वाभळेवाडी भाग-२
सांज केव्हाच सरली होती,सूर्य कधीच अस्ताला गेला होता ;अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता.
नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता,नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज,नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर,जगण्या,तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता.नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता..!
याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती.नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती,व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती,गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत,इवळल्यागत ओरडत होती..!
रातीचे दहा कधी सरले अन् सारा गाव बरसदीचे दिस असल्यानं कधी पहुडला हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर,जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही..!
संतू आण्णा पारावरच आपली कागदपत्राची,आफिस कामाची कागदं असलेली सुटकेस उश्याला घेऊन अन् कपड्याच्या पिशीची वळकटी करून चालून-चालून पिंडय्रा अन् खालपर्यंत पाय दुखायला लागल्यामुळे ती तळपायाच्या खाली घेऊन रामा कुंडूर अन् जगण्याच्या गप्पा ऐकत पहुडला होता.तिशीचे आसपास असलेला संतू आण्णा तलाठी गावच्या गप्पामध्ये रमून गेला होता..!
रामा कुंडूर एक बाजूला टरमळे ठेवून उख्खड बसून बिड्या फुकीत त्याचा धूर वरती काळीकुट्ट पळती ढगाड बघत त्या दिशेनं सोडीत बसून गप्पा झोडीत होता.जगण्या लिंब पाराच्या खाली उख्खड बसून त्यांच्या गप्पाच्या तालावर तंबाखू मळीत होता,तंबाखू मळून झाली तसं तो संतू आण्णाकडे बघत म्हंटला,
ओ सरकारी जावई घेताय का व्ह आयतावयता मळून दिलेला तंबाखुचा विडा..!
अन् ; संतू आण्णानं झोपल्या जागीच हात लांबवत तो विडा एक चुटकीत पकडला अन् ओठा खाली टाईट दाबून धरत बसल्या जागीच एका हाताच्या डोपरावर एका अंगाला होत सडकीवर जोरात पीक हानली..!
मग गावच्या गप्पा सुरू झाल्या,तिशीच्या संतू अाण्णा मावळजे ते संतू आण्णा तलाठी इथ पर्यंतचा प्रवास संतू आण्णा रामा अन् जगण्याला सांगू लागले.गावची बारबापी लोकं कोण,कोण सरकारी कामात दखलंदाजी करतो,गावचा सरपंच कसा आहे तो कसा त्याच्या कारभारणी पुढं बैल होवून वागतो हे सगळं जगण्या अ्न रामा एकमेकांना बघत सांगू लागले..!
गावची शाळा,शाळामास्तर,जुना तलाठी,आठ दिवसाला येणारा ग्रामसेवक.ग्राम पंचायतीची इमारत पावसाळ्यात गळतीला लागल्यामुळे झोल्या आईच्या पडघरात तात्पुरती उभी केलेली ग्रामपंचायत हाफीस.गावाच्या एकांगाला असलेलं तलाठी हाफीस..!
जुन्या तलाठीशी गावच्या लोकांनी घातलेली हुज्जत अन् गावच्या काही बांड तरुणांनी रात्री जावून तलाठी हाफीसचा अर्धा तोडून टाकलेला दरवाजा या साऱ्या हकीकती दोघं संतू आण्णाला सांगू लागले होते..!
क्रमशः
भाग एक वाचण्यासाठी खालील माझ्या ब्लॉगला भेट द्या..!
http://bharatsonwane.blogspot.com/2022/07/blog-post_56.html
Written by,
Bharat Sonwane
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा