सांजवेळ दाटलेली,
पैल पोहचला थवा..!
जीर्ण आभाळास आता सुर्य का हवा नवा,
मंत्र झालेल्या मैफिलीला चंद्र का हवा नवा...!
कधीतरी काही दृश्य मनात पक्के खिळवून बसतात अन् कधीतरी नकळत अश्या काही ओळी कानावर पडल्या की,ते दृष्य डोळ्यासमोर येत जाते...मग तो क्षण विचारांमध्ये अनुभवण्यासाठी मनातच विचारांचे काहूर निर्माण होते...
पुढे कितीवेळ मन त्या ओळींचा अर्थ शोधत गुंतवून घेतं स्वत:ला त्या दृश्यात...
भर उन्हात कधीतरी अनुभवलेला तो क्षण असतो,अाठवून जातो अन् तेव्हाच या ओळींशी त्याचे साधर्म्य जुळवून येते....
भर दुपारी रस्त्याच्या कडेला कोरलेल्या डोंगरात कधीतरी दिसून जातो तो माणूस,काय करत असतो माहीत नाही....
विस्कटलेले केस,बहुतेक पांढरा सदरा घातलेला असतो त्याने,घामाच्या ओघळामुळे एक विचित्र आकृती त्याच्या पूर्ण अंगावर निर्माण झालेली असते,अनवाणी असतो भटकत डोंगरांनी खांद्यावर एक पिशवी घेऊन.काय असते माहीत नाही त्यात,पण तिला तो खूप जपवत असतो अगदी जिवापाड...
या पिशवीत बघून त्याच्या निरागस चेहऱ्यावर येणारं ते क्षणिक हास्य त्याला व मलाही सुख देऊन जाते....त्याच्या या मला सुखात भागीदार व्हायचे नाही,पण त्याचा हा आनंद मलाच अनेक प्रश्न,सुख देऊन जातो.
काय असल त्याच्या अश्या या जगण्याचे गमक ?
म्हणायला ही आमची भेट पण आहे की माहीत नाही,पण हे काही क्षण आयुष्यभर तो जगण्याशी संघर्ष करतोय याची जाणीव करून देत राहतात....
तो हरवूनही जातो जंगलात,मी मात्र त्या हरवलेल्या आकृतीकडे तिला कल्पनेत नजरेत साठवत.बघत बसतो पाठमोरा तो जंगलात हरवलेला,सोबतीला अनेक प्रश्न घेऊन...
वेळ कुणालाही नाहीये रस्त्याच्या या वाटसरूंबद्दल विचार करायला,पण त्यांची वेळ मात्र आपल्याला बघत,आपल्या सारख्या कित्येकांना बघत विचार करत जात असेल नाही का ?
शेवट मीच का हा विचार करावा,यालाही उत्तर नाही.कधीतरी मी पण हळवा होऊन जातो विचाराने म्हणून असेल कदाचित,पण हे हळवेपण अश्या गोष्टी देऊन जाते ज्यांना उत्तरे नसतात आणी काय साध्य करायचे असते हे पण समजत नाही...
काही क्षण आयुष्यातून निसटून जातात नकळत जे नंतर त्रास देतात वेळीच त्याची उत्तरे न शोधल्यामुळे,अलीकडे यांची यादी खूप वाढलेली आहे...
पुढे कधीतरी रस्त्यावर भर घाटात असलेल्या मंदिरा जवळ,पुढील प्रवास सुखाचा होवो म्हणून आशेमारी गाडीमधून प्रवाशांनी फेकलेल्या दहा रुपयांच्या नोटा अन् विविध नाण्यांना जमा करताना तो दिसून जातो...
इथे त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न असतात,कदाचित त्याने सुखाची व्याख्या केली आहे.त्याला या पैशात फक्त व्यवहार दिसतो,सुख नाही पण कोणीतरी फेकलेल्या त्या पैश्यांवर त्याचं आज पोट भरणार आहे हे खूप बरं असतं...
म्हणजे त्याचंही पोट भरेल आणी गाडीवाल्याला सुद्धा त्याचा आशिर्वाद भेटल,मंदिर मात्र एक दुवा असेल दोघांमध्ये पोट भरण्याचा आणी श्रध्देचा....तेव्हा नियतीचं जुळून आलेल हे कोडं मला उमगलेलं असेल,आणी माझी काही प्रश्न सुटत जातील,हे असेच चालत राहावं बस....
अलीकडे काळ खूप वाईट आहे,जगण्यासाठी व्यवहारी व्हावं लागतं,मग अनेक प्रश्न सुटतात जगण्यासाठीचे.काही सोडून दिली तरी चालतात काळाच्या पल्याड होण्याआधी अपेक्षित उत्तरे त्यांना पण भेटून जातात,फक्त शोधत राहावे लागेल माणुसकीत आणी माणसात ती पडणारी प्रश्न....
#जगणं_हरवलेली_माणसं...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा