हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...
सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले...
रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया...
मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला...
मग काय छोटे सरकार आज वावराकडं आला हुतं का काय.?
नाही ओ अण्णा घरला करमत नाय मग आलो हुतो चारला सांच्या वख्ताला,म्हंटल जरा चारा पाणी करू अन् जाऊ घरी तितकंच घरात कोंडल्यावानी हुनार नाय....
तुमचं काय चाललंय आण्णा..? बकऱ्या आणल्या का नाय नव्या यंदाच्या वर्षाला..?
कसल्या बकऱ्या अन् कसल्या काय छोटे सरकार,यांनाच चारा पाणी करायला जीव जातूया अन् आजूबाजूला चारा बी नाय रायला.दूरदूर हिंडा लागायलं डोंगरात या माझ्या शान्या लेकरांना घेऊन,लेक जाती शाळेला अन् आता काय कुठला रोग आलाया मग ती पण घरला आहे.सरकार म्हणतोय घराला रहा,आता या बकर्यांना घेऊन कसा घरला राहू लेका तूच सांग...
इतक्यात राणुबाई चहा घेऊन येते...
चहा घ्या सरकार ती बोलती झाली...
अरे रानुबाई तुम्ही किती मोठ्या झाला,मागे एकदा आलो होतो तेव्हा ते लंगडी पाणी खेळत होता अंगणात अन् आता चहा करून दिला,काकू कुठं गेली हायसा राणुबाई...?
ती गेलीया सरपन आणाया शेजारच्या डोंगराला...
बरं आण्णा येऊ का,म्हणत मी त्यांना निरोप देऊन तिथून निघालो...
पाटाच्या रस्त्याने एक बाजूनं पाटामधून वाहणारं पाणी अन् एक बाजूनं येणारी,जाणारी शेतातील लोकं दिसत होती. मी चालत चालत पुढे एका पुलावर येऊन बसलो...अन् पुलाखाली असलेल्या त्या पाणकोंबड्या बघत बसलो पाण्यात,अधून मधून टीटवी टिव-टिव करत डोक्यावरून घिरट्या घालत होती. मी त्या पाण्यात बघत होतो,दूरवर पांढरे दोन-तीन बगळे पाण्यात चोच घालून,वर काढून काहीतरी शिकार घेऊन पळून जात होते...
सर्व जिथल्या तिथं चालू होते,खेडी दुपारी ओस पडलेल्या स्मशानागत भासायची,सांज ढळता-ढळता त्यांच्यात अनोखं चैतन्य निर्माण होत असे. अलीकडे या गावाबद्दल कधी विचारच केला नव्हता म्हणून काही उमगत नव्हतं,सतत जगण्याशी चाललेली स्पर्धा आणि पैसा यात स्वताला झोकन दिले होते आपण सर्वांनी....
गेला काही काळ आपल्याला पूर्वपदावर घेऊन आला आहे,त्याने पुन्हा एकदा निसर्ग शहाणा आहे दाखवून दिले होते,मी या विचारात असतांना शंकर दादाची बॉक्सर गाडी आली अन् मी तिच्यावर बसून घराकडे आलो...
रामाबाबा नेटकाच घरी पोहचला होता बैलांना गोठ्यात बांधून,वासराला दूध प्यायला सोडवुन तो गोठ्यात आवरून घेत होता. मी पारावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात बसून हे सर्व बघत बसलेलो,इथेही जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता...
दोन चार म्हातारे आजोबा आज शनिवार म्हणून अगरबत्ती घेऊन मारुतीरायाचे पाया पडायला आले होते,त्यांचे बघून मी पण प्रार्थना केली अन् पुन्हा तिथं बसून राहिलो. एरवी म्हातारे बाबा गप्पा मारायला माझ्या जवळ येऊन बसले अन् त्यांचा विषय चालू झाला यावर्षी माऊलीचे दर्शन भेटतं की नाही याचा...
मी अवाक झालो ....
या माउलींना मी काय सांगणार होतो,माझे आधुनिक विचार यांना रुचणारे नव्हते मी ऐकत बसलो.त्यांच्या बोलण्यात इतकं सुद्धा चुकीचं नव्हतं आईबापा सारखी असलेली विठ्ठल रखुमाई त्यांना,त्यांची असलेली त्यांच्यावरची श्रद्धा यातच सर्व होते. इतक्या वर्षापासून चालत आलेली परंपरा त्यांना मोडीत काढण्याचा त्यांचा विचार नव्हता,पण इथेही कुठेतरी कोरोना जिंकला होता,याची जाणीव पुढे त्यांचा बोलण्यातून झाली...
एरवी मंदिरात हरिपाठ कीर्तन होत नाही अन् देऊळ पण बंदच आहे. पण आतल्या देवाला बाहेरचं सर्व कळतं आहे,या भाबड्या विचाराने आम्ही त्याला प्रार्थना करीत होतो सर्व ठीक व्हावं इतकंच....
हरवलेलं गावपण अन् आठवणीतल जिवंत राहणार शहर आता स्वस्थ बसू देत नाही,लवकर सर्व ठीक होवो बस....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा