मुख्य सामग्रीवर वगळा

नाटकाला जगवणारं नाटक सखाराम बाईंडर...


#सखाराम_बाईंडर...


सध्याच्या या लाॅकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट,नाटक बघत घेत आहे,ज्यांना इतरवेळी वेळे अभावी बघायला जमत नाही...

नाटकं मला फार आवडत नाही,म्हणजे "लक्ष्मण देशपांडे" यांचे "वऱ्हाड चालले लंडनला" नाटका नंतर मी आजवर पूर्ण नाटक कुठलेच बघितले नाही...हे नाटक मात्र याला अपवाद ठरले "सखाराम बाईंडर" जे सुर्वाती पासूनच माणसाला बसलेल्या ठिकाणाशी खिळवून ठेवते...

सखारामचा तो त्याच्या घरातील रुबाब,कणखर विचारांची चंपा आणि हळवी लक्ष्मी हे पात्र मनाला भिडतात.

नक्कीच बघा...


सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे.१९७२ मध्ये रंगभूमीवर सादर झालेलं हे नाटक.राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक पातळीवर प्रचंड विरोध,मोठमोठे वाद,बंदी आणि असं सगळं वादळ अनुभवलेल्या या नाटकाला आणि त्याच्याशी संबंधित लोकांना याच त्याच्या चाहत्या वर्गाकडून भरभरून प्रेमही मिळाले...
हे प्रेम सखाराम बाइंडरचं होतं का? की मुक्तावरचं होतं? की नाटककार विजय तेंडुलकरांवरचं होतं? ते या सगळ्यांसकट मराठी नाटकावरचं होतं.आणि अगदी खरं सांगायचं तर ‘सखाराम’च्या वाटय़ाला ते अंमळ जास्तच आलं.मध्ये इतका काळ गेल्यानंतरही ते ओसरलं नाही हे विशेष.

वर्ष १९७२ तेंडुलकरांनी आपलं ‘सखाराम बाइंडर’ हे नवं कोरं नाटक कमलाकर सारंग या नवीन तुलनेत अनुभवी दिग्दर्शकाला दिलं.वाचणाऱ्या प्रत्येकाला ते आवडत होतं.काहीतरी वेगळं आहे,हे जाणवत होतं,कारण या आधी इतकं टोकाचं कुणी लिहल नव्हतं...

सखारामच्या भूमिकेसाठी निळू फुले,लक्ष्मीच्या भूमिकेत कुमुद आणि चंपा लालन सारंग असे  कलाकार ठरले.तालमी होऊन पहिला प्रयोग झाला.रंगमंचावर चंपा साडी बदलते असं दृश्य अत्यंत सूचकपणे दाखवलं गेलं होतं.तरीही ते दृश्य,सखारामच्या,चंपाच्या तोंडची भाषा,शिव्या हे सगळं बघून प्रेक्षक अवाक् झाले.रंगभूमीवर यापूर्वी त्यांनी असं काही पाहिलेलंच नव्हतं.मध्यमवर्गीय बाजाची,कौटुंबिक मनोरंजन करणारी नाटकंच त्यांना परिचित होती.पण ‘सखाराम’ने हि सर्व बंधने झुगारून टाकत,मोडीत काढली होती...

नवं काही स्वीकारण्याची,प्रयोग समजून घेण्याची क्षमता असलेल्या प्रेक्षकांना नाटक जबरदस्त आवडलं.पण तरीही ज्यांना हे सगळं पचलं,रुचलं नव्हतं,त्यांनी हळूहळू नाटकाविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली.नाटक न बघताच ते अश्लील आहे,बीभत्स आहे,रंगभूमीच्या पावित्र्याचा भंग करणारं आहे असे गैरसमज करून हाकाटी सुरू केली.

नाटक बंद पाडण्यासाठी गुंडगिरी,राजकीय दबाव,प्रशासकीय दबाव,साहित्य-नाटय़ संमेलनाच्या पातळीवरून दबाव असे सगळे मार्ग हाताळले गेले.दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी नाटकावरील बंदीच्या विरोधात कोर्टात जाऊन केस लढवली,जिंकली,पण तरीही विरोध शमत नव्हता.आयत्या वेळी परवानगी नाकारली म्हणून प्रयोग रद्द होणं,आयोजकांनी पैसे बुडवणं,रंगमंचावर येऊन राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी या सगळ्यातून सहिसलामत ‘सखाराम बाईंडर’ बाहेर आलं आणि एक महत्त्वाचं वेगळं नाटक म्हणून देशभर गाजलं.

‘सखाराम’ची नाटक म्हणून,आशय म्हणून जी वैशिष्टय़ं आहेत,त्यावर आजपर्यंत अनेकदा भरपूर चर्चा झाली आहे.‘सखाराम’चं नाटक म्हणूनच त्याकडे बघितलं गेलं आहे. पण खरं तर हे नाटक आहे लक्ष्मीचं आणि चंपाचं नाटक.पुरुषप्रधान व्यवस्थेचा चेहरा दाखवत तेंडुलकरांनी हे स्त्रीवादी मांडणी करणारं नाटक लिहिलं आहे...

‘हा सखारामचा महाल आहे’ असं म्हणत सखाराम त्या घरातलं स्वत:चं प्रभुत्व सुरुवातीलाच ठसवत असला तरी एकीकडे चंपाच्या रूपानं तो पुरता पाघळला आहे. आणि त्याला ती जुमानत नसली तरी तो तिच्यापुढे शारीर पातळीवर हतबल आहे,आणि दुसरीकडे मुंगळ्या-कावळ्यांशी बोलणाऱ्या, त्यांच्याशी एकरूप होणाऱ्या,सखारामच्या मांडीवर मरण येऊ दे,असली भाषा बोलणाऱ्या लक्ष्मीपुढे तो मानसिक पातळीवर दुबळा आहे.शारीरिक आणि मानसिक पातळीवर या दोन्ही बायका त्याच्यावर अधिराज्य गाजवतात.तो रागाच्या भरात चंपाचा खून करतो आणि आपण हे काय करून बसलो म्हणून हतबल होतो तेव्हा एरवी साधी मवाळ वाटणारी, सतत पापपुण्य असली भाषा बोलणारी लक्ष्मीच त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेते आणि आपल्या हातून खून झालाय या जाणिवेने गर्भगळीत झालेल्या,सखारामच्या आयुष्याच्या नाडय़ा आता दुबळ्या मानल्या गेलेल्या,पण प्रत्यक्षात परिस्थिती आल्यावर निडर बनून तिला तोंड देणाऱ्या,परिस्थिती ताब्यात घेणाऱ्या लक्ष्मीच्या हातात आहेत,असं सूचित करत हे नाटक संपतं.

"सखाराम बाईंडर"मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता.पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता.‘सखाराम’मधल्या या स्रीप्रधान,स्त्रीवादी पैलूंवर मात्र आजतागायत फारशी चर्चा झालेली नाही किंवा ती कुणी केलीच नाही...
परंतु अलीकडे कुठेतरी यात वेळेनुसार बदल होत गेला,आणि नव्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ त्यांच्यात निर्माण झाली ...

Written by,

Bharat Sonwane..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...