मुख्य सामग्रीवर वगळा

शाळेच्या आठवणी..!

शाळेच्या आठवणी..!

ऐन पावसाळ्याचे दिवस भरात असायचे नदी,नाले,धरणं तुडुंब भरुन वाहत असत अन् घरा सभोवतालचा सर्व परिसर हिरवाईने नटलेला असायचा.घराच्या जवळच छोटी-छोटी तीन धरणे,दोन खदानी असल्यामुळे पावसाळ्याच्या आठवणी आजवर तितक्याच ताज्यातवान आहे जितके ते दिवस होते..!

इतकं सर्व निसर्ग सौंदर्य अनुभवायला असल्यानं कधीतरी अश्या भर पावसात शाळेत जायचं म्हणजे जीवावर यायचं.परंतू शाळेत जायच्या वाटेनं नाल्यातून अनेक कसरती करत एकमेकांचा हातात-हात घेऊन त्या पाण्यात घट्ट पाय रोवून चालण्यात जे थ्रील वाटायचं त्यासाठी का होईना शाळेची वाट आम्ही जवळ करायचो..!

मोठ्या नाल्यातून वाहणारे पाणी,नाल्यात येणारं झऱ्याच्या रुपात डोंगर टेकड्या अन् परिसरातील पाणी,सतत चालू असलेला पाऊस त्यामुळं सटकत्या झालेल्या वाटा अन् त्यावरून अजून सटकत आपटत,पडत चालायचं..!

नव्याने पाऊस सुरू झाला की तळ्याच्या कडेला दिसणारी,सतत ओरडत राहणारी पिवळी बेंडकं,दूरवरून पाण्याच्या प्रवाहात वाहून येणाऱ्या मासोळ्या,मांगुर मासा,खेकडा,छोटी छोटी साप बघायची म्हणून नदी नाले हुडकत फिरणं.अश्या असंख्य आठवणी,ज्याबद्दल कितीही लिहले तरी कमी पडेल..!

पावसाळ्यातील शाळा विषयीसुद्धा स्मृती पटलावर अश्याच अनेक आठवणी कोरलेल्या आहेत.पहाटे साडेसहा वाजता शाळेच्या वाटेला लागायचं,भर पावसात नाले पार करून शाळेत जायचं.वर्गाबाहेर अस्तव्यस्त झालेल्या चपलांच्या रांगा,बाहेर वाळू घातलेल्या अनेक मुलांच्या रंगीबिरंगी छत्र्या.अशी छत्री आपल्या वाट्याला कधी आली नाही,म्हणून अनेकदा वाटलं एखादी गायब करावी पण शाळेची शिस्त त्यामुळे हा फक्त विचार राहिला..!

वर्गात दरवाज्याला वाळू घातलेले रेनकोट,दप्तर ओले होवून फक्त कोरडी राहिलेली पाठ अन् या सगळ्यात मग आपली रोजची ठरलेली जागा तिथं आपलं बसून राहणं.एकतर मी उंच त्यात ती जांभळ्या रंगाची हाफ चड्डी त्यामुळे वाटणारी लाज..!

पत्राची शाळा असल्याने भर पावसात सर शिकवायचे नाही.मग मुलं ज्याची त्याची उद्योग करत बसायची,खोड्या गप्पा,कुणी नवीन पुस्तके आणली असेल तर त्यातील चित्र बघत बसायची..!

मी शेवटून तिसरा बसायचो.पाऊस पडत असला की वर्गाची गळणारी पत्रे मग जिथं कुठं पत्र गळत असेल तिथे खाली अंथरलेली बसायची पट्टी गोळा करून टाकून द्यायची,ते पडणारं पाणी तिच्यावर पडत रहायचं..!

प्रत्येकाचा शाळेत एक आवडता आठवणींचा कोपरा असतो,तसा माझा त्याच म्हणजे दुसरीच्या वर्गातील तो आवडता कोपरा.आमचा दुसरीचा वर्ग म्हणजे मला नेहमीच तात्पुरता आसरा म्हणून असलेला वर्ग वाटला..!

कारण त्या वर्गात अनेकदा बदल झाले मी जेव्हा दुसरीला होतो तेव्हा तो आमचा वर्ग होता नंतर,शाळेत श्यामची आई चित्रपट दाखवायचा असला की त्या वर्गात दाखवायला लागले.त्या वर्गात बऱ्यापैकी अंधार राहत असल्याने कदाचित सिनेमा थिएटरची फिलिंग तिथं तो चित्रपट बघत असतांना येत असावी असा शिक्षकांचा अंदाज असावा.पुढे ती रुम अडगळीची खोली झाली नंतर,शाळेत खिचडी शिजवायला म्हणून त्या खोलीचा वापर खिचडी मामा करायला लागले.अशी अनेक स्थित्यंतर त्या खोलीने बघितले..!

माझ्या खेरीज मला नाही वाटत कुणाला तो वर्ग आवडला असावा,माझी दहावी झाली शाळा मागे पडली अन् आता कित्येक वर्षांनी जावून बघतो तर मोठी ईमारत तिथं उभारली आहे,ते लिंबाचे झाडसुद्धा तोडून टाकले आहे..!

त्या वर्गात मी शेवटच्या मागे बसणाऱ्या मित्रांच्या समवेत रहायचो,मागची मुलं अन् पुढची मुलं यांची दोन विश्व असल्याचा भास मला त्या वर्गात व्हायचा.त्यात भरीस भर म्हणून माझं एक वेगळं विश्व होतं अन् जास्तीत जास्त वेळ मी माझ्या विश्वात रममाण असायचो..!

पाऊस पडत असला की वर्गाची पत्र वाजत रहायची,सर शिकवायचे नाही.मुलं गोंगाट करत रहायची जो मला आवडायचा नाही,मग मी त्या लांबचलांब असलेल्या वर्गात शेवटच्या भिंतीजवळ जावून बसायचो.

तिला एक मोठी जाळीदार खिडकी होती,जी सतत उघडी असायची.तिच्या पल्याड एक मोठ्ठी रुंद बोळ तिच्यात जाई,जुई,गुलाब,मोगरा यांची फुलं,वेली,झाडी होती जी त्या खिडकीच्या आधारे आमच्या वर्गाच्या पत्रावर गेलेली होती..!

खिडकीच्या अन् माझ्यामध्ये एक अडसर होता तुटलेली असंख्य लाकडी बाकडे तिथं ठेवलेली होती.त्याच्यावर उन्हाळ्यात पेपर झाले की आपली जी जुनी पुस्तके शाळेत जमा करायची असतात ती सर्व व्यवस्थित बांधून ठेवलेली असायची..!

मला त्या पुस्तकांचा काही एक फायदा नव्हता,कारण मी नवीन इयत्तेत गेलो की माझी पुस्तके बदल व्हायची,हे नाटक दहावी पर्यंत सुरू होतं.त्यामुळे जुनी पुस्तकं कधीच वाट्याला आली नाही अन् नवीन बऱ्याचदा पैश्या अभावी घेता आलीच नाही..!

मी त्या जुन्या पुस्तकांचे गट्टे खोलून त्यातील अनेक पुस्तकं वाचत राहायचो,बघत राहायचो.अश्मयुगीन इतिहास खूप आवडता असल्यानं तो वाचत रहायचो..!

नुकताच पाऊस पडून गेला की वर्गात पत्राला आधार म्हणून असलेल्या गुळगुळीत लाकडांना गाल लावून त्याचा गारवा अनुभवत बसायचो.बाहेरची फुलं बघत बसायचो,त्यांचा माझ्यापर्यंत येणारा दरवळ घेत बसायचो जो आजवर तसाच आठवणींसोबत डोक्यात आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...