईच्या चेहऱ्यावर तेज असावं तितकं तिच्या चेहऱ्यावर होतं. तिनं नागूकडे बघत डोळ्यांनीच त्याला खुणावले अन् तो लाजून तिच्या डोक्यावर असलेलं खलबत्त घेऊन त्याला ठरलेल्या जागी ठेवायला निघून गेला. आज तो पुन्हा रानू बाईच्या प्रेमात पडला होता, त्याला पुन्हा त्यांचे जूने दिवस आठवत होते. आता सांज सरायला होती. 

नागूने दिवसभर टाके मारून ठेवलेली वऱ्हाटे, पाटे एकांगाला लावली अन् तो खाटेवर बसून राहिला. रानुबाई आली तसे अंगणाची झाडझुड करून सडापाणी करून मोहरल्या अंगणात तिच्या झोपडीला शोभेल अशी टिपक्याची रांगोळी काढून. हातपाय धुऊन केसांचा आंबडा घालून नागूपाशी खाटेवर येऊन बसली अन् दिवसभर केलेल्या भटकंतीतून आराम म्हणून नागूशी काहीवेळ अस्ताला जाणाऱ्या सूर्याला बघत गप्पा करत राहिली..!

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...