अमृतवेल - वि.स.खांडेकर.
वि.स.खांडेकर हे 'जीवनवादी' लेखक म्हणून ओळखले जातात.
वि.स.खांडेकर यांच्या लिखाणाशी ओळख झाली ती "ययाती" च्या माध्यमातून परंतु कदाचित "ययाती" न कळत्या वयात वाचायला धजावू नये असे मला वाटतं.कारण खूप लहान वयात ही वाचायला घेतली,ज्यावेळी की माझी साहित्याशी कुठलीही ओळख नव्हती.मग तिचं ओझरते वाचन,अलंकारिक वाक्यरचना हे सर्व कळेनासे झाले....
आज कित्येक दिवसांनी जेव्हा साहित्यातील "स" या शब्दाची मला ओळख होते आहे,तेव्हा आज "वि.स.खांडेकर" यांची "अमृतवेल" ही कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.तित काही प्रमाणात असलेली अलंकारिक शब्दांची वाक्यरचना माझ्याशी हितगुज करू लागली..."अमृतवेल" या कादंबरीतूनही त्यांनी म्हटलं आहे,"माणसाचं सर्वात जास्त प्रेम जगण्यावर असतं..!" याचा प्रत्यय कादंबरीच्या उत्तरार्धात जातांना वाक्यागनिक आपल्याला येऊ लागतो.
"अमृतवेल" कादंबरीतील प्रत्येक पात्र हे "वि.स.खांडेकरांनी" खूप सुंदररित्या आपल्या लेखणीतून उतरवले आहे,जे सर्व आपल्याला जवळची वाटतात.ज्यांच्या सोबत आपल्या आयुष्यातील हितगुज देवदत्तप्रमाणे आपण व्यक्त करावे किंवा एकाकी पडलेल्या वसुंधराप्रमाणे कुणाची सोबत हवी म्हणून अलकनंदा सारखी मैत्रीण आपल्याला मिळावी किंवा आभाळासारखी माया करणारी आई व प्रेम करणारे दादा हे सर्वस्वी खूप सुंदर आहे....
जेव्हा "अमृतवेल" शेवटच्या पानावर आपण वाचत असतो त्यावेळी,नक्कीच एक सुंदर पुस्तक वाचल्याचे समाधान आपल्या चेहऱ्यावर असते,ते सर्व आपल्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट करत असतो,पण..पण.., इथेही मी म्हणेल साहित्याशी ज्यांची नाळ जोडली आहे किंवा पुढे आयुष्यात ज्यांनी त्याला जवळ केलं आहे त्यांनीच हे पुस्तक वाचावे.कारण उगाच चेहऱ्यावर खोटे भाव आणुन हे पुस्तक वाचणे शक्य नाही,ते कळणेही तितके सोप्पे नाही,त्यासाठी आपण तितकं पात्र असायला हवं,आपल्या विचारांनी तितकंच आपण प्रगल्भही असायला हवं....
थोडक्यात "अमृतवेल" बद्दल,
अलकनंदा एम.ए.शिकलेली हुशार,ध्येयवादी आणि गोड तरुणी.एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली,अाभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनीसारखं जपणारी माई,नंदा मावशी म्हणणारा तिच्या बहिणीचा मुलगा मिलिंद जो तिचा खूप लाडका आहे,हे छोटंसं तिचं विश्व...
दुसरीकडे आयुष्याची दोर विस्कटलेली आहे,सोबतच एक दुतर्फा दोन टोकांवर विसावलेला देवदत्त अन् वसुंधरा यांचा संसार,या संसाररुपी फुलावर उमलेले मधुरा नावाचं हळव्या जिवाचं फुल,या सगळ्यात त्यांच्या सोबत आपले माणसे 'पर्यायी' म्हणून राहणारे बापू व त्यांची बायको...
सोबतच देवदत्तची लायब्ररी,जीवापाड देवदत्त जिच्यावर प्रेम करतो ते गळ्यात गुंघराची माळ घातलेलं चंचल नावाचं हरिणीचं गोड पाडस या सर्वांभोवती फीरणारी ही विस्कटलेल्या संसाराची व संसार सुरु होण्यापुर्वी संपलेल्या अलकनंदाची गोष्ट....
वाचुन बघावी इतकी सुंदर कादंबरी..!
मी कांदबरीचे स्वरुप अगदी मोजक्या शब्दात लिहलं,का तर प्रत्येक क्षणाला कादंबरी वाचताना पुढे काय होईल याची सतत उत्सुकता वाटू लागते.हिच उत्सुकता,कथेचा संपूर्ण रसस्वाद घेण्याकरता यातील पात्र आणि घटना हळूहळू उलगडण्यातच खरी गंमत आहे.आणी तीच किमया खांडेकरांच्या लेखणीने केली आहे,यांत कांदबरीला साज येण्यासाठी विलासपूरचा वाडा, देवदत्ताची लायब्ररी,गड अश्या सर्वच वास्तू डोळ्यांसमोर येतात वाचकाला खिळवुन ठेवतात.
हेमिंग्वे-विवेकानंद,सावित्री-हॅम्लेटची आई अश्या या वैचारीक पात्रातुन कादंबरीला,कथेला या पात्राशी जोडु बघणे सर्वच संदर्भातून खांडेकरांची वैचारिक भूमिका मांडण्याची आगळीवेगळी पद्धत दिसून येते.नकळत मग कादंबरीच्या शेवटी एक सुंदर कादंबरी वाचल्याचं आपलं मन आपल्याला सांगु बघतं,चेहय्रावरचे भाव ते अधिकच स्पष्ट रुपाने व्यक्त करतात....
Written by,
Bharat.L.Sonawane.
(Aurangabad).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा