बनगरवाडी.
-व्यंकटेश माडगूळकर.
लाल मातीचे फुफाट्याचे रान,हिवाळा सरला की भर उन्हाळ्यात पडणाऱ्या जमिनीला भेगा,बोडक्या रानासोबत बोडखी झालेली बाभूळ,बकऱ्या,बकऱ्या वळणारा गुराखी,मेंढ्या,मेंढ्या वळणारा मेंढपाळ, गाव रहाटीचं जगणं हे अनुभव सर्व माझ्या खूप जवळचे...
जरी त्यांच्या सानिध्यात जीवनातला कुठलाही क्षण जगत नसलो तरी अनुभवलेल्या क्षणांतून त्याच्या जीवनाचं वर्णन करणे हा माझा आवडता विषय,हे आजवर तुम्हाला माझ्या लिखाणातून कळाले असेलच...
तर हे वरील सर्व वर्णन करण्यास कारण की,आज या सर्व गोष्टींशी मिळतीजुळती "व्यंकटेश माडगुळकर" यांची "बनगरवाडी" ही कादंबरी वाचली.खूप सुंदर अशीही कादंबरी,'धनगर' समाजाच्या जीवन जगण्याची पद्धत व त्यांचा सहवास यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी...
वाचण्यासा खूप सोप्पी लिखाणात ग्रामीण बाज असलेली मराठी भाषा,त्यामुळे अजुनच आपल्याला आपलीशी वाटणारी ही कादंबरी.फार मोठीही नाही अवघ्या १३२ पानांची आहे.आज सकाळी फक्त तीन तासात वाचून पूर्ण झाली,दिवसभर ते विचार,बनगरवाडीच्या लोकांचे रोजचे जीवन माझ्या सभोवताली पिंगा घालत राहिले...
लहानपणी किंवा आताही भर हिवाळ्याच्या दिवसाला आमच्या इकडे मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन सुगीचे दिवस येण्यापूर्वी काहिदिवस पाल बांधुन वास्तव्य करतात.त्यामुळे त्यांच जीवन,राहणीमान हे बऱ्यापैकी जवळून अनुभवलेले आहे पण हे अनुभवलेले त्यांचे जीवन फिरस्तीवर असल्यावरचे.
त्यांचा गाव अन् त्यांचे त्या गावातील वास्तव्य हे कसे असेल हे आजवर मलाही माहित नव्हतं.हे सर्व आज "बनगरवाडी" च्या माध्यमातून वाचण्यात आले आणि सुखद जीवन सोबतच त्याला संघर्षाची जोड असलेलं जीवन कसे असते याचं जिवंत वर्णन या कादंबरीच्या माध्यमातून "व्यंकटेश माडगुळकर" यांनी केले आहे...
हो पण यातही फक्त इतपर्यंतच विषयाला धरून हे लेखन नाहीये,तर एक नव्याने नोकरीवरती रुजू झालेल्या शिक्षकाचे जीवन कसे असेल,पुन्हा खेड्यागावात शिक्षणाची गंगा वाहती करण्यासाठी त्याला किती अडचणींना तोंड द्यावे लागते,याचेही वर्णन या ठीकाणी कादंबरीत केलेलं आहे...
शिक्षकाला गावातील नागरिकांना आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणायचे हे समजून सांगणे,यासाठी त्याची नोकरी ही फक्त शाळेच्या वेळेपूर्ती मर्यादित न राहता गावातील एक प्रमुख नागरिक म्हणुन विविध भूमिका पार पाडाव्या लागणे.वेळोवेळी कधीतरी त्याला गावातील भांडणे सोडण्यासाठी वकील,पोलीस,बँकवाला,प्रमुख अधिकारी अश्या अनेक विविध भूमिका शिक्षकाला निभाव्या लागतात."बनगरवाडी" च्या नागरिकांसोबत विविध भूमिकेतील शिक्षकाचे नाते अनुभवण्यासाठी नक्कीच एकदा हे पुस्तक वाचायला हवं....
"बनगरवाडी" मास्तर, कारभारी,आयबु, रामा,दादू बालट्या,शेकू,आनंदा रामोशी,बाळा बनगर,सता,अंजी,धुळा,काकूंबा,मेंढरं,मेंढके,मावल्याई देवी व यात्रा,गाडीवाट,वाटेवरचा धुरळा,मास्तरांची गावाविषयीची तळमळ आणि आपुलकी व गावाचा मास्तरांविषयीचा आदर,आणि शेवटी दुष्काळ,शाळा पण बंद,मास्तरांची बदली,राहिले फक्त काकूबा त्याची दोन मेंढरे आणि सून व धूळ चढलेली घरे, छपरे,आंगणे,तालीम आणि शाळा. शेवटी डोळे ओले झाले आणि ही सर्व माणसे आपलीच आणि आपण इथे त्यांच्याबरोबर जगल्याची भावना निर्माण झाली....
खुप सुंदर अशी ही कादंबरी...
Written by,
©®Bharat Sonwane...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा