पिंगळा..!
आपल्या महाराष्ट्राला अनेक कलांचा वारसा लाभला आहे.काळानुरूप पिढीजात अश्या अनेक कलांना संबंधित पिढीतल्या कलाकारांनी जपवले आणि अश्या अनेक लोककला आजवर जिवंत आहे; काही काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहे..!
हे महाराष्ट्राला लाभलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे,हे जपल्या जावं त्याबद्दल लिखित स्वरूपात दस्तावेज उपलब्ध असावे म्हणून हा लेख.आज आपण अश्याच एक लुप्त होण्याच्या कगारावर असलेल्या लोककलावंत अन् लोककलेबद्दल जाणून घेऊया...!
ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजन आणि प्रबोधनासाठी या कलांचा जन्म झाला असला तरीही आजकाल शहरातही त्यातील काही कलाकार मंडळींचा वावर असतो.प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलाकार करीत असतात.
पण नव्या पिढीला या कलांची जाण नाही की त्याविषयी आपुलकीही नाही असे अलीकडे दिसून येते; किंवा असेही न म्हणता त्यांचं या लोककलेच्या सादरीकरणावर अवलंबून राहून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी नवीन मार्ग स्वीकारले असं म्हणायला हरकत नाही..!
पहाटेच्या वेळी दारोदार फिरून देवाच्या नावाने भिक्षा स्वीकारून आपला उदरनिर्वाह करणारे असे अनेक कलाकार आहेत अन् पहाटेच्या वेळी गावागावात आपल्या कलेच्या माध्यमातून जनसामान्य प्रबोधन करण्याचे काम हे कलाकार करत असतात..!
त्यात पिंगळा,वासुदेव,बहुरूपी वेश धारण करून आपली कलाकारी दाखवणारे कलाकार आले.यातील वासुदेव,बहुरूपी यांच्याबद्दल आपण बऱ्यापैकी जाणून आहोत.परंतु आजच्या पिढीला "पिंगळा" या लोक कलाकाराबद्दल फारसे माहीत नाही तर चला जाणून घेऊया पिंगळाबद्दल..!
आई,आज्जीच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या तोंडून ऐकल्या की आपल्याला या पिंगळ्याचा प्रवास उलगडतो.तोच जो वर्षानुवर्ष बदलत आला आहे..!
काल आईशी बालपणीच्या आठवणींना घेऊन बोलत असताना पिंगळ्याचा विषय निघाला अन् आईच्या बालपणी पिंगळा कसा असायचा तो कोणते गीतं म्हणायचा हे सगळं आईनं सांगितले.
आईचं बालपण एका खेडेगावातील,त्यामुळं तिच्या लहानपणी तिला जितकं या पिंगळाबद्दल आकर्षण होतं तितकेच आज मला आहे.
आई सांगत होती की पिंगळा हे प्रकरण खूप भारी होतं रात्री सारा गाव निपचित शांत झोपलेला असायचा तेव्हा हा पिंगळा रात्रीच्या साडेतीन चारच्या सुमारास त्यांच्या त्या विशिष्ट वेशभूषेत गावाच्या मधोमध असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून एका हातात ल्यांप घेऊन अन् एका हातात कुडमुडी (छोटा डमरू) घेऊन त्याच्या तालावर गाणी म्हणायचा.जी की माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करत असत मग उजेडले की गावातल्या बायका,म्हाताऱ्या त्याला शिधा,भिक्षा वाढून देत असत.
माझ्या आयुष्यात मी पिंगळा बघितला तेव्हा कदाचित मी दहा - अकरा वर्षांचा होतो,ऐन हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तो आमच्या वस्तीला यायचा आजही तो तसाच नजरेसमोर येतो ...!
डमरुचा विशिष्ट प्रकारे आवाज करत पारंपरिक वेषात पहाटे सुयोर्दयाच्या वेळेपूर्वी अंधारातच हातात कंदील घेऊन त्याच्या उजेडात फिरत पारंपरिक गाणी,अभंग म्हणत जाणारा पिंगळा आता दुर्मिळ होत चालला आहे..!
पिंगळा महाद्वारीं, बोली बोलतो देखा.
चिंबळी-
पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा ।
शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ।।
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ।।
भविष्यात डोकावण्याचे वेगवेगळे मार्ग,पद्धती या माणसाच्या भौतिक विकासाबरोबर बदलत गेल्या. इंटरनेटवर ज्योतिषाचे दुकान मांडून बसलेले ज्योतिषी आणि पोपटवाला ज्योतिषी एकाच शहरात बघायला मिळतात.मार्ग कुठले का असेना,मुक्कामाचे ठिकाण तर एकच आहे ना..!
भविष्यात काय वाढून ठेवलंय..? लोकसाहित्य,कला,संस्कृती यात त्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. पिंगळा हा लोककला प्रकारही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा. पूर्वी अनेक लोक भविष्य पाहण्यासाठी पिंगळ्याचा आधार घेत असत.
वासुदेव,वाघ्या,नंदीबैलवाला,बहुरुपी,यांच्याच मालिकेतला हा पिंगळा.गळ्यात कवड्याची माळ,देवाचा टाक (चांदीच्या पत्र्यात कोरलेला छोटा देवाच्या चित्राचा ठसा), तबक, त्यात छोटी तसबीर,गळ्यात एक छोटी झोळी,धोतर किंवा हल्ली लेंगा असा हा पिंगळा सकाळी सकाळी एखाद्या घरात जाउन काही तरी बोलतो आणि ते खरं होतं..! त्याच्या जीभेवर म्हणे काळा तीळ असतो.अशी लोकांची त्यांच्याबद्दल असलेली धारणा..!
एखाद्या घराच्या अंगणात जाउन तो त्या घरातल्या माणसांच्या भवितव्याबद्दल काहीतरी विधान करतो. त्याने काहीबाही अभद्र बोलू नये म्हणून घरातील वयस्कर स्त्रिया त्याला भरघोस शिधा,धान्य आणि पैसे देतात. मग तो खूश होऊन आशिर्वादपर वक्तव्य करतो.लोक त्याच्या पाया पडतात; म्हणजे त्याच्या गळ्यातल्या देवाच्या पाया पडतात.एखाद्या घरात कुणी फारशी दाद दिली नाही तर देव वाईट करेल अशी भीती घालतो...!
रामप्रहरी असे शिव्याशाप कोण पदरी पाडेल..? त्यामुळे काहीतरी झोळीत पाडूनच तो पुढे जातो.रामप्रहर संपला की पिंगळा निष्प्रभ होतो.तो त्याच्या दैनंदिन उपेक्षित जीवनात गुरफटून जातो.वर्षाचे ८ महिने महाराष्ट्रभर पायपीट करायची, भिक्षा मागून जगायचे हा त्यांचा दिनक्रम.उरलेले ४ महिने गावाकडे जायचे,शेतात काम करायचे,मोलमजुरी करायची,मिळेल त्यात गुजराण करायची हा शिरस्ता..!
पिंगुळ ही तसा नामशेष झालेली लोककला.आजच्या तरुण पिढीला तर माहीत नसलेला प्रकार. ग्रामीण भागात सूर्य उगवण्याच्या आत कामाला सुरवात होते. त्यामुळे पिंगळ्याला दान मिळते.शिवकाळात या पिंगळ्याने मोठी भूमिका बजावल्याचे इतिहास सांगतो.स्वातंत्र्यपूर्व काळात हेरगिरीचे काम पिंगळ्याने केले.
शत्रुच्या गटात काय चालले आहे याची बितंबातमी शिवाजी राजांपर्यंत पोहचविण्याचे काम यांनी केले.त्यामुळे या कलेला राजाश्रय होता. पहाटे दोन वाजता उठायचे तीनपर्यंत प्रात:विधी उरकायचा. डमरू आणि कंदील घेऊन निघायचे गावात. सूर्य उगवेपर्यंत भिक्षा मागायची. सूर्य उगवल्यानंतर पुन्हा आपल्या तळावर जायचे, हा त्यांचा दिनक्रम...!
या भिक्षेत त्यांना कोणी शिधा देतात तर कुणी रोख पैसे.त्याच्या बदल्यात ते त्यांच्या पिढ्यांचा उद्धार करतात.मुले शिकल्याने या व्यवसायात तरूण पिढी येत नाही.काळाच्या ओघात ही लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.शाश्वत इन्कम नसल्याने या व्यवसायात कोणी येत नाही.लोकांचे भविष्य सांगतांना आपले भविष्य अंधारात असूनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला सांभाळत धन्यता मानणारे पिंगळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा