#डुंब्य्रावाडीचादुष्काळ....
भर दुपारची वेळ हाताला काम नसल्यामुळे परसदारच्या चौकटीतून नदीपल्याड दिसणाऱ्या दगडी पुलावर मी बसून होतो.चहूकडे कोरड्या वाऱ्याच्या सोसट्यात लाल मातीची धूळ आसमंताला भिडत होती,लाल मातीच्या उडण्याने अंगावर आलेल्या घामाला बकरीच्या मुत्रट मातीचा झोंबलेला वास येत होता.डोक्याला लावायला तेल नसल्यामुळे डोक्यातील केस पार जट झाल्यागत रुक्ष आणि वाऱ्यातून येणाऱ्या मुत्रट वासाच्या मातीने माखले होते.
डोक्यातून येणारा घामाचा ओघळ कबरेच्या लवणातून खाली घरंगळत जाताना अंगाला जाणवत होता,घामाचा ओघळांनी सारा सदरा मळकट अन् सद्र्यावर कुत्रं मुतल्यागत झाला होता.हाताला नसलेलं काम अन् डोक्याला नसलेला ताण म्हणून मी येणारी जाणारी एखाद दुसरी गाडी न्याहाळत पुलावर बसलो होतो...
गावाला यंदाच्या सालचा पडलेला दुष्काळ त्यामुळं माझ्यासगट सारा गाव रिकामाच होता.गाव,गावातील गडी माणूस रिकामा असून रिकामा नव्हता, कुणी चुल्हीला जळतंन आणायला भर पहाटच्याला बोडक्या झालेल्या टेकडीच्या वाटानं सरपण आणाया गेलं होतं.बायका काम नसल्यानं गप्पा झोडीत बसल्या होत्या तर कुणी शेवटच्या घटका मोजणाऱ्या हापशीवरून हंड्या-कळशी ने पाणी भरत होतं,गावात यंदाच्या सालाला दरसाल होणारी पंचमी होणार नसल्याने माझ्यासारखी तरणीबांड पोरं गावच्या जुन्या पडक्या शाळेत पत्त्याचा डाव मांडून बसली होती...
दुपारचा पार कलला अन् मी घराच्या वाटेनं निघालो,माळावरून सरपणाचे भारे घेऊन येणारी गडी माणसं दिसत होती.उन्हाच्या तुटत्या झळा तुटत होत्या अन् या तुटत्या झळामध्ये गावची काळी,काम करुन करून,ओझे उचलून बुटकुली राहीलीली माणसं अजुन तुटतांना दिसत होती...
अनवाणी पावलांनी मी पुलाच्या मोहरच्या पायवाटेनं खोकल्याईच्या पांदीला लागलो.दूरवर नजरेत दिसणारं खोकल्याईचं देऊळ अन् एस्टी थांब्याजवळ असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नजरी पडत होता.वीस सालापुर्वी धोंडु आन्ना रझाकार यांनी त्यांच्या रिटायरमेंट झाल्यावर तो बांधला होता,त्याच्या खालोखाल धोंडु आन्ना रझाकार यांचा पुतळा धोंडु आन्ना वारल्यानंतर गावकऱ्यांनी गाव वर्गणीतून बांधला होता...
पूर्वीचे लोकं म्हणता की धोंडु आन्ना रझाकार पिसळेल कुत्रं डसल्यानी येडा झाला. अन् पिंपळाच्या पारावर बसला की तो नेहमीच म्हणायचा की माझा मेल्यावर यशी महुर पुतळा बांधा,नायतर माझा गावाला तळतळाट लागल....
मग काय गावातील सारी यडीखुळी लोकं बिच्चारी ते तरी काय करतील भोळी बाभडी बांधला बीचाऱ्यांनी धोंडु आन्ना रझाकार यांचा पुतळा...
क्रमशः
वरील पोस्ट कॉपीराईट असल्यामुळे माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही...
Sketch,
R.K.LAXMAN.
Written by,
©® Bharat Sonwane .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा