खिडकीतून वळवाच्या पावसाच्या सरी पडतांना दिसायच्या,अलीकडे त्यांना खिडकीतून टिपणे हे एकच काम मी करत असायचो... घराच्या बाजूला चहूकडे लाल मातीची जमीन जिथवर नजर जाईल तिथवर दिसायची,मध्येच कुठेतरी काळ्या खडकांचा समुह समुद्रात असणाय्रा एकाकी बेटांप्रमाणे भासायचा...
पडता पाऊस या लाल मातीत शिंतोड्याच्या रुपात जाऊन उताराच्या दिशेनं वाहू लागायचा,वाहणारे सर्व पाणी परिसरात असलेल्या छोट्याश्या धरणरुपी तलावात जाऊन स्थिर होत असायचे. वळवाचाच पाऊस तो फार फार पंधरा वीस मिनिटे चालायचा अन् मग उघडुन जायचा मग उगवुन येणारं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सर्व डोळ्यांचे पारणं फेडणारं असायचं...
त्याला बघण्यासाठी आणि पावसाने ओल्या झालेल्या जमिनीतून येणाऱ्या सुगंधाला,खळखळ वाहणार्या पाण्याला अनुभवण्यासाठी आम्ही सर्व कॉलनीतील दहा-बारा मुलं
घरा बाहेर निघायचो...
घरातून हाफ चड्डी,फुल बाह्यांचा ड्रेस सावरत निघालो की,छोट्या छोट्या तयार झालेल्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहणारे पाणी लाल चिखल,दगड,गोटे यांनी आडवत बसायचो...हे सर्व करतांना अनवाणी पायाला लागणारा मऊ चिखल खूप आनंद देऊन जायचा,भटकत भटकत धरणाच्या पाळेवरून जातांनी सभोवतालच्या परिसरातून येणारं वाहतं पाणी खूप सुंदर लालसर,पिवळट दिसायचं. जेव्हा ते या कोरड्या धरणात यायचं तेव्हा ते अनुभवायला वाट्याला येणारे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील असे असायचे...
फार-फार तर दोन तासांच्या वाहत्या पाण्यात हे छोटंसं धरण भरून जायचं,यात वळवाच्या पावसात दिसणारी पिवळी बेडुक दिसायची जी ओरडत असायची. ती वर्षभरात फक्त या पंधरा दिवसातच दिसतात असे तरी मला वाटते,कारण एरवी ती दिसत नाही...मग मित्रांमध्ये उगाच लावलेले विचारांचे तर्क ती आकाशातून पावसासोबत फक्त मोकळ्या ठिकाणी जिथून पाणी वाहून धरणात जाईल तिथे पडतात असे तर्क असत...
धरण पाळेवरून खाली उतरले की,नाल्यामध्ये वाहणारे पांढरे,लालसर फेस्कुट आलेले पाणी खूप वेळ स्थिर नजरेनं बघत जमिनीतून येणारा सुगंध अनुभवत बसायचो,तिथेच त्या थंड खडकावर मांडी घालून...
कंटाळा आला की,काही अंतरावर असलेली काळया खडकांची टेकडी बघायला निघायचं. जिथे रंगीबेरंगी छोटे छोटे दगड,घारे दगड शोधायला मजा येत असे तिकडे मोर्चा वळवला की,लागणारे काठोडी लोकांची ती झोपडीवजा घरे त्या गाय,बैल,म्हशी,त्यांचे पिल्ल दिसायची...समोर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचं विस्तीर्ण मैदान परक्या ग्रहावर गेल्यासारखे भास करून द्यायचे.लाल मातीतून पायांनी पाणी उडवत दूरवर दिसणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या त्या पिवळ्या वॉल कंपाऊंडकडे मग वाटचाल होत असत...
त्या वॉल कंपाऊंड जवळ आले की त्यांना गाल लावून त्या भिंतीचा थंडावा अनुभवत,आतून येणाऱ्या गुलमोहराच्या फुलांचा दरवळ अनुभवत पुढे चालत राहायचं...पुढे नवोदय विद्यालयाच्या गेटवर आले की,त्या होलीबॉल खेळणाऱ्या मुला-मुलींना हाय करून पुढे निघून जायचे. मागे मात्र त्यांचे रडावलेले चेहरे बघून इतक्या आनंदात सुद्धा दुःख वाटायचे अन् मोकळीक काय असते,हे तेव्हा त्या वयात समजायचे...
पुढे चालत चालत टेकडीच्या पोटाशी असणाऱ्या खदानित डोकुन खडका आड आलेल्या काळ्या पाण्याला बघत ओरडत बसायचं. दिसणारे ठेकडीचे टोक खुणवायचं,रंगेबेरंगी दगड शोधत काळ्या खडकावर शांत बसुन पुर्ण पावसाने न्हाऊन निघालेले शहर अनुभवत बसायचं... संथपणे अंगाला झोंबत असलेला वारा अन् टेकडीवर आई वडीलांसोबत फिरायला येणारे आमच्यासारखी खूप सारी मुलं आमच्याकडे कुतूहलाने बघायची...
पुढे खूप कंटाळा आला की,टेकडीवरून पळत खाली यायचे.पुन्हा त्या नवोदयमधील मुलांना भेटायचे,त्यांना भेट म्हणून दोन-तीन घारे,पांढरे दगडं द्यायचे अन् पुन्हा बाय करून घराकडे निघायचे. दुसऱ्या रस्त्याने घराकडे यायचे हायवेवरून रस्त्यातवर असलेल्या फिल्टरवर हातपाय धुवून थोडेसे बसायचे... निलगिरीच्या झाडांचा येणारा तो सुगंध जो नेहमीच आवडता आहे तो अनुभवायला भेटत असायचा अन् घाटातून येणाऱ्या ट्रक,कंटेनर यांची वरची ताडपत्री बघत राहायचं जी एरवी वाळलेली असायची...
सुर्य अस्ताला आला की सगळे घरी जायचे,मग घरी असलेला आवडता गरम खिचडीचा बेत खरंच सुख की काय होतं हे सर्व...
#आठवणीतले_बालपणाचे_दिवस...
Written by,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा