अलीकडे सांजवेळी जेव्हा सुर्य अस्ताला जात असतो...अन मी वेशीच्या पल्याड असलेल्या पिंपळाच्या झाडाला चहुबाजुंनी बांधलेल्या ओट्यावर बसलेलो,चहुकडं असलेली ती सर्व मोकळीक.
दुपारची झोप अजुन डोळ्यात तरळत आहे,हातपाय धूवुन पारावर बसायला आलोय. डोळ्यांच्या पापण्यांची अन बुबुळांची झुकण्यासाठीची तडजोड जाणवत आहे...
जसंजसं समोर सर्व दृश्य दिसतंय मन अस्वस्थ होत
आहे,या अस्वस्थ होण्याला कारण माहीत नाही. कदाचित शांत असणारा परिसर,गरम झळ्यांतुन अलवार संथ वाहणाऱ्या वाऱ्याकडे होणारा वाऱ्याचाच प्रवास...
पिंपळाची पानं स्वच्छ,हिरवीगार दिसताय. लाॅकडाऊनमुळे न झालेलं प्रदुषण आणी टवटवीत झालेली झाडं,वेली,पानं,फुल सुंदरच मांणसाच काय होईल माहिती नाही,पण निसर्गाला लाॅकडाऊन मानवला आहे. सर्व सुंदर वाटत आहे,स्वच्छ निर्मळ वाहणारे वारे झोके घेताय अन् मनाशीच आठवणींचे गुज गात आहे. पण...पण कितीही टाळले तरी डोळ्यांना दिसणारी अस्वस्थता टाळता येणारी नाहीये...
मंदिराचे दरवाजे गेले दोन महीने बंदच आहे,कदाचित ती आता पुन्हा पाण्याचे संकट उभे राहिले की,मंदिरातील देव पाण्यात बुडविण्यासाठीच काही काळ उघडी केली जातील असे वाटत आहे...मंदिराच्या लाकडी दरवाज्याला धुळीचा थर जमा झाला आहे,देवाला लाॅकडाऊन असल्यासारखे त्याच्याकडे कुणी फिरकत नाही. सांजवेळी लागणारा दिवा गेली दोन महिने लागतच नाहीये,अश्यावेळी दिव्यातून अधुरी राहिलेली वात घेऊन जाणारा उंदीरही हल्ली दिव्यापाशी दिसत नाही. नारळ फोडायचा दगड भुरका पडला आहे,वळवाच्या पावसाने त्या दगडावर पावसाचे पडलेले ओघळ संकेत देऊन जातात की,अजून संकट टळले नाहीये...
मंदिर बंद आहे,शाळा बंद आहे,शेजारीच असलेली अंगणवाडी कधीतरी उघडी दिसते. शेवटचा अंगणवाडीतील भात कधी शिजला माहीत नाही... अन् लहानग्या पोराला रिकाम्या पोटासाठी सरकारचा तांदूळ,सुगडी,वाटाणा,कधी वाटप झाला हे ही आठवत नाहीये...
एक मात्र हालचाल होत असते नदीच्या थडीला,पाणी आटले आहे. रोज वाळूचे ट्रॅक्टर भरून चालले आहे,शिस्तीत काम चालतं इथे काही भांडण नाही की काही नाही.याने सुद्धा एक फायदा झाला आहे की,पावसाळ्यात स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता चांगला पक्का झाला आहे वाळूंचे ट्रॅक्टरं वाहून वाहून...
स्मशानभूमी... तिचे काय चालणार आहे ती घरातल्या चुली सारखी चालूच आहे,जशी चुलीतली आग विझत नाही तशीच स्मशान भूमीतली आग विझत नाही...एक मात्र झालं आहे मेल्या माणसां बरोबर फक्त स्मशानभूमी बघायला येणाऱ्या बघ्यांची गर्दी हल्ली होत नाही.
नदीतले पाणी मयत माणसाला पाजायला भेटत नाही,नदी दुरपर्यंत आटली आहे.म्हणून घरूनच एक पाण्याचा जार हो जार,क्यान नाही ती कधीच काळाच्या आड गेली तो घरूनच भरून आणावा लागतो...
सर्व अस्वस्थ आहे,कधी ही वेळ निघून जाईल सांगता येत नाही. रस्त्यांनी अनवाणी चालणारे भुकेले चेहरे दिसतात तेव्हा काहीच करता येत नाही,हतबल आहोत आम्ही बस बाकी काहीच नाही....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा