मुख्य सामग्रीवर वगळा

तुळशी माळ गळ्यात घातलेले एकनाथ बाबा..!

तुळशी माळ गळ्यात घातलेले एकनाथ बाबा..!


सुर्य मावळतीला होता,गाव,रानावर सर्वदूर तांबड पसरलं होतं अन् एकनाथ बाबांना रानातून घराकडे जायची ओढ लागली,तसं ते सांजेची कामे बिगीबिगी आवरते करू लागले.गोठ्यातील गुरे हौदावर पाणी पाजून,त्यांना वैरण टाकून,गायीचे दूध क्यानीत काढून त्यांनी सपराला असलेल्या पत्राला कडीकोंडा घालून कुलूप घातलं..!
उटळं कंबराच्या कर्धोड्यात अडकुन ते सपराला लागून असलेल्या न्हाणीघरात घुसले,हातपाय धुवून वावरातले कापडं बदलून एकनाथ बाबा घराच्या वाटेनं निघाले होते..!

अंगात असलेला सदरा घालून घालून पार विरून गेला होता,चार ठीकाणी ठीगळं दिलेलं धोतर घालून,वाटेनं चालत आपल्या आयुष्याचे उरे दिवस ते पुरे करत होते.वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढीत होते,त्यांना नको होतं अंगाला सुटर की वाजली नाही कधी थंडी त्यांना या कडाक्याच्या हिवाळ्यातही..!

अलीकडच्या सालाभरात त्यांना दिसायला कमी झालं होतं,म्हणुन त्यांच्या लेकानं शहरातल्या सरकारी दावखाण्यातून त्यांना एक जाड भिंगाचा चष्मा आणला होता.एकनाथ बाबा त्या जाड भिंगाच्या चष्म्याला जीवापाड जपत असायचे,आयुष्यभर गळ्यात तुळशीमाळ अन् आता या उतारवयात त्यांच्या गळ्यात तुळशीमाळेसोबत या चष्म्याची चष्मा पडून फुटू नये म्हणून त्यांनी चष्म्याला सुतळीची गाठ देऊन ती गळ्यात घातलेली सुतळी होती..!

ते वाटेनं निघाले होते,थकले असल्याकारणाने हळुवार पावलं टाकत,धापा देत ते घराची वाट जवळ करत होते.हातात असलेली दुधाची क्यान त्यांच्या चालण्याबरोबर दोलकाप्रमाणे हलत होती तिच्या सोबतीने ते ही थरथरत चालत होते..!

एकनाथ बाबांना मी वाटेनं दूरवर जास्तोवर बघत होतो,मी पण रानातून घरी निघणारच पण हिवाळ्याची आता कुठं बोर पिकायला लागली होती.ईळभर कुठं वख्त असतो बोराटीच्या झाडाकडे बघायला,मग गेलो बोरं खायला,बोराटीच्या झाडाखाली..!
अजून म्हणावी तशी बोर पिकली नव्हती,आलोच आहे तर ठरवून बोरं खायचीच म्हणून मग खाल्लीच कच्चीपच्ची,हातात बोराटीचा काटाही घालून घेतला..!

मावळतीचा सुर्य अस्ताला गेला होता,मावळला होता.अंधारून आलं होतं अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह,हवेत गारठा भरला होता.दिवसभर डोईवर डालग्यांनी मक्काची कंस वाहून अंग पार भरून अालं होतं,डालगे वाहून वाहून पाय पार जड पडले होते,दुखत होते,बोरं खाऊन मी ही कसेतरी घराच्या वाटेला लागलो..!

एकनाथ बाबा चालत होते हळुहळू,सोबतच न्याहाळत होते वस्त्यावरील लोकांची ती बडबड,रहदारी,दुरूनच येणारा तो वस्तीवरल्या झोपड्यांमधला बोंबलाच्या खुडीचा वास.पांदीनं बकय्राच्या खुरांमुळे तांबड्या आसमंतात उदळलेली तांबरट माती अन त्या मातीचा येणारा ईसाडा,मुतरट वास पांदीनं घेत आम्ही दोघे चालत होतो,गाव जवळ करत होतो..!

काही वख्तानं मी घरला पोहचलो,एकनाथ बाबा पावलं मोजीत मोजीत येत होते,वाटेनं असलेल्या सावता माळ्याच्या,हनुमानाच्या देवळा महूरं वाहना काढून उभे राहत होते अन् देवळाच्या बाहेरूनच मनोभावे देवाचे पाय पडत,बोळकं झालेल्या तोंडातून काहीतरी पुटपुटत घराची वाट जवळ करत होते..!

मी घरला आलो बघून मायना चुलीवर पाणी तापायला ठेवलं होतंच,ते घेऊन मी मोरीत गेलो हातपाय धुतले.तुटक्या आरश्यात बघत बघत वाढलेले केस फनीने मागे घेऊन,मधोमध भांग पाडला अन मी मलाच हसू लागलो..!

मायनं आवाज दिला,
ओ छोटे सरकार चलतूया का,कितीक नटूतुया..!
चहा उकळली हायसा..!
मी पडवीत आलो अन् चुल्हांगणजवळ बसलो.चुल्हांगनात लाल भडक विस्तव असल्यानं अंगातला गारठा निघून गेला होता,त्या चुल्हीच्या आहारा मोहरं माझा चेहरा प्रसन्न होऊन,खुलला होता..!

मग मायने गिल्लासभर चहा दिला,माझ्यासाठी पिठाच्या डब्ब्यात लपऊन ठेवलेले बटर मला दिले.मी चहा-बटर खाऊन पिठाच्या डब्यावर ठेवलेल्या चिमणी पुढं बसून पाटीवर उजळणी खरडत बसलो होतो..?
मी अजुनही उजळणीच शिकत हुतो.माझावाला 'बा' आम्हाला सोडून गेला अन् मग मला शाळा नावालाच राहिली होती.मला भी काम करायला लागलं,पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी.भूक कुठं शाळा शिकू देतीया,पण आता बसतो सांच्याला काहीवेळ पाटी,पुस्तुक घेऊन..!

घटका भरच्यानं मायना भाकर खायला बोलीवलं अन् म्या अन् मायना भाकर खावून घेतली,भाकर खाऊन मी अंगावर गोधडी,घोंगडी घेऊन परसदारी असलेल्या खाटीवर पडलो होतो.अंगणात न्याहाळत ये-जा करणाऱ्या वाटसरूंना..!

पाय खूप दुखायला लागले होते,इतक्यात मगाशी वाटेनं भेटलेले एकनाथ बाबा मला वाटेनं दिसले.मी न राहून त्यांना आवाज दिला एकनाथ बाबा कुठशिक निघाले हायसा..? 
त्यांनी हातानं खुणावतच मला देऊळात जातोया असं सांगितलं.काही केल्या मला झोप काही येत नव्हती,कितीवेळ आकाशात तार्यांना पाहत बसलो..!

अंगात हुडहुडी भरून आली सुटर घातलं,गल्लीत पोरांनी शेकोटी पेटीली हुती तिथं जाऊन बसलो.घटकाभरानं एकनाथ बाबा पुन्हा देवळातून आले,त्यांच्या घरच्या रस्त्याला ते चालत गेले.मी पाहिलं ते कव्हारभर त्यांच्या घराच्या व्हरांड्यात त्या चष्म्याला बघत बसले होते,अन् मनातच मनाशीच काहीतरी बडबड करत आपल्या धुंदीत हातवारे करत होते..!

मी खाटेवर जाऊन झोपलो,अंगावर घोंगडी घेऊन डोळे बंद केले.पण एकनाथ बाबा अजून चष्म्याकडेच पाहत होते,कधी आकाशाकडं पाहत होते त्यांना थंडी वाजत नव्हती,नव्हते दुखत त्यांचे पाय दिवसभर काम करून.परंतु म्हाताऱ्या बाबांचं काहीतरी बिनसलं होतं कुणाशी ते कळायला मार्ग नव्हता..!

मी मात्र दमलो असल्यानं,डोळे लागायला लागले होते,आता मलाही झोप आवरत नव्हती मी डोळे बंद करून एकनाथ बाबाबद्दल विचार करत झोपी गेलो.गाढ झोप लागल्यानं मला पहाटे कोणाच्या रडण्याचा आवाज कानी पडल्यानं माझी झोप उडाली,खाटेवर उठून बघतो तर काय..!

एकनाथ बाबा आम्हाला सोडून देव लोकाला निघून गेले होते, त्यांचे लेवूक,सूना,नातवंडे मोठ्यानं आक्रोश करत होते.माय तिकडं जातेय म्हणुन मला आवरायला सांगून निघून गेली.मी बाजीवरून पारोश्या डोळ्यांनी एकनाथ बाबाला बघत राहिलो..!
एकनाथ बाबांच्या गळ्यात असलेली तुळशी माळ अन् चष्म्याची सुतळी तशीच होती,चष्मा डोळ्यावरून निघून खाली लोंबत होता, एकनाथ बाबांच्या वहाणा एकांगाला धूळखात पडून होत्या..!

काय झालं असावं एकनाथ बाबाला..?
या प्रश्नाला उत्तर नव्हतं,पण बाबाला त्याचं मरण कळलं असावं.
म्हणून काल सांजेपासून एकनाथ बाबा मंदिराचा धावा घेत होते,आपल्या चष्म्याला निरखून निरखून बघत होते..!
प्रश्न खूप होती पण त्यांना उत्तरे नव्हती ती ही एकनाथ बाबांच्या पायावाणी अनवाणी झाली होती अन् मी निःशब्द होवून एकनाथ बाबांचा देह डोळ्यांत भरून घेत होतो..!

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...