आजच्या लेखमधून मी आपल्याला गौताळा अभयारण्य व जवळच असलेली पितळखोरा लेणी या दोन ठिकाणांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करेल...
#गौताळा_अभयारण्य...
औरंगाबादपासून 75 कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य.डोंगरदऱ्यांच्या कपारी खाणीतून वाट काढत,उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्या सारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो..आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आपण या ठिकाणी अनुभवाल,डोळ्यांचे पारणे फेडणारे असे विविधतेने नटलेले हे गौताळा अभयारण्य.गौताळा अभयारण्याची 1986 साली स्थापना झाली.कन्नड तालुक्यातील 17 गावातील वनक्षेत्राचा अभयारण्यात समावेश होतो.कन्नडपासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावरच अभयारण्य सुरु होते.तर चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर एक फाटा आहे.त्या फाट्यापासून सरळ गेल्यास गौताळा अभयारण्याचे प्रवेशव्दार लागते.तिथे एक चौकी आहे,चौकीत नोंद केल्यास आत प्रवेश मिळतो...
अभयारण्यात पायी अथवा वाहनानेही फिरता येते,वन विभागामार्फत काही ठिकाणी अतिशय चांगल्याप्रकारचे ट्रेकिंग ट्रॅकही पर्यटकांना उपलब्ध आहेत जे आकर्षित करतात.याउलट आपण कन्नड वरून कधी आला तर कसे यायचे हे सर्व मी आपल्याला कालच्या लेखमध्ये सविस्तर सांगितले आहेच...
गौताळा अभयारण्यास भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी हा 15 जून ते 15 ऑक्टोबर हा आहे या वेळी झालेला पाऊस अन् बहरलेले वृक्षवेली,प्राण्यांचे होणारे सहज दर्शन परदेशातून येणारे विविध स्थलांतरीत पक्षी यांचा येण्याचा हा काळ असल्यामुळे नक्कीच हा काळ महत्त्वाचा ठरतो सर्वोत्कष्ट काळ जर कोणता असेल तर श्रावण महीना या वेळेत अभयारण्य हे पूर्णपणे हिरवाईने नटलेले असते...
या वेळी अभयारण्य अनेक प्रकारची झाडे,वनौषधी जोमाने वाढीस लागलेली असतात त्यामुळे या काळात वनौषधी तज्ञ,विवध तज्ञ या काळात आले तर खूप माहिती आपल्याला भेटू शकते.चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला आहे,याचीच ओळख पुढे चंदन नाला म्हणून होते.या नाल्याच्या काठालाच पाणी प्यायला येणार्या अनेक प्राण्यांची पाणी ये-जा अनुभवता येते..
मोर, सुगरण,बिबट्या,लांडगा,कोल्हा,नीलगाय,सायाळ,वानर, घोरपड आणि साप या प्राण्यांसह 200 हून अधिक पक्षांच्या प्रजातींची नोंद या अभयारण्यात आहे. बुलबुल,कोतवाल,चंडोल, गरुड, भारद्वाज,पोपट,हरीयाळ आदी पक्षी येथेच दिसतात.नाल्यानंतर दाट जंगलाने हिरवाईचा अविष्कार आपणाला भूलवतो.पुढे मारोतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच दर्गाह,तलाव आहे. तलावाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर गवताळ आहे तलावात रान कमळ बघायला भेटतात. मारवेल, पवण्या, गोडाळ, चारवळ, कूसळी, बेटेगवत, कूंदा, शहाडा, शिंपी आदी गवतांच्या प्रजाती येथे दिसतात.पूर्वी या ठीकाणी गवळी लोक निवास करत असे. त्यांच्या गाई याच परिसरात चरत असत.त्यावरुनच या परिसराला गौताळा नाव पडले असावे.तेच पुढे अभयारण्यालाही असा एक समज जनमानसात आहे..
सीताखोरे,सीता नान्ही,गौतम ऋषी यांचे डोंगरातील मंदिर,केदार कुंड,धवलतीर्थ धबधबा हे येथे पाहण्याजोगे असेच आहे. उन्हाळ्यात अभयारण्यातील पक्षांना,प्राण्यांना पाण्याची चणचण भासते.परंतु तरीही निसर्गाच्या साहाय्याने तयार झालेल्या अर्थातच नैसर्गिक पाणवठ्याशिवाय वन्यजीव विभागातर्फे पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात येते.
#वन्यजीव_वन_विभागामार्फत_केले_गेलेले_वृक्षारोपण_आणि_कृत्रिम_पाणवठे...
नवीव 22 कृत्रिम पाणवठे वन्यजीव विभागामार्फत या ठीकाणी तयार करण्यात आले.वनपरिक्षेत्रात शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियांनातर्गत विविध कामे करण्यात अभयारण्यात करण्यात आली आहे. लिंबू, सीताफळ, करंजी, वड, मोहा,आवळा व लिंबाच्या झाडांची लागवड शासनाच्या वनविभागमार्फत 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेली आहे.विहंगम असं निसर्गसौंदर्य व पावसाळी पर्यटनाचा आनंद याठिकाणी पर्यटकांना घेता येतो. यासाठी वन्यजीव विभागीय वनाधिकारी विभागामार्फतही विविध सोयीसुविधा पर्यटकांसाठी करण्यात आलेल्या आहेत. या परिसरातच अभयारण्याबाबत माहिती व्हावी,या दृष्टीकोनातून पर्यटकांसाठी निसर्ग निर्वचन केंद्राची निर्मितीही वन्यजीव कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.
यामध्ये गौताळा अभयारण्यातील आंबा,आवळा, बाभूळ, बेल आदी वनसंपदा व वनौषधींबाबत माहिती या केंद्रात देण्यात आलेली आहे. मराठवाड्यात केवळ सुपुष्प वनस्पतीच्या सुमारे 1,650 प्रजाती असून त्यापैकी 500 हून अधिक प्रजातीचा औषधींसाठी उपयोग होतो.वन औषधीचा खजिना म्हणूनही गौताळा अभयारण्याकडे पाहिले जाते. अशा विविध प्रकारच्या वनौषधी या ठिकाणी आढळतात. त्यात चिंच, कडुनिंब, कवठ, पळस, पिंपळ आणि उंबर आदींचा समावेश आहे.
वन्यजीव विभागाने उत्तमप्रकारे व्यवस्थापन आणि संवर्धन करुन या जैवविविधतेची जपणूक केली आहे.त्यामुळे पर्यटक,पक्षी अभ्यासक, पर्यावरणप्रेमी यांनी या पावसाळ्यात गौताळ्यात निसर्गसहलीचा,भ्रमंतीचा आनंद घ्यायलाच हवा.
#पितळखोरा_लेणी...
औरंगाबाद ते कन्नड रोडच्या डावीकडील आकर्षक असा पितळखोरा लेणी समूह सह्याद्री पर्वत रांगेच्या सातमाळ पर्वतश्रेणीत वसलेल्या गौताळ्यात कोरलेले आहे.अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेला पितळखोरा लेणी समूह,भारतात आढळणाऱ्या १२०० लेण्यांपैकी जवळ-जवळ ८०० लेण्या एकट्या महाराष्ट्रात आढळतात.इथल्या सह्याद्रीने केवळ शुरवीरांचेच संगोपन केले,असे नाही तर अनेक जगप्रसिद्ध आणि सर्वांना आश्चर्य करायला भाग पाडणाऱ्या लेण्याही आपल्या अंगा-खांद्यावर गोंदून घेतल्या आहेत.
पितळखोरा ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहेत असे मानले जाते,लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन मानली जाते...
पितळखोरा लेणी ही औरंगाबादपासून ७८ कि.मी.अंतरावर आहे. औरंगाबाद येथून पितळखोरा लेणीस जाण्यासाठी औरंगाबाद-कन्नडमार्गे-कालीमठ फाटा जावे लागते...
एकूण १४ लेण्यांचा हा समूह प्राचीन भारतातील पहिल्या टप्प्यातील आहे.पितळखोरा या लेणीत जाण्यासाठी खोल दरीत जावे लागते,लेणी दुमजली आहे.येथे मुख्य गुफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे.आतील भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर कृष्णधवल,लाल आणि तपकिरी वा फिकट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत...
बाजूच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चीत्रलेले, सजवलेले आहे. डोक्यावरील केस नसलेली मुले व छोट्या मूर्ती गुडघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात.
चैत्य लेणी व विहार लेणी यांच्या दर्शनीय भागात गंधीक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत...
विहार लेणी येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हत्तींच्या ओळी थेट प्रवेशद्वाराशी जोडतात.विहाराचा एक समूह,एक चैत्य हॉल, आणि दगडावर असलेल्या दोन छोट्या लेणींमध्ये स्तूपांचा समावेश आहे.अत्यंत सुंदर आणि प्राचीन बौद्ध लेणी पाहायला पितळखोरा या ठीकाणी गेलेच पाहिजे...
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खोदलेली हीनयान पंथाची ही लेणी आणि तो सगळा परिसरच अत्यंत नयनरम्य व शांतता भेट देणारा आहे.गौताळा अभयारण्यात हा भाग येतो,लेण्यांमध्ये जाण्यासाठी उत्तम बांधलेल्या पायऱ्या आहेत. १४ लेण्यांचा हा समूह असून त्यातील चार चैत्यगृहे आहेत.त्यातील खांबांवर अत्यंत सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली ती चित्रे खांबांचे आकार आणि खोदीव स्थापत्य पाहून आश्चर्याने बोटे तोंडात जातात.
अत्यंत सुंदर लेणी पाहायला पितळखोरा या ठिकाणी गेलेच पाहिजे...
Written by,
Bharat Sonwane...
TQ,Kannad. Dist,Aurangabad.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा