मुख्य सामग्रीवर वगळा

पालघर भ्रमंती लेख क्र - २

पालघर भ्रमंती....
लेख क्र-२


सूर्योदयाला आपण पालघरच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी आपली भटकंती करत राहावं.सर्वदूर दिसणारी हिरवळ,अधूनमधून वाऱ्याच्या सोबतीने येणारी अलवार पावसाची सर....
वळणावळणाच्या रस्त्यावर जिथं मनाला वाटेल की इथे निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण थांबायचं,ठरले की थांबायचेच.मग रस्त्याच्या  एक साईडला गाडी उभी करून द्यायची,पाऊलवाटा जिकडे घेऊन जाईल तिकडे मनसोख्त भटकंती करत रहायचं. डोंगराच्या कुशीत शिरून नजरेनी निसर्ग अनुभवयाचा,सोबतच दूरवर असलेली मानवी वस्ती डोळ्यात साठवून घेत विचार करत राहायचं.
कश्याला विदेशात फिरायला जायचं,आपल्या मायभूमीत काय कमी आहे आपल्याला जे निसर्गानं दिलं ते ओंजळभर इतर देशांच्या तुलनेत जास्तच आहे....

पावसाच्या संथ सरी,ओलेचिंब झालेले केस त्यांना क्लिपमध्ये सावरत गुडघ्या इतक्या गवतात रानोमाळ,डोंगर कपारी भटकंती करत राहायची.कुणीच नको सोबतीला,अगदी नजरेला आपल्या जवळची सुद्धा व्यक्ती नको की नको कॅमेरा,मोबाईल हे सुद्धा काहीच नको फक्त मी आणि निसर्ग आणि डोळ्यांनी या निसर्गाला जितकं अनुभवता येईल तितकं अनुभवणे.
तुम्ही म्हणाल सुटलेले क्षण कॅमेऱ्यात पुन्हा कैद करता येत नाही,तर ते कॅमेऱ्यात कैद करायचे पण नाहीये.कारण ते क्षण कॅमेऱ्यात कैद केले की त्याच सौदर्य मर्यादित वेळेसाठी असते,त्यामुळे जितकं या डोळ्यांना बघता येईल तितकं बघायचं आणि फक्त डोळ्यात साठवत राहायचं,मनात कैद करत राहायचं.मग नसते कुठले सोयरसुतक त्या मागे राहून गेलेल्या क्षणाचे आणि जर असे वाटलेच की आपण खूप काही सोडून जातोय. तर,पुन्हा तो क्षण कृतीत करून अनुभवायचा बस इतकच सोप्पं आयुष्य असावं... 
मी, सोबतीला वळणाचे दर्या-खोऱ्यातील रस्ते,नजरेत जिथवर सामवता येईल तिथवर फक्त हिरवळ आणि एक छोटी पाठीवर असलेकी बॅग जी फक्त पर्यायी असावी तिचं सुद्धा दडपण,ओझं मनाला नको.
भटकंती सुरू होते पाऊलवाटेनं चालत राहतो,दुतर्फा असलेला निसर्ग,अधून-मधून अनुभवता येईल असे खळखळ करून वाहणारी छोटी छोटी झरे,गुडघ्याला जमिनीवर रोवून वाहत्या झय्रातले नितळ गोड पाणी पिवून घ्यायचं,एरवी पायातील बुटांची लेस सुटलेली असते ती पुन्हा करकचून बांधून पुढे सरकायचे.
पुढे दूरवर वाहणारे धबधबे,अधून मधून येणारे पक्षांचे आवाज,आसमंतात एका लईत उडणारे बगळे आणि रानात अधून मधून दिसणारे विविध छोटछोटे प्राणी.माणसाच्या या वाईट जगापासून वेगळं राहणारे हे सर्व अन् त्यांच्या जगात आपण दिलेली उपस्थिती त्यांना याचा आनंद असतो,फक्त आपल्यामुळे त्यांना कुठलाही त्रास नको हे सूत्र आपण जपायचे...

जोवर पाय थकत नाही तोवर चालत राहायचं,घसरायचे,पडायचे पुन्हा उठायचे,सावरायचे पुन्हा चालत राहायचे,जोवर आपल्याला वाटत नाही तोवर नजरेनी अनुभवत राहायचं निसर्गाला.मग कुठे काही तासांनी एकटं-एकटं असल्याचं दडपण यावं,अश्यावेळी काही करायचं नाही डोंगरकपारीत अशी जागा शोधायची जिथं निवांत बसून सर्व अंगाला वाऱ्याची झळूक अनुभवता येईल.ती सापडली की,डोळे मिटून पाय मोकळे सोडून शांत बसून राहायचं दहा,वीस मिनिटे नाही तर पूर्ण तासभर बसून राहायचं.मग येणारा अनुभव जो असेल तो फक्त अनुभवता येतो तो शब्दात व्यक्त होत नसतो....
हा सर्व अनुभव हे सर्व क्षण गाठीशी घेऊन,अस्ताला जाणाऱ्या सुर्याबरोबर पुढील भटकंतीसाठी परतीच्या वाटेवर चालत राहायचं.हे क्षण काही वेळानं फक्त आपल्या स्मृतीमध्ये असतील हा होणारा भास अन् हे परतीचे क्षण अनुभवत असताना त्यांना लक्षात ठेवण्यासाठी होणारी मनाची धडपड...
आपल्याला आपले मनाचे पडणारे प्रश्न की आपण निसर्गाशी किती एकरूप होवु शकतो..? आणि निसर्ग आपल्याला किती काही देऊ शकतो याची प्रचिती येणं,कधी न संपणारा हा आजचा आपला प्रवास संपणे....
पुढे अस्ताला जाणारा सूर्य त्याची शेवटची काही सूर्यकिरणे,पुन्हा वळणे.पालघर म्हंटले की वळणा-वळणाचे रस्ते सोबत पूर्णपणे हिरवाईने नटलेला निसर्ग,रस्त्याच्या कडेला घाट रस्त्यात वाहणारी झरे,ठिकठिकाणी आदिवासी बांधवांची वस्ती,ती विशेष पद्धतीचे त्यांची कुडाची घरे,त्यांचा पेहराव...
अनवाणी पायांनी भटकत असणारी ती छोटी-छोटी मुलं,त्यांच्या नजरेत आपलं हरवलेलं बालपण आपण शोधत राहणं आणि सर्व लहानग्या मुलांमध्ये मी लहानपणी जसा दिसायचो तसा कोण आहे हे शोधणे,आईच्या कंबराएवढी असलेली तिची मुलगी आई भर रानात असलेल्या विहिरीतून पाणी शेंदून आणते,म्हणून तिच्यासोबत छोटी कळशी घेऊन जाणारी ती.येताना तिचे उडणारे केस सावरत,ओढणीला सावरणे एक नाही,दोन नाही अश्या असंख्य स्त्रिया,मुली ज्यांच्या जीवनाचा हा रोजचा एक भाग आहे.कुठलीही तक्रार न करता हे सर्व रोज करणे...
रस्त्याच्या कडेला लागून जंगलातून आणलेल्या औषधी वनस्पती,मुळ्यांना ये-जा करणाऱ्या पर्यटकांना विकणं,निसर्गाच्या सान्निध्यात आपलं जीवन किती सुखकर आहे हे त्यांनी न सांगता आपण ते ओळखणे अन् सुखाची व्याख्या काय असते ती इथे उलगडणे. असे अनेक क्षण असतात जे शब्दात व्यक्त होत नाही ते फक्त अनुभवावे लागतात,ते इथे अनुभवायला भेटतात.असे असंख्य क्षण आठवणीच्या या कप्प्यात साठवून ठेवले आहे ते लिहण्याचा प्रयत्न....

Written by
Bharat.L.Sonawane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...