मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्नांचा पाठलाग अन् खुप काही..!

स्वप्नांचा पाठलाग अन् खुप काही..!


मला माणसांच्या सहवासात राहण्याचा कितीही कंटाळा असो परंतु एका त्या स्टेपला गेलो की असं वाटतं की आपण सभोवताली असलेल्या माणसांच्या सहवासात रहायला हवं.कारण निसर्ग खूप देतो आपल्याला त्याच्या सहवासात राहिलं की;पण कुठेतरी एकवेळ अशी येते की माणसांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटू लागतो..!

आयुष्यात आलेली असंख्य वळणं अन् त्या वळणावर भेटलेली कित्येक माणसं कोण कसं,कोण कसं,कुणाच्या वागण्यातून कशी वागणूक मिळाली,कुणी कसं मैत्रीच्या पलिकडे जावून माझ्यावर त्यांचा जीव ओवाळून टाकला तर कुणी काय तर कुणी काय..!
अनेक वाईट अनुभवसुद्धा येऊन गेले अन् मग साधं काही वेळच्या सहवास,मैत्रीसाठीसुद्धा मी माणसांना पारखून घेऊ लागलो.इतकं सर्व होवूनही माणसांचा सहवास तितकाच हवाहवासा होता..!

मी शहरात बऱ्यापैकी जुना असल्यानं कित्येक मित्र झाले,कित्येक सोडून गेले,कित्येकांना मीच वेळीच सोडचिठ्ठी दिली तर कित्येकजण आपणहून माझ्या एकांगी,एकटं राहण्याच्या असलेल्या सवयीमुळे मला सोडून गेले.याचं मलाही कधीच सोयरसुतक नव्हतं,कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशी अनेक माणसं भेटत गेली,जिथं वेळोवेळी मी वरील सर्व निर्णय घेत राहिलो..!

दोन एक महिन्यांपासून सकाळ,सायंकाळ फिरायला जाणं होतं आहे,कितीही टाळलं तरी मित्रांच्या सहवासात काही वेळ निघून जातो ; अन् आता त्या मित्रांची सवय झाल्यासारखे वाटू लागले आहे.

सवय म्हणजे माझ्याशी कुणाची तार जुळावी इतकाही मी नॉर्मल नाहीये पण वेळोवेळी भेटणं,व्यायामाच्या वेळी बोलणं नंतर रिलॅक्स होण्याच्या वेळी होणाऱ्या गप्पा हे सगळं होत असतं.
मी माझं वेगळ्या विश्वात रममाण असतो परंतु त्यामुळं सभोवताली असणाऱ्या प्रत्येक त्या मित्राचा सहवास,त्याला विचारांनी न्याहाळणे होते.मित्र बरेच झाले पण त्या दोन तासांच्या पलिकडे त्यांच्याशी माझं बोलणं नाही की मलाही तिथे करमत नाही..!

असाच एक मित्र गेली दोन महिने वेळोवेळी भेटत होता,दोघेही शहरात जुने असल्यानं एकमेकांना चेहऱ्याने ओळखत होतो.तो माझ्यापेक्षा मोठा आहे.

अलिकडेच महाराष्ट्र पोलीस दलात त्याचं सेलेक्शन झालं,त्यासाठी त्याने घेतलेली अपार मेहनत,रात्रीचा दिवस करणे,अभ्यास करणे हे सर्व जवळून बघितले असल्यानं त्याच्याबद्दल मनात एक आदराची भावना नेहमीच होती.
डिफेन्ससाठी तयारी करणाऱ्या मुलांच्या बाबतीत नेहमीच मला आदर आहे,कारण त्यांची मेहनत वाखण्याजोगची असते...

तो लवकरच निवड झाल्यानंतर असलेल्या पोलीस प्रशिक्षणासाठी जाणार आहे हे माहीत असल्याने त्याच्याबद्दल आनंद वाटत होता.फार जवळचा मित्र नव्हता पण येता जाता भेटला की हाय बाय होत असत..!

ग्रुपमध्ये आमचं धावून झालं की आम्हाला सगळ्यांना तो काय योग्य,काय अयोग्य हे सांगत असायचा अन् एक डीसीप्लेन जे असतं ते त्याच्यात होतं.त्यामुळं त्याच्याशी फारसं बोलणं नसले तरीही छान वाटायचं..!

आला की मिळूनमिसळून राहणं व्हायचं,थोड्याफार गप्पा व्हायच्या अन् आम्ही आल्या मार्गाने घरी निघून जायचो.बस इतकंच काय ते सर्व पण ; काल कळलं की तो उद्या निवड झाल्यानंतर असलेल्या पोलीस प्रशिक्षणासाठी आज रात्री निघतो आहे..!

काहीवेळ मनात विचार येऊन गेला की,त्याचा सहवास त्याचे अनुभव सांगणारा तो उद्यापासून आपल्या सोबत नसेल.एका नवीन आयुष्याची उद्यापासून तो सुरुवात करतो आहे अन् हे सर्व खूप आनंददायी असं होतं.कारण या क्षणांना अनुभवण्यासाठी,इथवर केलेला त्यानं प्रवास,यात खूप काही त्याने आजवर सोसलं होतं,अपार मेहनत घेतली होती..!

आमच्यात फारसे बोलणं नसूनही दोघं एकमेकांना भेटलो,हस्तांदोलन केलं मी काय बोलावं याच विचारात असतांना त्यानं मला बेस्ट लक केलं कारण त्यानेही गेले काही दिवस आमची जूजबी मेहनत बघितली होती पण आज त्याला मला हे बोलण्याची वेळ असुनही पहिले तो बोलला,मग मीही त्याला बेस्ट लक केलं अन् काळजी घे म्हणून सांगितलं..!

का माहित नाही पण जेव्हा मी त्याला काळजी घे म्हणून म्हंटले तेव्हा मी माझं त्याच्यासाठी हळवं होणं कंट्रोल केलं.अन् पुढच्या क्षणाला वाटलं की मित्रांच्या सहवासात रहायला हवं..!

त्याला खूप शुभेच्छा,खूप प्रेमासह..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...