मुख्य सामग्रीवर वगळा

संवेदनशील मनाच्या व्यथा..!

संवेदनशील मनाच्या व्यथा..!

नुकतेच जेवण करून शतपावली करण्यासाठी घराच्या बाहेर पडलो.वातावरणात झालेला बदल शरीराला जाणवू लागला आहे,शरीराला गारवा अनुभवायला मिळतो आहे.

दिवसभर कामाच्या व्यापात दिवस कसा निघून जातो कळत नाही,जेवण झालं की शतपावली करण्याचा हा हक्काचा अर्धा तास.जो रोज हवाहावसा वाटतो,अलीकडे दुपारपासूनच यावेळेची आठवण यायला लागते अन् एकदा का ही वेळ आली की संपूच नये असं हल्ली खूपच वाटून जाते..!

तसेही लॉकडाऊनच्या काळात घरात बसून राहण्याची कॅपेसिटी अजूनच वाढली आहे.एरवी असेही मला फार मित्र किंवा कुणी इतर जवळच्या व्यक्ती लागत नाही,त्यामुळं मी अन् आपला एकांत आमचं मस्त चालू असतं..!

मला हल्ली माणसांच्या गप्पात रमण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडतं,वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत भटकंती करायला आवडतं. त्यामुळे मित्र,जवळची माणसे यांना घेऊन माझं फार नडत नाही अन् या एकटेपणात जो आनंद मिळतो तो काही औरच आहे,जो मला खूप हवाहवासा वाटतो.यासाठी अनेक गोष्टी,मित्र पणाला लावले तो भाग वेगळा कधीतरी या गोष्टीचं नुकसानही होतं जे खूप भयंकर आहे की मी पूर्णपणे नैराश्यात जातो.
But हे सर्व छान आहे..!

असो माझ्या बाबतीत नेहमीच मी काहीतरी सांगत आलो आहे,त्यामुळे तेच तेच सांगण्यात काही हासिल होत नाही किंवा फायदा नाही.

शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलो की स्ट्रीट लाईटच्या उजेडात ओळखीच्या वाटा मी जवळ करतो.दुतर्फा झाडं असलेल्या सूनसान वाटेला मी चालू लागतो,दूरदूर कुणी नसतं शतपावली करण्यासाठी.इतकी भयाण वाट कुणी निवडावी पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला निसर्गात रमायला आवडतं म्हणून इकडं भटकणं होतं..!

उंच उंच निरगिलीचे झाडं अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह त्यांच्या फांद्यांचा येणारा आवाज,त्यांच्या फुलांचा येणारा सुगंधी सुवास.एकांगाला भयाण अंधाराची जाणीव करून देणाऱ्या बोडक्या बाभळी,निंभाऱ्याची झाडं,गुलमोहर,त्याच्या लाल फुलांचा पडलेला सडा,उंच उंच वाढलेलं बकान अन् रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेली मेहंदीच्या उग्र सुगंध देणाऱ्या झाडी,रातराणीचा सुगंध हे सर्व जवळचं अन् हवसं वाटणारं..!

स्ट्रीट लाईटच्या उजेडात दहा-पाच मिनिटाला जाणारी एखादी टू व्हीलरखेरीच दुसरं कुणी इकडं भटकत नाही.दूरवर विद्यालयाची ईमारत तिच्या मेन गेटवर वर्षभरापूर्वी सेक्युरिटी गार्ड म्हणून एक मित्र असायचा,तो आता तिथं नाही.नाहीतर फिरायला आलं की घंटाभर त्याच्याशी गप्पा ठरलेल्या.शाळेच्या स्टाफशी त्यामुळे झालेली ओळख,लेखक म्हणून मला त्यांचं आवंजावं घालून बोलणं..!

या पावसाळ्यात त्या मित्राची प्रकर्षानं आठवण येईल शतपावली करायला आल्यावर.कारण मागील दोन वर्षांच्या पावसाळ्यात कित्येक पावसाच्या राती मी फिरायला आलो अन् पाऊस आला की त्याच्या कॅबीनमध्ये बसून घालवल्या.त्या सर्व रात्री,अश्यावेळी प्रकर्षाने आठवतात..!

काही माणसं चांगली असतात पण वेळ त्यांना वाईट बनवते,त्याच्यासोबत तेच झालं असावं अन् त्यानं हे काम सोडून दिलं.त्याच्या कॅबीनमध्ये जळणारा पिवळा लाईट आजही जळतो आहे,नोंदणीचे रजिस्टर बदलले त्याची जागा दुसऱ्या रजिस्टरने घेतली,अर्जफाटे अधूरे तसेच पडून आहे..!

सहा बाय सहाच्या खोलीत पडत्या पावसाला घेऊन भविष्याची चिंता,अनेक स्वप्न त्यानी मी या कॅबीनमध्ये बघितली.पाऊस पडायचा थांबला की त्याला घरी जायची ओढ अन् मला वाहत्या पाण्यात वाटा शोधत रात्रभर भटकत राहण्याची लागलेली आस.त्यानं मला कित्येकदा वेड ठरवलं पण मी आज माझ्या जागी तसाच आहे जसा दोन वर्षांपूर्वी होतो..!

त्यानं आयुष्यात खूप स्थित्यंतर पाहिली अन् मी माणसांचा सहवास टाळत राहिलो अन् एकाकी पडून गेलो.आजही त्याच मार्गाला माझं शतपावली करणं होतं,त्याने त्याच्या आयुष्यात दोन वर्षात कित्येक मार्ग बदलले असतील.कदाचित त्याला या क्षणांचा विसरही पडला असेल पण मला मात्र हे सर्व कालपरवा घडल्यासारखं वाटतं..!

संवेदनशील मनाच्या गोष्टी काही वेगळ्याच असतात अन् संवेदनशील मनाची माणसं आयुष्यात फार भटकत नाही,हे ही या दोन वर्षात कळून चुकलं.असो अर्धा तास झाला आहे,परतीची वाट खुणावत आहे जायला हवं.
बाकी आता सवय झाली आहे,नाहीतर अधून मधून तो सोबत असायचा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...