Birthday Wishes अन् बरच काही..!
पहाटेची रोजची साडेपाचची वेळ नेहमीसारखं फिरायला जाणं होतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली असलेली सावली बघत अंदाज घेत मी चालत राहतो.आज बर्थडे होता अन् पाय जरासे दुःखत असल्यानं दोन्ही वेळची रनिंग आज बंदच होती..!
हा तर मी काय म्हणत होतो की स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली पहाटे चालत असतो.एक एक करून बंद होणारी स्ट्रीट लाईटस् आता मला खुणावत असतात.जसं आयुष्यातील एक वर्ष जितकं सहज म्हणजे स्ट्रीट लाईटने चालू होवून बंद व्हावं तितकं सहज संपून गेलं आहे..!
आयुष्याच्या या वळणावर आहे की जिथे आता वय खुणावते आहे.आता जगण्याला कारण शोधत असतो नेहमीच अन् छोट्या छोट्या गोष्टीत जे समाधान मिळते त्यातून ही कारणे सहज मिळून जातात.आयुष्याला घेऊन बरीच स्वप्नं बघितली होती,जवळ जवळ सर्व पूर्ण झाली आहे.काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे तर काही खूप परीक्षा घेत आहे,होईल सर्व ठीक लवकरच अन् ती स्वप्नसुद्धा पूर्णत्वास येतील..!
बाकी पाऊस पडून गेला आहे.निसर्गात सर्वदूर हिरव्या गवताची तृण पहाटे दवात अभिषेक करून आपलं सौदर्य जपवत सौंदर्य प्रदर्शन करत असतात.
फिरायला जातो त्या टेकड्या असलेल्या डोंगराळ रानात दरवर्षी येणारी मेंढपाळ बांधव यावर्षीसद्धा आले आहे..!
काल-परवा त्यांनी पाल लावला कित्येक पिल्लं नुकतीच दोन-तीन दिवसांपूर्वी जन्मली असावी अशी वाटली अन् मला माझ्या जन्माची कहाणी आठवली..!
मान्सूनचा अवकाळी पहिला पाऊस पडून गेला अन् या पाऊसात डोंगरात असलेली करवंदाची जाळी भिजून गेल्यानं करवंद भिजली.आयुष्यात पहिल्यांदा या वर्षीच्या पहिल्या पडत्या पावसात ती करवंद तोडली..!
एरवी विकत करवंद माहीत होती पण आज हाताने तोडून सागाच्या हत्तीच्या सुपासारख्या असलेल्या कानाएव्हढ्या पानात आईला ती करवंद तीन मैलावरून डवणे करून घेऊन आलो.
काय कारण असावं माहीत नाही पण एक वाटून गेलं की,जी बंजारा समाजाची याडी (आई) वर्षानुवर्ष आमच्यासाठी विकतची करवंद घेऊन येत होती तिच्या हाताला माझ्यामुळे विसावा मिळाला असावा दहा पाच मिनिटांचा.
हे असं छोट्या छोट्या गोष्टीत मला हल्ली समाधान मिळतं अन् हे गेल्या एक वर्षात स्वतःसाठी करवून घेतलेला स्वतःमधील बदल आहे..!
बाकी निसर्ग खूप जवळचा वाटतो आहे.अलीकडे माणसांच्या गर्दीपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायला लागले आहे,त्यामुळे हल्ली निसर्गात राहण्याचा माझा अवधी सुद्धा वाढत चालला आहे.खरं आहे एक दिवस निसर्गाचाच व्हायचं आहे,त्यामुळं हे भान ठेवून हे असं त्याच्या समीप येणं योग्य वाटतं..!
बाकी आज खूप शुभेच्छा अन् खूप प्रेम भेटलं तुमच्याकडून त्यासाठी Thank you..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा