पाटणादेवी भ्रमंती..!
शुक्रवारी "भटका तांडा" समूहाचे प्रमुख "श्रीकांत उमरीकर" सर यांच्या समवेत पाटणादेवी येथे पाटणा भटकंती पूर्व नियोजन बैठकीस जाण्याचा योग आला अन् यामुळे "पाटणादेवी दर्शन" व तिथून जवळच असलेले "हेमाडपंथी महादेव मंदिर" बघण्याचा योगही आला..!
पाटणादेवी कुलदैवत असल्यानं नेहमीच जाणे असते परंतु अलीकडे तीन चार वर्ष जाणे झालेले नव्हते.तो योग शुक्रवारी उमरीकर सर यांच्यामुळे जुळून आला.सध्या सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्यामुळे पाटणादेवी सभोवतालचा सर्वच परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
महामार्ग एन.एज. २११ बऱ्यापैकी रुंदीकरण,चौपदरीकरण अन् नव्याने काम झाले असल्यामुळे "औरंगाबाद ते पाटणादेवी" हा जवळ जवळ १०० की.मी अंतराचा प्रवास सव्वा दोन तासात पूर्ण होतो.महामार्गावर तालुक्याच्या शहरांना लागून बायपास झालेला असल्याने वर्दळीचा प्रवास टाळत आपण सलग प्रवास करू शकतो.
बऱ्यापैकी झालेला पाऊस त्यामुळे "कन्नड व चाळीसगांव" "मराठवाडा अन् खानदेश" विभागाला जोडणारा "औट्रम घाट" हा पूर्णपणे हिरवाईने नटलेला आहे.उंच उंच डोंगरांतून पडत्या पाण्याचे झरे बहुतांश ठिकाणी चालू झाले आहे,एका साईडने उंचउंच डोंगरातून कोरलेला हा महामार्ग तर एक साईडने धडकी भरवणारी खोली.चाळीसगांव शहर जे पूर्णपणे धुक्यांमध्ये गुडूप झालेलं आपल्याला घाटातील सर्वात वरील वळणाच्या माध्यमातून दिसत असते अन् आपण हे मनोहारी दृश्य,डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य डोळ्यात साठवत जिथवर डोळ्यात साठवता येईल तिथवर हा खानदेश समूह डोळ्यांत साठवून घेतो..!
अखेरीस दीड तासांच्या प्रवासानंतर आपण घाट उतरलो की पाटणादेवी या पर्यटनस्थळ आणि अनेक भाविकांच्या श्रद्धास्थानी पोहचतो.
तर चला जाणून घेऊ पाटणादेवी या स्थानाबद्दल..!
१)पाटणादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे.चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते.निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात.
मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिक रोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर चाळीसगाव हे रेल्वे स्टेशन येते. चाळीसगाव एस्टी स्टॅन्डवरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीच्या बसेस सुटतात. चाळीसगाव-पाटणादेवी हे अंतर १८ किलोमीटर आहे. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे.
काय आहे नेमकी आख्यायिका..?
शके ११५० (इ.स. १२२८) मध्ये आषाढी अमावास्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादवराव खेऊणचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे येथे राज्य होते.
माता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारदमुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरिरातील प्राण काढून घेते त्यामुळे तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात आणि तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात.
उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करून चंडिकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरून खाली यावे अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडात स्नान कर तेव्हा माझी स्वयंभु मुर्ती तुझ्या हातात येईल असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे.असे वाचनात येते.
कशी आहे मंदिराची रचना
आदिशक्तिचे मंदिर १२ व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. १० ते १२ फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वाभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याल २८ कोपरे आहेत. ७५ बाय ३६ फूट मंदिराची लांबी-रुंदी तर १८ फूट उंची आहे.गाभा-यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे.पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे.
देवळासमोर दोन भल्यामोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिरपरिसरात असलेल्या अनेक प्राचीन शिल्पाकृती पहाण्यासारख्या आहेत.शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातत्त्वखात्याला मिळाला आहे.वनखात्याने त्यांच्या स्मरणार्थ मंदिराजवळच भास्कराचार्य निसर्ग केंद्र उभारले आहे.
पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड,पितळखोरे लेणी,हेमाडपंती महादेव मंदिर,सीता न्हाणी नामक लेणे,शृंगारचौरी लेणी,धवलतीर्थ धबधबा,जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे..!
२)पाटणादेवी येथे जवळच त्याच मार्गाला असलेले "प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिर" बघण्यात आले तर जाणून घेऊया त्याबद्दल..!
प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिराबद्दल जाणून घेण्यासाठी "संजीव बावसकर नगरदेवळा" यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाचा उपयोग झाला तो लेख इथे देत आहे.
पाटणादेवी मुख्य मंदिरापासून तीन किमी अंतरावर पूर्वाभिमुख असलेले प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिर आपल्याला ऐतिहासिक काळात घेऊन जाते.या मंदिराची भव्यता नजरेत भरण्यासारखी आहे.मंदिर परिसरात अनेकठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात.त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्त्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो..!
यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते या मंदिराचे निर्माण कार्य एक भव्य १० फूट उंचीच्या ओट्यावर झाले आहे.त्याची लांबीच १०० फुटांपर्यंत आहे.नंदीगृह,सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे.नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात.छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहे.
मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे.साधारणपणे २४ खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसते प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे.खांबांवरील तुळया त्यांचे जोतरे त्यावर रचलेले आयताकृती दगड,सगळं कसं अगदी जुळवून आणलंय.प्रत्येक चौकीतील छताच्या रचनेत वैविध्य जाणवते.कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून २५ फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानामुळे मन थक्कच होते .
गर्भगृहाच्या बाहेर जमिनीवर कोरलेली शंख व चक्र ही विष्णू आयुधे बघतांना मनात कोडे निर्माण होते.प्रवेशद्वाराच्या पायथ्याला मेंढ्यांची शिंगे व सिंहाचा जबडा असलेला बटबटीत डोळ्यांचा किर्तीमुख लक्ष वेधून घेतो.त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शिल्पे पुसट असल्याने नीट आकलन होत नाही.प्रवेशद्वारावर श्रीगणेश विराजमान असून सप्तमातृका कोरलेल्या आहेत.तसेच गणसेना दिसते चौकटीवर यक्ष गंधर्व किन्नर गायन वादन व नृत्य करतांना दिसतात .
गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो . त्यावरील अक्षरांची ठेवण व एकसंधता पाहून कलाकारांना प्रणाम करावासा वाटतो.आज या शिलालेखाला कुठलेही संरक्षण कवच नाही.त्यामुळे पर्यटकांच्या भक्ष्यस्थानी तो पडेल की काय अशी भिती वाटते. (कुतूहल म्हणून प्रत्येकजण त्याला हात लावतोच) म्हणून काचेच्या शोकेसमध्ये त्याला बंदिस्त केल्यास एक समृद्ध वारसा सुरक्षित राहील.काही ठिकाणी त्याचे पापुद्रे पण निघत आहेत..!
गर्भगृहाचा आकार चंद्राकृती असून मध्यभागी असलेली शिवपिंडी मन प्रसन्न करते आत बराच अंधार असल्याने सुरुवातीला काहीच दिसत नाही.पण नंतर मात्र हळूहळू दिसायला लागते याला आतून २८ कोपरे आहेत.प्रदक्षिणा करतांना मंदिराची भव्य दिव्यता नजरेत भरते.मंदिराची भौमितिक संरचना वाखाणण्याजोगी आहे.
बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना सरळ रेषेत न उभारता त्रैमितीक रचना पद्धतीचा वापर केला आहे.प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे (समजा कालांतराने एखादा खांब ढासळला तर तितकीच जागा रिक्त होईल .पण मूळ वास्तूला कुठलीही हानी पोहचणार नाही याची काळजी वास्तू उभारतांना घेतली आहे.) स्तंभावरील कोरीवकाम अप्रतिम असून उठावदार शैलीतील मूर्तिकाम नजर खिळवून ठेवते .
उठावदार शैली शिल्पांवर शेकडो वर्षाचा ऊन वारा पाऊस यामुळे परिणाम झालेला दिसतो.अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत.काहीचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही.तर काही शिल्पे मानवी हस्तक्षेपामुळे विद्रुप झालेली दिसतात.काही हौशी गवशी मंडळी शिखराच्या अर्ध्यावर चढून आईलपेंटने स्वतःची इंग्रजी आद्याक्षरे लिहून पापाचे भागीदार झालेले दिसतात.यांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे .
मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तारेच्या जाळीचे कुंपण घालून अशा नतद्रष्ट लोकांपासून काही शतके मंदिर वाचवता येईल जेणेकरून भावी पिढीसाठी हा वारसा जीवंत राहील.( ही वास्तू पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी काहीतरी पावले उचलावी ही रास्त अपेक्षा आहे.)मंदिरावरील शिल्प कला ही मंत्रमुग्ध करणारी आहे.
संपूर्ण मंदिराला एका मेखलेने बद्ध केले आहे या मेखलेवरील शिल्पे डोळ्यांचे पारणे फेडतात.नंदिवर आसनस्थ शिव,तांडव मुद्रेतील शिव,धनुष्यबाण धारण केलेला पिनाकपाणी शिव,पद्मासनस्थ शिव,अशी कितीतरी शिवशिल्प मन मोहून टाकतात.नृत्य गणेश,विणावादक गणेश,वरददायक गणेश अशी वेगवेगळ्या स्वरूपात गणेश शिल्प आढळतात.आश्चर्य म्हणजे हनुमानाचे शिल्प देखील या मेखलेवर विराजमान आहे.
सर्वात आश्चर्य म्हणजे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते .ही प्रतिमा बाहुबली गोमटेश्वराचीच का ? या विषयी निश्चित माहिती नसले तरी तेथील मूर्तीशी तिचे कमालीचे साधर्म्य आहे.यावरून एक निष्कर्ष काढता येतो की या कारागिरांना गोमटेश्वराची माहिती असावी किंवा त्या निर्माणकार्यात यांचाही सहभाग असावा.त्या काळातील दळणवळण इतके प्रगत नसतांना असे साम्य पाहून मन थक्क होते.मंदिर शिखराच्या वरच्या बाजूला दगडात कोरलेल्या पताका शिखर सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर आहे .
त्यांच्यातील जिवंतपणा बघण्यासारखा आहे.मेखला पट्टीच्या खाली बाहेर धावणारी हत्तीशिल्पे व वृषभशिल्पे दिसून येतात.जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे.मंदिराच्या वरच्या बाजूला गावक्षांचे कोरीवकाम अद्भुत आहे.या गवाक्षांना दोन नक्षीकाम केलेल्या स्तंभानी आधार दिला आहे तर खालच्या बाजूने अर्ध गोलाकार दगडी स्तंभांवर पेललेला भार नजर हटू देत नाही.
एका गावक्षात कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती विस्मित करते.तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे.पायाखाली एका दैत्याला दाबले आहे.ते मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे.हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते. शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे.
उठाव शैलीतील हे शिल्प आज बरेच झिजलेले दिसते पण तरीही त्याचे सौंदर्य कमी होत नाही.मंदिराच्या प्रत्येक कोनाड्यात यक्ष गंधर्व व नृत्यांगना यांच्या असंख्य प्रतिमाचा चपखल मेळ बसवलेला आहे.मंदिर निर्माण शास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या कलाकारांच्या हातून या वास्तूचे निर्माण झाले आहे .यात तिळमात्र शंका नाही.मंदिराच्या उजव्या बाजूला दोन सात फूट उंचीचे स्तंभ उभे आहेत.त्यावर शंख चक्र गदाधारी विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.बाजूला जय विजय उभे आहेत.हे बघतांना वेरूळ लेण्यांची आठवण येते.या मंदिर निर्माण काळात शैव व वैष्णव यांच्यात बरीच एकरूपता झाल्याचे दिसते.
माहिती संकलन-
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा