संगमेश्वराचं देऊळ..!
संगेश्वराचं देऊळ..!
गावाला आलं की मी कुठे जावो न जावो या देऊळात न चुकता जातो म्हणजे जातो.ज्याप्रमाणे प्रत्येक गावाच्या एकांताला,एकांगाला महादेवाचं देऊळ असते अगदी त्याच पद्धतीनं हे ही देऊळ माझ्या गावाच्या अगदी एकांगाला,एकांतात आहे..!
तसं माझं,आमचं गाव सोडून आम्हाला बरीच वर्ष झाली,एखाद-दोन वर्षांचा असेल मी तेव्हा बाबांनी गाव सोडले अन् आमच्या शिक्षणाला म्हणून आम्ही तालुक्याच्या गावाला रहायला आलो,ते तालुक्यातच स्थिर झालो..!
परंतु गावाशी जोडलेली नाळ काही केल्या तुटली नाही,सनवार,लग्न,इतर कार्यक्रम,शेतीचे कामे असले की गावाला येणं होतं.गावाला शेती अन् धूळखात पडलेल जुन्या पद्धतीचं आमचं घर अजूनही आहे,जे शेवटच्या घटका मोजत आहे.जिथं माझं बालपण,वडिलांचं उभे आयुष्य याच्या जिवंतखुणा अजूनही दिसतात,त्यामुळे त्याचं नुतनीकरण करण्यास मन कधी धजावले नाही..!
घराच्या समोर असलेला वाहत्या शिवनामायचा परिसर,संत सावता माळ्याचे भव्यदिव्य मंदिर,हनुमानाचे कळसावर गरुड विराजमान असलेलं मंदिर,पुढे एकांगाला असलेलं संगेश्वराचं देऊळ अन् आयुष्याला शेवटचं वळण भेटलं की वेशीतून शेवटचा निरोप द्यायचा असतो ती गावची जुनी वेस,वेशी पल्याड स्मशानभूमी असं काही चित्र या जुन्या घरासमोरचे,घराला लागून असलेल्या जागेला राम लक्ष्मण सीतामाईच्या मंदिराला दान म्हणून आजोबांनी दिलेली जागा अन् या जागेत उभे असलेले सुंदर असे मंदिर..!
पहाटेची साखर झोपेतून येणारी जाग ही मंदिरात चालू असलेल्या काकडा आरतीने,घरासमोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते.रात्रीची झोपेची वेळ ही गावातल्या वारकरी असलेल्या माझ्या माऊलीच्या सुंदर अभंगानी होते.पहाटेच्या अन् सांजेच्या वेळी कितीवेळ शिवनामायच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला बघत नजरेत सामावून घेतलं जातं,त्यामुळेच की काय गावाशी जुळलेली नाळ मला इतक्या वर्षांनीसुद्धा गावाला घेऊन येते..!
शिवनामायच्या एकांगाला गुलमोहराच्या रानात शिवनामायच्या पात्रात असलेल्या बेसरमाच्या सानिध्यात संगेश्वराचं देऊळ वसलेलं आहे.काळाच्या ओघात वेळोवेळी याची डागडुजी करण्यात आली अन् इतिहासच्या खुणा मिटत गेल्या.या काळात तिथं वास्तव्य करत असलेल्या भामासाद महाराजांचे आपल्याला सोडून जाणं अन् त्यांचं वास्तव्य जोवर या देऊळात होतं तोवर छान वाटायचं पण अलिकडे फारसे मन त्या ठिकाणी रमत नाही एक कमी वेळोवळी जाणवते..!
कधीतरी गावाला आलं की या मंदिराच्या सभामंडपात घटकाभर बसून राहणं होतं,एकांताचा सानिध्यात चिंतन होतं,तेथे असलेल्या जुन्या लाकडी स्ल्याप असलेल्या आश्रमाची ऊब अनुभवता येते, काहीवेळ आयुष्याला घेऊन करत असलेल्या सर्वच अपेक्षा किती गौण आहे याचं भान या ठिकाणी होतं..!
अन् मग कितीवेळ शिवनामायच्या पात्राला असलेल्या दगडी पायऱ्यावर बसून संथ वाहणाऱ्या पाण्याला बघत राहणं होतं,नशिबात असेल तर कधीतरी नावड्याचा मासे पकडण्याचा,पात्रात जाळे टाकण्याचा खेळ अनुभवता येतो.कुणाच्या लेकीच्या,नातीच्या,नातवाच्या आसरा,कुणाचे जावळे फेडण्याच्या कार्यक्रमाला बघता येतं..!
सोबतच मग विचार येऊन जातो की शिवनामायच्या अंगाखांद्यावर खेळतच आपलं आयुष्य संपणार आहे,बाकी गोष्टी निमित्त लावलेलं आहे,आयुष्य जगण्याला कारण म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो,जन्माला आल्यावर होणारे सोहळे,विधी तिच्या साहाय्याने अन् मृत्यू झाला की होणारे विधी,श्राद्धसुद्धा तिच्याच सानिध्यात होत असतात...!
Written by,
Bharat Sonwane.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा