हृदयात वाजे Something..!
सारे जग वाटे Happening..!
कदाचित पुढील पंधरा मिनिटांच्या आत जोरदार पाऊस येईल असं वाटत आहे.मी खिडकीत बसून काचेच्या पलीकडं असलेलं हे मनमोहक दृश्य न्याहाळत बसलो आहे...
इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून मी हे सर्व बघत असतांना दूरवरून येणाऱ्या पावसाच्या सरी क्षणाक्षणाला जवळ येत असल्याचा भास होतो आहे.
काही वेळापूर्वी हिरवाईने नटलेला शहराच्या चहूबाजूंनी असलेला डोंगररांगेचा परिसर आता मात्र जिथवर नजर जाईल तिथवर पावसाने न्हाऊन निघाला आहे.इमारतीच्या खाली असलेली माणसे त्यांची कामे आवरती घेत आपलं बाडबिस्तर झाकूनपाकून ठेवत आहे.
सिक्युरिटी गार्ड सोसायटीच्या आवारात अस्तव्यस्त गाड्यांना पार्कींगमध्ये नीट लावायला सांगतो आहे.इतक्या उंचावरून तो हातवारे करत जे काही लोकांना सांगत आहे,त्यावरून तो रोजच या माणसांना सांगून कंटाळला असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर जसे दिसत असतील तसे माझे नजरेसमोर येऊन गेले आहेत.
हॉलीबाॅल खेळणारी मुलं खेळाच्या मैदानावरून घराच्या दिशेने सायकली घेऊन निघाली आहे.त्यातील एकाच्या सायकलची कदाचित चैन उतरली असावी,त्यामुळं तो सायकल बळजबरी ओढत ओढत घेऊन निघाला आहे.हे सर्व बघून त्याचे मित्र त्याला हसत आहे ; पण त्याच्या मदतीला कुणी येत नाहीये,तो भांबावलेल्या अवस्थेत ती सायकल ओढत आहे.
मी लहानपणी ऐन पाऊस येण्याच्या वेळी पेपर वाटत असतांना,माझी सायकल पंक्चर झाली की माझी होणारी अवस्था अन् भर पावसात एखाद्या घराच्या आश्रयाला माझं थांबणं हे सर्वच त्या मुलाच्या फजितीमुळे माझ्या नजरेसमोर येऊन गेलं.
आपसूक डोळे पाणावले अन् आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलणारे मन अजुन काही काळ त्या आठवणीत रममान झाले.
हायवे वर वडील माणसांची,आईंची गर्दी जमली आहे.कधी एकदा शाळेची बस येते अन् कधी एकदा आपापले मुलं घेऊन पाऊस येण्याच्या आधीच आपण आपल्या फ्लॅटमध्ये पोहचू असं सगळ्यांना झालं असावं,एखाद दोन मुलांच्या आईंनी तर लहान मुलांचे रेनकोट पण सोबत आणले आहे.काही मुलांचे बाबा मोबाईल बघण्यात गुंग आहे.
सिक्युरिटी गार्ड अंकल आता स्ट्रीट लाईटच्या स्विचवर काहीतरी झाकायला हवं ; म्हणून एक जुनी तेलाची कॅन कापून ती त्या स्वीचवर कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे.
सोसायटीच्या आवारात असलेल्या भाजीपाला विकणाऱ्या माझ्या आईच्या वयाच्या मावशी पावसाचं कुणी गिऱ्हाहीक येईल म्हणून चार चार वेळेस दुकानातील भाजीपाला झाकून उघडा करत आहे.त्यांच्या नजरेत असलेले भाव मी बसल्या ठिकाणी हेरले आहे अन् त्यांच्या मनात चालू असलेले विचार काय असतील हे ही सहज हेरले आहे.
सोसायटी सोडून काही दूर असलेल्या प्रेस करणाऱ्या काकांची कोळश्यावर चालणारी इस्तरी पावसाळ्याच्या दिवसांत कोळशे भिजल्यामुळे विस्तव धरेनाशी झाली आहे.काल सायंकाळी त्यांच्याजवळ मित्रांच्या समवेत बसलो असतांना सुहास बोलून गेला की,"काका तुम्ही किती दिवस ही इस्तरी वापरणार जमाना बदलला आहे तुम्हीपण बदला"..!
काकांना त्याच्या या बोलण्याचे खूप वाईट वाटले असावं,असं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून मला वाटलं.पुढे काकांनी सुहासच्या हातात त्याच्या पप्पांच्या इस्तरी केलेल्या कपड्यांची पिशवी दिली अन् सुहास निघून गेला.
मग काका आम्हाला पुढे कितीवेळ समजवत राहिले की इलेक्ट्रिक इस्तरीपेक्षा या कोळशाच्या इस्तरीने कशी कडक इस्तरी होते अन् महिन्याला एक लाख पगार कमावणाऱ्या सुहासच्या पप्पांना ही कडक इस्तरी केलेले कपडे कसे आवडता घरच्या इलेक्ट्रिक इस्तरीपेक्षा.
आता पाऊस आला होता काकांनी दुकानाचे शेटल ओढून घेतले,माऊशी भाजीपाला झाकून चहा पीत खुर्चीवर बसून राहिल्या होत्या.
सिक्युरिटी गार्ड अंकल त्यांच्या कॅबीनमध्ये आजचे कुरियरचे आलेले पार्सल बघून ज्यांचे ते पार्सल होते त्यांना शिव्या घालीत होता.फावला वेळ भेटला म्हणून पार्सल ज्यांचे आहे त्यांना फोन करत होता.
स्कूल बस आली होती मुलांचे आई वडील बरेच ओले झाले होते.शांततेत घरी जायचं सोडून ते बसवाल्याला बोल लावत होते,बस ड्रायव्हर यूपीचा असल्यानं तो विनवण्या करीत होता..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा