एक साथी ऐसा भी था..,!
भर मध्यरात्रीची ती वेळ रस्त्याच्या मधोमध भरधाव वेगाने चालणारी आमची ट्रक,दोन्ही बाजूने दूरदूर एकही गाडी नाही एखादी जवळून गेली की नकळत अंगाला थंडगार वाऱ्याच्या झुळकेतून येणारे काटे,कॅबिनमध्ये मध्यस्थी असलेल्या आरश्याच्या फितीत गुंतवलेला रातराणीच्या फुलांचा गजरा अन् हिंदी,उर्दू गझल प्रिय असलेला आवडता मित्र ड्रायव्हर....
हा प्रवास आयुष्यभर संपावा वाटणार नाही असा होता,मोजून संपूर्ण एक दिवस अन् दोन रात्रींचा हा प्रवास आजही जवळ जवळ चार वर्षांपूर्वीचा हा प्रवास मला आठवतो.तो फक्त या प्रवासात ऐकलेल्या गाण्यांमुळे असो किंवा त्या रातराणीच्या फुलांच्या गजर्यामुळे आजही तो सुगंध मी अनुभवतो त्या आठवणींमधून...
रात्रीचा सोबतीला अधून मधून बरसणारा पाऊस झोप यायला लागली की,रस्त्याच्याकडेला ट्रक लावून वाफाळत्या चहाला रात्रीच्या कुठल्याही वेळेला अनुभवणे.वाफाळत्या चहाच्या वाफेत बघत ही रात्र मी जगत होतो,जी आजवर आता फक्त कल्पनेत जगत आलो आहे.
आयुष्यात इतकी सुंदर रात्र तरी आजवर नाही जगलो...
खूप लहान वयात खुप मोठ्या जबाबदाऱ्या मला माझ्या नशिबाने भेटत गेल्या त्यातीलच ही एक जबाबदारी होती,जी मी इतक्या लहान वयात एका मोठ्या हुद्यावर काम करतो याची मला जाणीव करून देत असायची...
परंतु आता हे सगळं मागे सुटले आहे,सगळं फक्त आठवणीत राहिलं आहे.माझ्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी इतकं सर्व आरामाचे जगणं सोडून मला स्वतःला आजमवण्यासाठी मला या रहदारीत पुन्हा एकदा रिकामे करून सोडून दिले मी कश्यासाठी..? का बरं..? याला उत्तरे नाही बस आयुष्यात संकटांशी दोन हात करायचे आहे मग असे अनुभव येतच असतील...
तर हा प्रवास रस्त्याने आमच्यासारखे भेटणारे असंख्य मुसाफिर,सोबतीने निसर्गाचे सौंदर्य आणि रात्री हवाहवा वाटणारा हा सहा पदरी रस्ता...
कतरा कतरा जिने दो,जिंदगी है..!
प्यासी हू मै प्यासी रहणे दो..!
हे एकच गाणं जवळ जवळ दोन तीन तास ऐकत बसलेलो तेव्हापासून हे गाणं कुठेही ऐकले की मी मला त्या प्रवासाच्या आठवणीत फिरवून आणतो...
फारच डुलकी असह्य झाली की दोन-तीन तास एखाद्या पेट्रोल पंपावर गाडी लावून मित्राचं झोपणं असायचं.अश्या प्रवासात मला कधी झोप लागत नाही,मग तो झोपला की आपलं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना बघत बसणे व्हायचं,विविध भाषेत बोलणारी ती ड्रायव्हर लोकं अन् त्यांचा हा जीवनप्रवास मी मग कल्पनेतून अनुभवायचो...
मित्र झोपला की सांगून झोपायचा थंडी वाजली कधीतर चहा घेऊन ये,कारण मला दोन दिवस सांभाळण्यासाठी त्याला दिलेली माझी जबाबदारी अन् त्याच्या मनात असलेला माझ्या बद्दलचा वयाने लहान असून असलेला आदर,आजही कुठे भेटलातर त्याचं तेच आदराने बोलणं. आयुष्यात काही माणसे खूप जवळची वाटतात,त्यातीलच हा एक मित्र त्यांच्यासोबत हे काही क्षण जगलो होतो...
सध्या दोघेही वेगळ्या वळणावर आहे,त्याचाही त्या गाडीवरचा प्रवास संपला आहे,पण आयुष्याच्या या वाटेवरती अनेकदा बऱ्याच वळणावर त्याची भेट होते....
मग रात्रभर त्याच्या आवडीच्या गझल ज्या त्याने एक पेन ड्राईव्हमध्ये भरून ठेवल्या होत्या त्या प्रवासात ऐकत बसायच्या,सोबतीला तो ही म्हणायचा त्याचा आवाजही खूप सुंदर,तो अत्तर लावायचा त्याचा येणारा सुगंध अन् या प्रवासात मला खास भेट म्हणून त्याने दिलेली अत्तराची कुप्पी पुढे कित्येक दिवस जपून ठेवली होती.वेळेच्या ओघात बऱ्याच गोष्टी माझ्यापासून दुरावल्या गेल्या त्यातच ही अत्तराची कुप्पीसुद्धा मी माझ्या बेफिकीरपणामुळे गमावून बसलो...
बाकी तो मित्र,त्याच्या उर्दू गझल,अत्तराचा सुगंध,विशिष्ट पेहराव,आदराने दिलेली हाक,मला रातराणीचा सुगंध आवडतो म्हणून रात्रीत दोनदा तो रातराणीचा फुलांचा गजरा बदलवून बदलवुन नवीन घेऊन लावायचा,तो दरवळ,कॅबिनमध्ये मला करून दिलेली जागा आणि हा सर्व प्रवास आठवणीत आहे....
आठवणीत आहे तू Azzahrudin bhai..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा