गाव अन् गावची लोकं
भरर दुपारची वेळ होती उन्हं डोक्यावर आलेली,घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सदर्याला समीप होवून एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून सदर्यावर पांढऱ्या बुंदक्यातून ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते...
नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकर्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचावर वाळूत आपले पाय रोवत,एका हाताने उपरण्याने चेहऱ्यावरील घाम पुसत चालला होता....
मी पांदीच्या रस्त्यानं असलेल्या लक्ष्मीआईच्या देऊळात बसलो होतो,दूरवर स्मशानात तुळसाआईचं जळतं मडं जळत होतं.उंच उंच आकाशात जाळाचे लोळ दिसत होते,नदीच्या कडेला तुळसाआईचे वापरलेले नववार लुगडे अन् जरीच्या खणाच्या शिवलेल्या चोळीचे गाठुडे तिच्या नातवाने पाण्यात सोडायच्या हिशोबान ठेवले होते,तुळसाआईचा जावयाने त्याला ते गाठुडे पाण्यात टाकण्यास नकार देऊन काठावर ते ठेवायला सांगितले.वस्तीवरचे कुणी गरीब घटकाभरच्या वख्तानं येईल अन् ते गाठुडं घेऊन जाईल हे तुळसाआईच्या जावयाला ठाव होतं...
आकाशात उंच उंच आसमंतांशी एकरूप होणारे आगीचे लोळ अन् त्या आगीच्या पल्याड दिसणारा मोहम्मदचाच्या बकर्या हाकरीत चालला होता,त्याचे ते हाकरन्याचे बोल माझ्या कानापर्यंत येत होते...
ओ... आरे ओ..! उदर कहाॅं खपरीरे रांड..!
इदर ईत्ता घास छोडके उदर कहाॅं जारी,
छर छर अय केवढी..!
माॅका साला इकतो इत्तीसारी धूप अन् ये क्या बिचारी बुड्डी का आज इंत्काल हो गया,या मेरे आल्ल्हा बहोत बुरा हो गया रे..!
मी कधी त्या जळत्या तुळसाआईच्या प्रेताकडे बघत होतो तर कधी दूर हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहम्मद चाच्याकडे.त्याच्या बकऱ्या म्हणजे साऱ्या गावाच्या बांड बकऱ्या होत्या असं सारे गाव त्याला म्हणायचं.म्हणून त्याला शेताच्या रानाला कुणी बकऱ्या चरूंन द्यायचं नाही,तो बकर्याकडे लक्ष देत नाही असं सारा गांव म्हणायचा.
पहाट झाली की आठच्या वख्ताला गावातले रोजंदारीवर जगणारे लोकं आपली खपुडी घेऊन मोहम्मद चाच्याच्या बकर्याच्या वखरात घेऊन यायचे,मग मोहम्मदचाच्या महिन्यानं त्या बकऱ्या राखुळी करता राखायला घ्यायचा...
गाव धड गाडीवर चालू द्यायचा नाही अन् धड पायी चालू द्यायचा नाही...! ही गावची रित त्याला माहित होती,म्हणून तो बकऱ्या राखुळी करून आपले जीवन सुखाने जगत होता.आज वारलेल्या तुळसाआईची एक पाठसुद्धा मोहम्मद चाच्याकडे राखुळीला होती,म्हणून तो मनोमन बोलत,त्याला वाईट वाटलं अन तो तिच्याबद्दल रस्त्यानं बर्तळत चालला होता....
दुपारचे ऊन,तुळसाआईच्या प्रेताचे जळते मडे,आसमंतात एकरूप होणारी आगीचे लोळ,बकऱ्यांचा आवाज,लाल मातीतून चालता चालतांना,बकऱ्यांच्या खुरातून उडणारी लाल माती,बकऱ्या पांदिने पुढे गेल्या की मुताच्या ओघळाचा पांदीने येणारा इसाडा वास,बंद झालेलं देऊळ अन् देवीच्या महुर ठेवलेलं काल परवाचं खोबरं कुरतडत असतांना येणारा उंदराचा आवाज....
मोहम्मद चाच्याचे माझ्या दिशेनं येणं,दूरवरूनच मी त्यांच्या नजरेत नजर न घालता माझ्या विश्वात रममान असल्याचं दाखवणं. त्यांनी हटकवत मला विचारणं,इधर कहा हिंडरा रे..?
मी अडखळत उत्तर देणं..!
कुछ नही चाच्या ओ आयेलता आपने गाव मी तुळसाआईका जनाजे के संग..!
इतक्यात काय व्हावं कडाडकन आवाज व्हावा जसं कुणाच्या डोक्याची कवटी फुटावी अन् मी वेड्यागत मोहम्मद चाच्याच्या डोळ्यांमध्ये बघावं,काहीतरी झालं आहे पण मला न सांगता त्यांनी उसने अवसान घेऊन तिथून निघावं अन् मला म्हणावं जा घरकु जा..!
क्रमशः
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा