माझी जन्मठेप..!
लेखक-वि.दा.सावरकर.
तीन दिवस वेळ मिळेल तेव्हा वाचन करत काल रात्रीस अखेर "वि.दा.सावरकर" लिखित "माझी जन्मठेप" हे ३६८ पानांच आत्मचरित्रपर पुस्तक संपले.
मी आपसूकच नकळत डोळ्यांना जन्मठेपेची शिक्षा भोगताना सावरकर बंधूंना माझ्या नजरेत सामावुन घेऊ शकलो.त्यांचा तेथील जगण्यात असलेला संघर्ष,देशाप्रती,देशसेवेसाठी त्यांचे असलेले समर्पण हे या शब्दरूपी "जन्मठेपेतून" अनुभवास आले...
मनापासून सांगायचं झालं तर,इतरांचे या आत्मचरित्रपर पुस्तकाप्रती असलेले मत ऐकून आपण ते पुस्तक वाचत नसाल तर आपण खुप काही गमावतो आहे हे समजून घ्यावं...
"माझी जन्मठेप" हे स्वातंत्र्यवीर "विनायक दामोदर सावरकर" यांनी अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवर लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तक आहे.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली....
तेथील त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती,त्या झुंजीत मृत्यूचा पराभव झाला आणि सावकरांचा विजय झाला.
सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेल्या चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्वे आहेत...त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे.त्याची रोमांचकारी कथा 'माझी जन्मठेप' या आत्मकथेत सावरकरांनी सांगितली आहे.
त्यांना २४ डिसेंबर १९१० रोजी काळ्यापाण्याची शिक्षा (२५ वर्षे) पहिल्यांदा सुनावण्यात आली,तर ३० जानेवारी १९११ रोजी दुसरी काळ्यापाण्याची शिक्षा (२५ वर्षे) देण्यात आली.
हे सर्व लिहताना नकळत मनात असलेली एक हुरहूर कायमची संपुष्टात आली,खुप दिवसांपासुन हे आत्मचरित्र वाचण्याची इच्छा होती.काही कारणासतव तसा वेळ जुळून येत नव्हता किंवा काही इतर गोष्टी म्हणून ही टाळाटाळ.
यापूर्वी या पुस्तकाबद्दल बरच काही ऐकुन होतो,मग त्यात सावरकरांप्रती झालेला वाचक वर्गाचा गैरसमज,गैरसमजापोटी सावरकरांविषयी सुशिक्षित असून अशिक्षितपणाचे सोवळे माथी घेऊन आपलं खरं करून घेणाऱ्या लेखक,वाचकवर्गाचे आपलेच खरे म्हणून हाजीहाजी करून घेणं...
मान्य,काही गोष्टी या पुस्तकांतील मलाही न पटणार्या असतील कारण "धर्म" ही "संकल्पना" हो माझ्या लेखी फक्त ती एक "संकल्पना" आहे.जी मला मान्य नाही,जे माझ्या विचारात बसत नाही त्यामुळे हे आत्मचरित्र वाचतांना थोडे जड अंतःकरणाने मी वाचले..
कारण सावरकरांप्रती मनात कायम आदराची भावना आहे,काही विचार पटत नाही म्हणुन सरासर त्यांची विचारसरणीच चुकीची आहे हे म्हणण्याचा आधिकार मला तरी नाही.काही गोष्टी सोडल्या तर सावरकरांनी,सावरकर बंधूंनी देशासाठी जो त्याग केला आहे त्याची बरोबरी अश्या मार्मिक विचारांतून करणे चुकीचेच ठरते...
जहाज अंदमानच्या दिशेने आगेकूच करू लागले,तसतसे कोठडीत जेरबंद असलेल्या कैद्यांचा आवाज,आक्रोश वाढू लागला जो असह्य करणारा होता...
भारतभूमीचा पार ओलांडला अन् सावरकरांना नजरेसमोर आपल्या आयुष्यातील पन्नास वर्ष सामोरी दिसू लागलित,कदाचित आपल्या जीवनाचा शेवट हा अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये होईल असेही त्यांना वाटू लागले.जसजसं ते जहाज पुढं जावू लागले तसे घड्याळाचे काटे अन् सोबतच जन्मठेपेचा कालावधी पुढेपुढे होवू लागला.भारत मातेच्या सेवेसाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचे चेहरे सामोरे दिसू लागले अन् एकदाचा दूरवर असलेला अंदमानचा सेल्युलर जेल दिसू लागला....
जेलमध्ये प्रस्थान झाले,रोजचा दिनक्रम चालू झाला हळूहळू येथील जीवन किती त्रासदायक,सोसायला लावणारे आहे याचा प्रत्यय येऊ लागला.फावल्या वेळात कोठडीच्या आत कविता रचल्या जावू लागल्या,लिहल्या नाहीतर फक्त रचल्या जावू लागल्या,कारण लिहायला कुठलेही साधन नाही तेव्हा लिहणार तरी कसे..?
त्याच कविता पाठ करणे हे एक ध्येय ठरले,रिकाम्या वेळेत मनास समोरील अवस्थेचे येणारे दडपण नको म्हणुन त्या रचल्या जावू लागल्या,पाठ होवू लागल्या.एक नाही,दोन नाही,शंभर नाही,पाचेशे नाही तर संपूर्ण हजार-पंधराशे कविता अगदी मुखोदगत सावरकरांच्या पाठ झाल्या....
कैद्यांना मिळणारी वाईट वागणूक,दिवसभर कोलू फिरवून तेल काढण्याची ती शिक्षा अक्षरशः हाताला फोड येऊन रक्ताने माखणारे हात,मोगरीच्या सहायाने होणारी काथ्याची काथ्याकुठ, बारिसाहेब,त्यांचे छळने,तेलाचा घाणा दिवभर तो चालवून तेल हवे तितके पूर्ण करून देणे,नाही झाले तर शिल्लक वेळ काम करून ते पूर्ण करून देणे,जेवणात मिळणारे निकृष्ट दर्जाचे जेवण, कैद्यांचे मलेरिया,क्षय रोगास बळी पडणे,ज्वर होणे यातना यातना अन् फक्त यातना....
या सर्वास तोंड देऊन सुटकेसाठी नियमित अर्ज करणे,तो नेहमी फेटाळून लावला जाणे.इतर कैद्यांना पाच वर्षात बऱ्याच सवलती देणे पण सावरकरांना आपण तिथे असतांना आपले जैष्ट बंधू इथे असण्याचा सुगावा लागणे,परंतु अगदी आपल्या जैष्ट बंधुस नजरेस नजर न घालून बघण्याचे दुःख मिळणे.भावाची दिवसेंदिवस क्षय रोगाने होणारी खालवणारी तब्येत,खोकल्याच्या ढासेमुळे दोन चाळ पल्याड असलेल्या भावाचा येणारा खोकल्याचा आवाज,मनाचे अस्वस्थ होणं.खुप दुःखद,कदाचित बाबांचा शेवट अंदमानमध्ये होणार हा मनाला जाळणारा विचार....
पुढे असंख्य काळ कैद्यांना विश्वासात घेणे,तेथील अधिकाऱ्यांना आपले महत्त्व पटवून देणे अन् रिकाम्या वेळेत कैद्याने केलेली तोडफोड,वादविवाद,आक्रोश असंख्य यातना,जगणय्याशी झालेल्या स्पर्धत आपण हरलो ही कैद्यांची भावना,काही गोष्टी वेळेत न मिळाल्यामुळे उपाशीपोटी महीनोमहिने राहणे,नाकात नळी घालून अधिकाऱ्यांचे बळजबरी दूध पाजणे.या सर्वात अनेक कैद्यांना मरण येणे,जीवनाला कंटाळून खिडकीला फास लावून घेणे....
सावरकरांच्या वागणुकीतून परिवर्तन घडणे,हळू हळू सावरकांचे महत्व कैद्यांना पटणे,अधिकाऱ्यांशी केलेली जवळीक तुरुंगाच्या आत हळू हळू परिवर्तनाची पहाट होणं.कैद्यांना देशसेवेचे महत्व पटणे,बाहेर जगतात होणाऱ्या खबरीची कानोकान खबर मिळणे,आरामाच्या दिवशी कैद्यामध्ये आपसात वादविवाद न होता,सावरकरांमुळे उपलब्ध झालेल्या पुस्तकांना कैद्यांनी वाचत बसणे,ज्यांना वाचता येत नाही त्यांना सुशिक्षित कैद्यांनी ते शिकवणे,अन् जेलमध्ये संस्काराचे शिक्षणाचे धडे गिरविले जाणे....
अखेर सावरक बंधूंची सुटका होणे,कैद्यांनी चाफ्याची माळ त्यांचा गळ्यात घालने अन् सावरकरांना जेलमधून सुटका झाल्यावर आपल्या आयुष्याच्या बारा वर्ष सोबत असलेल्यांना सोडून भारतात परत येण्यासाठी त्यांचे जड झालेले अंतकरन...शेवटी जन्मठेेपेची शिक्षा पूर्ण झाल्याचे सुख अन् आपला जैष्ट बंधू आपल्या सोबत आपल्या मायभूमीत पुन्हा येतोय हे सुख, देशसेवेसाठी मायचा लाल पुन्हा लढणार हा अनुभव, खुप काही देऊ करणारं हे आत्मचरित्र आहे...
Written by,
©®Bharat Sonawane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा