आठवणींचा पसारा..!
हिचकियों में वफ़ा ढूंढ रहा था कमबख्त
गुम हो गई दो घूँट पानी से..!
- गुलजार...
जसजशी रात्र सरू लागते तसतसे माझे संवेदनशील मन,मनाचे असंख्य ठोकताळे,बदलणारे विचार अन् मनाचे असंख्य असलेले कप्पे उघडून बघू लागतं.जशी रात्र हळुवार होते,तसे माझे विचार करणे कल्पनेच्या विश्वात आधिकच समरस होवून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागते ते प्रगल्भ असं काहीतरी भासते दिवसाच्या उजेडापेक्षा रात्रीच्या अंधारातच...
जसजशी रात्र सरत जाते तसतसा मला इतिहास खूप जवळचा वाटायला लागतो.कारण इतिहास हा नेहमीच माझा खूप आवडता आहे फक्त हल्ली त्याचे नाव बदलून आठवण झाले आहे,होय आठवण...
जुन्या गोष्टीत हल्ली मी जास्त रमतो,आपण म्हणत नाही का अडगळीच्या खोलीत असलेल्या काही जुन्या गोष्टी जसजश्या जुन्या होत जातात तश्या त्या धुळीच्या त्या वातावरणात हरवत जातात आपल्यासाठी विरळ होवू लागतात पण सोबतच त्यांच्या बाबतीत असलेल्या आठवणी कायम धूसर होण्यापेक्षा आधीकच दिवसेंदिस खुलत जाणाऱ्या वाटतात मला हल्ली...
जसं मी काही चार अक्षरं लिहायला लागलो तेव्हापासून एक गोष्ट मला उमगली आहे की माणूस जे काही दिवसा लिहितो ते बहुतेक सर्वच कल्पनेच्या विश्वात रममाण होवून लिहत असतो.
जेव्हा रात्र सरू लागते,काळोख ओळखीचा वाटू लागतो,भिंतीच्या एका आडोश्याला ठेवलेली चिमणी जेव्हा मिनमिन करू लागते त्यावेळी मनात येणारे विचार जेव्हा आपण सादळलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात पडलेल्या डायरी कम वहीत आपण लिहू लागतो...
अन् जेव्हा आपल्याच लिहत्या हाताच्या सावलीचा लिखाणावेळी आपल्याला अडसर होतो तेव्हा जे मनात येतं अन् जे आपोआप कागदावर अक्षरांचा अंदाज घेऊन लिहल्या जातं तेच खरं लिखाण.उगाच नाही ती आयुष्याची गणितं लावता सांजेची हातात घेतलेली मोरपीस शाईच्या दौत पात्रात बुडून राहिली अन् झोप लागून गेली पूर्वजांना...
काळोखाच्या राती जागून जे काही लिहल्या गेलं ते मनातून आलेलं होतं,जो विचार लिहताना केला होता तो एकांताचा सानिध्यात जसं काळोखात अनुभवलेल्या विहिरीत बुडल्यावर जसं जिवाचं गुदमरून जाणे होईल इतकं खोलवर विचार करून टिपलेले असतं.यातलं बहुत कल्पनेतले नसून घडलेलं असेल कारण बहुतकरून रात्रीस कल्पनेस थारा आपलं मन घालत नसते....
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा