निसर्ग,आयुष्य अन् गणितं..!
आयुष्याचं गणित जुळवायचं म्हणजे वेळेची गणितं वेळेतच सुटायला हवी.नाहीतर ; आयुष्यभर आयुष्याचं गणित जुळत नाही मग वेळेची अन् आयुष्याची होणारी वेळोवेळी होणारी फरफट ठरलेली असते..!
असंच काहीसं आयुष्यात आलेल्या माणसांच्या बाबतीत आहे.आयुष्यात आलेली काही माणसं वेळीच सोडचिठ्ठी देऊन देऊन सोडता आली पाहिजे अन् ;काही आयुष्यभर आपल्या सोबत हवी म्हणून त्यांना जपता आली पाहिजे.आयुष्यात ही गणितं जमली की मग पुढील आयुष्य सहज,सुखकर होवून जातं..!
हल्ली लिहायला फारसं मन धजावत नाही पण आभाळ दाटून यावं तसं सध्याच्या आयुष्यात मळभ दाटून येतं अन् मग त्यापासून मोकळीक म्हणून काही दोन-चार दिवसांनी या दोन-चार ओळी लिहण्याचा मनाचा अट्टहास असतो.जो पूर्णत्वाला नाही गेला की,राहून राहून दिवसभर काहीतरी चुकत असल्याचे भास होत राहतात. अन् सोप्पं असलेलं आयुष्य मग मला गुंतागुंतीचं वाटायला लागतं..!
मग ते लिहणं विचारांनी पोजिटीव्ह असो वा निगेटीव्ह ते असं लिहून टाकायला हवं आहे.कोण वाचल,कोण काय म्हणेल,कोणाला कसे वाटेल हा विचार अश्यावेळी माझ्या मनात येत नाही.बरेच दिवस हे पाळत असल्यानं सवयीचं झालेलं आहे..!
हल्ली पहाटेची सुरुवात डोंगर,दऱ्या,खोऱ्यात तर कधी मैदानावर होते.त्यामुळे निसर्गाला घेऊन हळवं होत असलेलं माझं मन फारवेळ मी कसा निसर्गाचा होवून राहील,निसर्गाच्या समीप राहील याचा विचार करत असतं.
पहाटेची भटकंती तिकडे होतेच पण कधीतरी सायंकाळी मनावर एकाकीपणाचे मळभ दाटून आले की मी माणसांच्या सहवासाला टाळत टाळत मला निसर्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा जवळ करू लागतो..!
एरवी असंही मी माणसांचा असून माणसांचा राहिलेलो नाही अशी जाणीव मला प्रकर्षाने होते.मित्र बोलत राहता मी ऐकत राहतो पण माझे विचार हे तुलना करत राहते की निसर्गाचा सहवास माणसांच्या सहवासापेक्षा कितीपट चांगला आहे.
कारण एकच असते,मनाला हवा असणारा एकांत तासंतास डोळ्यांना विस्फारून विस्मयचकित होऊन डोळ्यासमोरचा निसर्ग डोळ्यात कैद करत रहायचं,हातात काही येत नाही.
निसर्गाचं गणितच असं आहे की तुमच्या हातात काही येत नाही एकदा निसर्गाला घेऊन अनुभवण्याचा क्षण निघून गेला की तो पुन्हा नाही.त्यामुळं असा कुठला क्षण सुटायला नको म्हणून ही ओढ आहे..!
काही घटकाभर निसर्गाच्या सान्निध्यात राहून परतीच्या वाटेला लागले की माणसाने उभ्या केलेल्या वास्तू खुणावू लागतात,अनोळखी माणसे ओळखीची वाटू लागतात.मग अनेक प्रश्न पडू लागतात ज्यांना माझे मन उत्तरे शोधू लागते..!
बाकी मागे खूप काही सुटून गेलं आहे.बरीच जी नको वाचायला वाटतात अशी पुस्तकं वाचण्यावाचून टेबलवर पडून आहे.आवडते काहीतरी वाचायला हवं आहे पण पुस्तकांचा साठा माझ्या मुर्खासारखे वाचत राहण्याच्या सवयीमुळे संपला आहे.हल्ली लिखाणाच्या भुकेपेक्षा मला वाचनाची भूक खूप आहे.
बरंच अधुरे लेखन पूर्णत्वाची वाट बघत आहे पण दिलेल्या पूर्णविरामनंतर मनात खूप काही लिहायला असूनही हात लिहायला धजावत नाहीये.त्यामुळं कसं सगळं थांबलं आहे..!
हल्ली पाऊस ओळखीचा झाला आहे,अधूनमधून तो येऊन जातो त्यामुळं मनावर दाटलेलं मळभ काही अंशी का होईना दूर होतं.अजुन भिजणं झालं नाही पाऊसात,तशी वेळ येऊन गेली पण मी टाळत राहिलो.पाऊसापासून घटकाभरचा विसावा म्हणून निसर्गात हरवलेल्या माझ्या निवाऱ्याला शोधत राहिलो..!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा